वाचक मनोगत

लोकसभा निवडणूक पार पडून निकाल समोर आला आहे ज्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी आरूढ होणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारून आपणही कच्चे लिंबू नसल्याचे दाखवून दिले आहे. निकालानंतर सत्तेसाठी हातपाय हलवण्याच्या तयारीत असलेल्या इंडिया आघाडीने सर्व घटक पक्षांसोबत चर्चा करून अखेर विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. त्यामुळे देशात कुठेही संघर्षाचे वातावरण दिसून येत नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि दुसऱ्याच दिवशी एक मजेशीर पोस्ट वाचनात आली. जी फॉरवर्ड केल्यावर वाचणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटत असल्याचे लक्षात आले. या पोस्टनुसार यंदाच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत अभूतपूर्व आहे जो यापूर्वी कधीही कोणीही अनुभवला नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर असा पहिला निकाल आहे जो जाहीर झाल्यानंतर सर्वच जण खुश आहेत. भाजप खुश आहे कारण सर्वाधिक जागा मिळाल्याने तो एनडीए गठबंधनासोबत सत्ता स्थापन करणार आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तास्थानी बसणार आहे. विरोधी पक्ष असलेली काँग्रेस पण खुश आहे कारण मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांनी उत्तम कामगिरी करत मागच्या लोकसभेपेक्षा ४७ अधिक जागा मिळवून शंभरीच्या जवळ पोहोचण्यात यश मिळवले आहे. विरोधकांनी जनमानसांत केलेल्या बदनामीनंतरही काँग्रेसला मिळालेले यश काँग्रेसला अत्यंत सुखावत आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल दोघेही खुश आहेत कारण मागील लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयशी ठरलेले हे दोन्ही पक्ष यंदा जनमताच्या बळावर जोरदार मुसंडी मारत पुन्हा पूर्वपदावर आले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन्हीही पक्ष खुश आहेत कारण सत्ताधारी पक्षाने फोडाफोडीचे राजकारण केले असले तरी राज्यातील जनमताचा कौल अद्याप आपल्याकडेच आहे हे दाखवण्यात ते यशस्वी झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांना मिळालेले यश राज्यात सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने ऊर्जा देणारे आहे. तृणमूल काँग्रेस पार्टी खुश आहे कारण भाजपच्या झंजावातासमोरही त्यांनी आपले अस्तित्व डगमगू दिले नाही. उलट मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक जागा मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे. राज्यातील जनता अजूनही आपल्या बाजूने आहे याबाबत ते समाधानी आहेत. राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख प्रक्षांसह राज्यातील पक्षही खुश असल्याने त्यांचे कार्यकर्ते, त्यांना मानणारी जनताही आज खुश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगही यंदाच्या निकालानंतर खुश आहे कारण ईव्हीएम मशिन्सवर निवडणूका सुरु झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे, जिच्या निकालानंतर कोणीही ईव्हीएम मशीन्सना दोष दिलेला नाही किंवा संशय व्यक्त केलेला नाही. असा हा लोकसभेचा निकाल सर्वांनाच सुखावह ठरल्याने यंदा निकालानंतर कुठेही उल्लेखनीय अशी अनुचित घटना घडलेली नाही किंवा निकालानंतर सामाजिक शांतता बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही ज्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा, पोलीस प्रशासनही खुश आहेत. सर्वानाच खुश करणारी यंदाची लोकसभा निवडणूक लोकांच्या कायमच स्मरणात राहील.
-सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *