Author: bittambatami.com

कामोठेत रंगले कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन

पनवेल : भव्य मैदान आणि त्यात आकर्षक रोषणाईसह लाल मातीचा दर्जेदार आखाडा, भव्य व्यासपीठ, शेकडो मान्यवरांची उपस्थिती, तिन्ही दिशेला हजारोंच्या संख्येने भरलेली भरगच्च प्रेक्षक गॅलरी, हलगीचा ठेका, दणदणीत सूत्रसंचालन, दक्ष पंच, कुस्तीचा जादूगार पैलवान देवा थापाची चपळाई अशा सर्व सूत्रांचे एकीकरण करत कामोठेत कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन रंगले! निमित्त होते ते पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात ‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी २०२४’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चीतपट करून बाजी मारली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीपटू या कुस्तीच्या दंगलीत सहभागी झाले होते. एकास एक सरस अशा कुस्त्यांनी वातावरणात जल्लोष पहायला मिळत होता. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, तेजस कांडपिळे, अमर पाटील, गोपीनाथ भगत, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भाऊ भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विद्या तामखेडे, रुपेश पावशे, विनोद नाईक, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खर्‍या अर्थाने आपले जीवन घडवण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी येथे मोठ मोठ्या कुस्त्यांचे सामने भरवले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंदकेसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गव्हाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे २० हजार मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याच्या बाजूला एक एकर जागा कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आलंय त्यामुळे ते पूर्ण केले जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा, असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहेत. हल्ली आपण पाहतो की कबड्डी, कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात. अशा वेळी मातीतील कुस्तीचा खर्‍या अर्थाने आनंद आपल्या इथे पहायला मिळत आहे. यातूनच परेशशेठ यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते. नेपाळमधील पैलवान देवा थापा यांनी म्हटले की, परेश ठाकूर यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अनेक ठिकाणी गेलो, पण पनवेकरांसारखे प्रेम मला कोठेच मिळाले नाही. मला आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद! गिरवले (ता. पनवेल) येथील पैलवान प्रतिक हातमोडे यांनी सांगितले की, या सामन्यांचे आयोजन चांगले आहे. विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही चांगली आहे. कुस्तीत वन मॅन शो असतो. मनापासून आवड असेल तरच या खेळात येणे चांगले, कारण यामध्ये खाणे-पिणे व्यवस्थित लागते. पनवेल भागात आखाडा तयार झाला, तर निश्चितच त्याचा फायदा आमच्यासारख्या कुस्तीपटूंना होईल. * गदा जिंकणारे कुस्तीपटू अमेघा अरुण घरत, खोपटे-उरण वैष्णवी दिलीप पाटील, कल्याण सौरभ पाटील, सीकेटी-पनवेल

भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांची बूथला भेट

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या बूथला भेट देऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी शहरातील बूथला भेट दिली. तेथील भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मतदानाची माहिती घेतली. तसेच त्यांना विविध सूचना दिल्या. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्यात मतदारांची परवड, जबाबदार संबंधितांवर कारवाई करा – डॉ. संजय मंगला गोपाळ

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील  मतदान व्यवस्थेत अव्यवस्था,.ना पिण्याचे पाणी, ना पंखे, मतदारांच्या अंगावरुन वाहत होत्या घामाच्या धारा. मतदारांच्या या प्रचंड परवडीला जबाबदार संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघांतील ठाणे विधानसभा क्षेत्रातीलमतदारसंघात कोलशेत -ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले होते. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मतदार मतदान करू शकले. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री – पुरुष मतदार रांगेत उभे होते. तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे जाणवत होतं ३९ डिग्री सेल्सियस. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभरात घामाची नखशिखांत आंघोळ! ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय.दुपारी तापमान ३८-३९ पर्यंत गेले होते.म्हणजे जाणवणारं तापमान ४५ डिग्री सेल्सियस होते. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड झाली होती. या परवडीला जबाबदार अधिकार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करावी अशी मागणी डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

कळवा- मुंब्रा परिसरात मतदान प्रक्रिया संथ, व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची घटना घडल्याचा दावा !

जितेंद्र आव्हाड यांची संबंधितांवर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्र्यातील बाबाजी पाटील शाळेत अतिशय संथगतीने मतदान सुरु असल्याचे दिसून आले. यामुळे एकाच जागेवर दोन दोन तास रांगेत मतदार उभे असलेले आढळून आले. तर अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटनाही घडल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर मतदारांनी व स्थानिक आमदार डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. कल्याण लोकसभा मतदार संघाअंतर्गत  मुंब्रा – कळवा विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २४३ या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली  नाही. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली असून सदरच्या रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू  होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या असून १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक  निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी नमूद  केले.

