स्वाती घोसाळकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात महाविकास आघाडीच्या नावाखाली एकवटलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या आघाडीलाच आता हादरे बसू लागेल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठीच्या त्यांच्या वाटेच्या २२ पैकी सतरा जागा परस्पर घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीलाच खतरा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यादी जाहिर होताच प्रकाश आंबडेकर यांनीही आपला एकला चलोरे चा नारा देत मनोज जरांगेसोबत राज्यात तिसऱ्या आघाडीची चाचपण सुरु केली आहे. तर काँग्रेसच्या वडेट्टीवार यांनी शिवसेनेला आघाडीधर्माची आठवण करून दिली. तर काँग्रेस आणि शिवसेना यांनी परस्पर आपापल्या उमेदवारांची यादी घोषित केल्याने शरद पवारही नाराज असल्याच बोलले जात आहे.
उर्वरीत पाच जागांवरील उमेदवारांची नावे घोषित केली नसल्यामुळे संस्पेन्स वाढला आहे. घोषित न केलेल्या जागांवर उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांच नाव चर्चेत होते. कल्याणमधून केदार दिघे यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे.
शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यामुळे चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. राजाभाऊ वाजे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार झाले होते. या जागेवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांनी दावा सांगितल्यामुळे येथ चुरशीची लढत होणार आहे.
शिवसेनेचे १७ उमेदवार – बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकरांची आता तिसरी आघाडी?
प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आता राज्यात तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु केली असून त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना साद घातली आहे. महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर समाजाशी बोलून 30 तारखेला पुढील निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.
