माथेरान : कामाच्या अन दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दोन दिवस मनाला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून बहुतांश पर्यटक हे माथेरानला पसंती देतात. परंतु येथील सर्वच संबंधीत  प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबाबत सुयोग्यपद्धतीने नियोजन नसल्याने दरवेळेस येथील घाटरस्त्यात आणि दस्तुरीच्या वाहनतळावर वाहनांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी वाहने पार्किंग अभावी घाटातून माघारी जात आहेत तर अनेकदा त्यांना आपल्या किमंती गाडया घाटातील रस्त्यावर पार्क करून दस्तुरी पर्यंत आपल्या लहान मुलांना आणि सामानाच्या बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत इथल्या निष्क्रिय प्रशासनाच्या चुकांची शिक्षा पर्यटकांना सोसावी लागत आहे.
दस्तुरी पार्किंग ह्या वनखात्याच्या जागेत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे झालेली असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर पॅनोरमा पॉईंट्सच्या रस्त्यावर जवळपास पन्नास गाडया पार्क होऊ शकतात परंतु तेथे पोलीस प्रशासन हरकत घेत आहे असे बोलले जात आहे.
दस्तुरी येथील एमपी हा प्लॉट अद्यापही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेला नाही अन्यथा जवळपास दोनशे गाडयाची पार्किंगची सोय सहजपणे होऊ शकते त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास प्रशासन का कमकुवत ठरत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्ता फुल होऊन जातं आहे. येथील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील याबाबत सर्व कल्पना आहे परंतु शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माथेरान मधील काही महत्वाकांक्षी राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकवेळ या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सकारात्मक विचार केला तरच इथे पर्यटन क्रांती घडू शकते परंतु श्रेयवादाच्या लढाईत स्थानिकांना भरडले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *