Author: bittambatami.com

‘मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊ आणि मतदानाची टक्केवारी वाढवू’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन महापालिकेने तयार केलेल्या मॅस्कॉटने दिला मतदानाचा संदेश ठाणे : येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी सकाळी, पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. सोबत, मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कॉट (शुभंकर) ही होता. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांबरे, वृक्ष अधिकारी केदार पाटील कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते. नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

कसाब बिर्याणीबाबत ॲड. निकम यांचा निर्लज्ज खोटेपणा – सुप्रिया श्रीनेत

मुंबईतील सहाही जागांवर मविआ आणि इंडिया आघाडीचाच विजय. मुंबई : ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाती त्यांनीच कबूली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलच्या उड्या मारतोय. एका मुलीला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिलीय. आता कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना निवडून देत मतदार भाजपाला धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य (CWC), सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांची विशेष पत्रकार परिषद मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत माहिती त्यांनी दिलीच पण ४०० ची घोषणा करणाऱ्या भाजपने कॉंग्रेसची सत्ता येतेय हे मान्य केलंय असंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं. मुंबईबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे सागले. एक धादांत खोटं बोलणारा आहे. तर दुसरे उमेदवार पियुष गोयल यांना भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाचा ते अवमान करतात. हे गरीबांच्या विरोधातील लोक आहेत. कोळी माणसाचा वासही सहन न होणाऱ्या गोयल यांना सामान्य माणसं धडा शिकवतील. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनिती उद्धस्त झाली. आता अमेठीत एक सक्रीय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला. मुंबईत इंडिया आघाडीचे सहाही उमेदवार जिंकणारच. देशभरातलं वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होतेय. म्हणूनच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवतायत, असं ठामपणे सांगताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपनेते कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांचाच जप करतायत.

‘आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही’

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेच्या गोटात गेल्यामुळे नवी मुंबईत नाराज झालेल्या नाईक समर्थकांनी राजीनामे दिले होते. यावर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्टींकडे पोहोचवण्यासाठी केलेली कृती असल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले आहे. तसेच बंड थंडावल्याची चर्चांना उत्तर देताना प्रेमाने दिलेला निरोप अथवा आदेश स्वीकारतो. पण तंबी देणारा जन्मलेला नाही, अशा शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीकरिता माजी खासदार आणि भाजपचे नेते संजीव नाईक यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. प्रचार आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठीनंतर संजीव नाईक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असे चित्र तयार झाले होते. दरम्यान, अचानक ही उमेदवारी शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली. भाजपकडे येणारी उमेदवारी अचानक मित्र पक्षाला मिळाल्याने भाजपच्या ऐरोलीतील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. अनेकांनी नाईकांच्या क्रिस्टल हाऊसवर जाऊन असहकार्याची भूमिका जाहीर करून पदांचे राजीनामेही दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील हा बेबनाव उघड होऊ नये, म्हणून नाईक यांचे ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासोबत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. त्या चर्चेनंतरच नाईक यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजावण्याची भूमिका जाहीर करावी लागल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. नाराजी दूर करण्याचा पुर्नउच्चार नवी मुंबईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. आता बरीचशी कमी झाली आहे. आता थोडीफार राहिलेली आहे, ती पण काढून टाकू असेही नाईकांनी स्पष्ट केले. मात्र, आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार आम्ही काम करतो. आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो. आपल्याला तंबी देणारा आजपर्यंत जन्मलेला नाही, असा पुनर्उच्चार करत पक्षालाही इशारा दिला आहे.

‘रिक्षावाल्यांच्या मनमानीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बससेवा सुरू करा’

रहिवाश्यांची मागणी मीरारोड – मुंबई अहमदाबाद महार्गावर वाढती गृहसंकुले पाहता मीरारोड रेल्वे स्थानक ते आराध्य हायपार्क  व मीरारोड स्थानक ते ठाणे व्हाया आराध्य हायपार्क अशी बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी…

ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष

२ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती मीरारोड – मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील…

‘राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते’

