कपिल पाटील यांचे मत
मुरबाड : लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्र व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर प्रभावी ठरला, हे देशाच्या भविष्यासाठी घातक आहे, असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी काल येथे व्यक्त केले.
भिवंडी व शहापूरपाठोपाठ कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे भाजपासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिकांबरोबर गुरुवारी संवाद साधला. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनक, भास्कर जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभेच्या निवडणुकीत काही जणांनी जातीच्या नावावर, तर आपण राष्ट्राच्या नावाने मते मागितली. आपण मोदीजींचे कार्य पाहून मतदानाचे आवाहन केले, तर त्यांनी धर्माच्या नावाने मतांची मागणी केली. आपले राष्ट्र व कार्यही चालले नाही. देश व कार्यापेक्षा जात व धर्म हा फॅक्टर चालला, तो देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
देशभरात तीन प्रमुख फॅक्टर चालविले गेले. त्यात भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळाल्यावर, मुस्लिमांना भारत सोडून जावे लागेल, अशी भीती दाखविली गेली. केरळमधून सुरू झालेले अभियान देशभरात पोचविले गेले. केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाममधून भिवंडीत आलेल्या काही विशिष्ट लोकांनी ९० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. देशाच्या विविध भागात हा फॅक्टर चालविला गेला. दलित बांधवांना संविधान बदल आणि आदिवासी बांधवांना आरक्षण रद्द होणार असल्याचे भासविले गेले. या तीन फॅक्टरप्रमाणे भिवंडी मतदारसंघात जातीचा फॅक्टर सुरू होता. त्याचबरोबर भाजपाच्या जवळच्या लोकांनी विरोधी कार्य केले. सर्व फॅक्टर चालूनही आपल्या कार्यकर्त्यांनी नीट काम केले असते, तर नक्कीच पराभव झाला नसता, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
मुरबाड विधानसभा क्षेत्रात महायुतीला कमी मतांसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना पाणी पाजून मुरबाड विधानसभा मतदारसंघात ३२ हजारांची आघाडी मिळविण्याचे कार्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केले. या श्रेष्ठ ताकदीच्या कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, असे आवाहनही श्री. कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
०००००
