वसई : महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील ५ लाख १९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
सुधाकर कराळे, दिलीप पाटील (शिवाजीनगर), दिलीप भानुशाली (भानुशाली आळी), शिवाजी फुलवडे (समर्थनगर), आतिश पाटील (किरवली), राजु गुरोडा (पाली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली वाडा उपविभागात वीजचोरी शोध मोहिम सातत्याने सुरू आहे. या मोहिमेत संबंधित आरोपींकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने वाडा शहर शाखेचे सहायक अभियंता राधेशाम कुमावत व वाडा ग्रामीण शाखेचे सहायक अभियंता निरज कुमार यांनी जव्हार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जव्हार पोलिस ठाण्यात २७ जूनला रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
000000