नरेश म्हस्के यांचा दावा मीरारोड : ह्या आधीच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . आता त्यांना या पैकी कोणाचाही पाठिंबा नसल्याने त्यांनी यंदा जिंकून दाखवावे असे आव्हान ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरारोड कार्यालयात शनिवारी रात्री झालेल्या पदाधिकारी बैठकीसाठी म्हस्के आले होते . यावेळी आ . सरनाईक सह आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक , भाजपा ठाणे विभागाचे संघटन मंत्री हेमंत म्हात्रे , भाजपा मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख ऍड . रवी व्यास , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अरुण कदम , आरपीआयचे देवेंद्र शेलेकर , शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रमप्रताप सिंह आणि सचिन मांजरेकर सह माजी नगरसेविका भावना भोईर , संध्या पाटील , वंदना पाटील , जिल्हासंघटक निशा नार्वेकर आदी उपस्थित होते. शहरातील शिलोत्र्यांच्या मिठागर जमिनीचा मालकी हक्क देणे , मिठागराच्या जागेवरील नेहरू नगर , शास्त्री नगर सारख्या तसेच शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे , भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे व भाईंदर व मीरारोड स्थानके सर्व सुविधा युक्त बनवणे , आयटी पार्क , इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आदी विविध मुद्यांवर दोन्ही स्थानिक आमदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. ह्या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा व माजी आमदार नरेंद्र मेहता मात्र अनुपस्थित असल्या बद्दल नेत्यांना प्रश्न करण्यात आला . त्यांना निमंत्रण दिले होते परंतु ते दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने येऊ शकले नाहीत असे सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे- केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना काल झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काल निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला. या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) , 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) , आणि 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन (आयपीएस) उपस्थित होते.‍ तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. शिनगारे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांची माहिती उपस्थित निरीक्षकांना दिली. तसेच  भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्रणा यांची माहिती सर्व निरीक्षकांना दिली. नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. राव यांनी यावेळी दिले. 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही श्री. राव यांनी यावेळी दिले. पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे,असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यत पेडन्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल यांनी या बैठकीत दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांना त्या दिवशी सकाळपासून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत उदा. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत भरण्यात येणारे फॉर्म, त्यासाठीची प्रक्रिया, मॉक पोलिंग आदी कामाची चेकलिस्ट करुन ती सर्व मतदान केंद्रावर देता येईल का ते पाहावे. जेणेकरुन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाईल. तसेच मनुष्यबळ व साहित्याची वाहतूक करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचनाही सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन यांनी यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सरबत आदींची सोय होईल हे पाहावे. तसेच पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, यासाठी ज्या ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळतील, यासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. जैन यांनी यावेळी दिल्या. मतदान प्रक्रिया हे टीमवर्क आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.के.जयरामन, कु.करुणागरन, श्री.मीना यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

डोंबिवलीत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका!

उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश! ठाणे : कल्याण लोकसभेत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आठवडाभरात उबाठा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे. यापूर्वी उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर या सर्वांना उबाठा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माथेरान मध्ये लवकरच आकर्षक श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साकारणार

माथेरान : माथेरान मधील पंचवटी नगर भागातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नूतनिकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या येथील राकेश कोकळे यांच्या प्रयत्नामुळे आकर्षक असे श्री. विठ्ठल रखुमाई मंदीराचे काम मार्गी लागणार आहे. मावळ मतदार संघाचे संसदरत्न खासदार तथा लोकसभा निवडणुकीत हट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दि.३ रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला धावती भेट दिली होती त्यावेळी त्यांनी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांसह दुसऱ्या दिवशी राकेश कोकळे यांच्या विनंतीला मान देऊन  पंचवटी नगरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास आवर्जून भेट दिली. याचवेळी या दोन्ही मान्यवरांनी स्व. संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, पंचवटी मित्र मंडळ अध्यक्ष गणेश बिरामणे,संजय घरत,किरण पेमारे आदी उपस्थित होते.

मुंबईतला पहिला रोपवे मुलुंड ते एसजीएनपी होणार

पर्यटनमंत्र्यांनी विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना SGNP ला धक्का न लावता रोपवे बांधला जाईल आणि नवीन पर्यटन स्थळ विकसित केले जाईल – कोटेचा मुंबई: लवकरच, मुंबईला एक नवीन पर्यटन स्थळ मिळणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (केबल कार) बांधण्यात येणार आहे. तसेच त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी तशी मागणी केली असून, सरकारने पर्यटन विभागाला त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे. कोटेचा यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या मुलुंड विधानसभा क्षेत्रालगत च्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळच्या तीन मूर्ती मंदिरकरिता रोप वे ची सुविधा व पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मागणी केली आहे. पत्रामध्ये कोटीचा यांनी असे म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील संरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती साधारण 87 कीमी परिघात आहे. याच राष्ट्रीय उ‌द्यानाची पूर्वेकडील सीमा माझ्या मुलुंड मतदारसंघाला लागून आहे. मुलुंड मधील नागरीकांना आपल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे मी मुलुंडकर नागरिकांच्या वतीने ही मागणी आपणांकडे करीत आहे. संजय गांधी उ‌द्यानाच्या च्या हद्दीत सुंदर असे डोंगर असून या डोंगर माथ्यावर फार जुने तीन मूर्ती मंदीर आहे या मंदिरात भाविकांना सहज रित्या येता यावे म्हणून तिथे रोप वे व्यवस्था तसेच पर्यटकांना viewing gallery केल्यास भाविकांची व पर्यटकां ची संख्या वाढेल. या सुविधा मुळे शासनास महसूल ही मिळेल. माझ्या ह्या मागणीचा सकारात्मक विचार करून या करीता निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. कोटेचा यांच्या पत्रानंतर महाजन यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास करण्याचे आदेश दिले. एप्रिलमध्ये पर्यटन विभागाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, पर्यटन विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता.…