तहु- परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टिका !
मुंबई : गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकीकडे देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असली तरी देशात परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र नंबर वन असल्याचे आज जाहिर झालेल्या अहवालातील आकडेवरीवरून स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरील एक्सवर “बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते” अशी पोस्ट टाकून विरोधकांना टोला लगावला आहे.
केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी थेट परकीय गुंतवणुकीबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. “एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र २०२२-२३ मध्ये प्रथम क्रमांकावर राहिल्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल ३० मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
याचबरोबर, “२०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी तर २०२३-२४ या वर्षात १,२५,१०१ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरलं जातं. राज्यातील परकीय गुंतवणूक घटली आहे. परदेशातील उद्योग अन्य राज्यांत जात आहेत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तर राज्यातील परकीय गुंतवणूक वाढली आहे. आगामी काळातही अनेक उद्योग राज्यात येतील, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असे सोशल मीडियावरून सांगितले आहे. त्यामुळे आता विरोधक काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.