कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तेजस ठाकरेही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ठाकरे कुटुंबिय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. विजयी मेळाव्याला देखील मी येणार, असा शब्द शाहू महाराजांना दिलेला आहे. मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे. त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.
महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शाहू महाराज आमचेचं आहेत, असा दावा करताना दिसत आहे. यापूर्वी शरद पवार, संजय राऊत यांनी देखील शाहू महाराजांची भेट घेतली होती.