काजल आणि फहिमला अंतिम जेतेपद

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या फहिम काझीने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ०-२५, २०-१०, २५-११ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तर दुसरीकडे आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लबच्या रिंकी कुमारीचा २५-१, २५-१३ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्यांना लोकमान्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, लोकमान्य नगरचे कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले, मानद सरचिटणीस अरुण केदार व सहसचिव संजय बर्वे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष एकेरी गटाचे उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) ५-२३, १८-१७, १९-५ फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ) २५-८, ०-२५, २५-१२ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) २०-२, २५-० रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) वि वि अंबिका हरिथ ( रिझर्व्ह बँक )  ०-२५, १९-१४, २२-०

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप ग्रामपंचायतमधील बोण्डरपाडा, भेरेपाडा, दापूर, माळ कातकरीवाडी येथील मतदारांची नावे इतर वाड्यांमधील केंद्रांवर गेल्याने मतदारांची गैरसोय झाली; मात्र मतदारांनी रखरखत्या उन्हात मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला. मतदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पुढील निवडणुकीतही अशीच व्यवस्था असल्यास मतदान करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील निवडणुकीसाठी नवीन सर्वेक्षण करून मतदारयाद्यांची छाननी करावी. मतदार राहत असलेल्या ठिकाणची खात्री करून मतदारयाद्या तयार कराव्यात, अशी मागणी उपसरपंच अजय कथोरे यांनी केली आहे.

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे दर्शन घडवण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांनी विविध मतदान केंद्रे तयार केली. मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदारांना आकर्षित केले जाईल, अशी मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्याची संस्कृती, परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला. डहाणूतील मल्याण मतदान केंद्रात वारली चित्र रेखाटन, चिखला येथील शाळेतील मतदान केंद्रात कोळी मतदान केंद्र, गटसदन केंद्र डहाणू येथे युवा व्यवस्थापित केंद्र, मॉडल हायस्कूल मसोली येथे आदिवासी पारंपरिक मतदान केंद्र, तर वाकी ब्राह्मण पाडा येथे सक्षम मतदान केंद्र, नंदारे येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. यामुळे येथील संस्कृती, परंपरा जपल्या जातील आणि मतदारांना आकर्षित करून मतदानाचा टक्कादेखील वाढला जाईल, यासाठी ही मतदान केंद्रे उभारली आहेत.

जंजिरा किल्‍ला २६ मेपासून बंद

मुरूड :- साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपैकी एक असून वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्‌यात किल्‍ल्‍यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा २६…

नालासोपारा मतदारसंघातील तब्बल ‘इतके’ लाख मतदार गायब

निकालावर होणार थेट परिणाम विरार : नालासोपारा व बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. यात नालासोपारा मतदारसंघातून 1,09,069 तर, बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55,332 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ही नावे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 2024 च्या पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक प्रशासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत आहे, असे मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, मतदानापासून वंचित राहिलेल्या शेकडो मतदात्यांनीही याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2019 साली नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या 5,12,425 इतकी होती. 2024 मध्ये यातील 1,09,069 नावे काढून टाकण्यात आली आहेत. 2024 मध्ये 5,57,547 इतकी मतदारांची नोंद आहे. या वर्षी यात 1,53719 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. बोईसर मतदारसंघात 2019 साली 3,14,213 इतकी मतदारसंख्या होती. त्यापैकी 55,332 इतकी नावे या वर्षी काढून टाकण्यात आलेली आहेत. तर, 2024 मध्ये बोईसर मतदारसंघातील मतदारसंख्या 3,84,201 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. यात या वर्षी 1,26,245 इतके मतदार वाढलेले आहे, असे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. मात्र, या याद्या मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी जास्तच सदोष आहेत. त्यामुळे या वर्षी तब्बल दीड लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. याचा थेट प्रभाव मतदान टक्केवारी आणि निकालावर होणार आहे. निवडणूक यंत्रणाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. मतदारयादीत प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नाही. त्यांच्या सूचना अथवा मार्गदर्शन घेतले जात नाही. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सी अथवा शासकीय कर्मचारी यांच्या मार्फत सर्व्हे करून या याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे मतदाराची निश्चित माहिती त्यांना प्राप्त होत नाही. याचे परिणाम म्हणून त्रोटक माहितीआधारे ही नावे वगळण्यात किंवा काढून टाकण्यात येतात. मतदार याद्या निर्दोष बनवायच्या तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा त्यातील सहभाग वाढविला गेला पाहिजे, असे मतही बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नालासोपारा व बोईसर मतदारसंघातून गावनिहाय काढून टाकण्यात आलेल्या मतदारांची संख्याही बहुजन विकास आघाडीने समोर आणली आहे. विशेष म्हणजे या मतदारांनी मागील वर्षी मतदान केले होते. मात्र, त्यांची नावे आता या यादीत नाहीत. शिवाय एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे सापडत असतील तर इतरांची सापडत नसल्याच्या मतदात्यांच्या तक्रारी आहेत. पतीचे नाव असेल; तर त्याच्या पत्नीचे नाव सापडत नव्हते. मृत व्यक्तीचे नाव यादीत सापडत होते; पण जिवंत व्यक्तीचे नाव सापडत नव्हते. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघांतील बहुतांश मतदार मदत कक्षांबाहेर मतदात्यांच्या संतप्त प्रतिक्रया उमटताना दिसत होत्या. या मतदार यादी ज्यांच्यामार्फत व ज्यांच्या माध्यमातून बनविण्यात आल्या; त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या मतदात्यांनी लावून धरली आहे. विशेष करून यात मराठी व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आली आहेत, असे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

यादीत नावच सापडत नसल्याने मतदार हैराण

डोंबिवली, : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते; मात्र अनेक ठिकाणी मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.…