Author: bittambatami.com

डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी

डोंबिवली : खारफुटीचे घनदाट जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात स्थानिकांनी कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन कोणत्याही बांधकाम परवानग्या न घेता हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी केली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट करून या बेकायदा बांधकामांची भूमाफियांनी उभारणी केली आहे. मागील ३० वर्षात कोणीही भूमाफियाने कोपर भागात बेकायदा चाळी, इमारती उभारणीचे धाडस केले नव्हते. पण आता डोंबिवली खाडी किनारची बहुतांशी जागा भूमाफियांनी चाळी, बेकायदा इमारती बांधून हडप केली आहे. आरक्षित भूखंडावर इमले बांधून सज्ज झाले आहेत. आता डोंबिवलीत मोकळ्या जमिनी शिल्लक राहिल्या नसल्याने भूमाफियांनी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मोकळ्या सुमारे ५० ते ६० एकर जमिनीकडे आपल्या नजरा वळविल्या आहेत. या हरितपट्ट्यात शिरकाव करण्यासाठी कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरून भूमाफिया हरितपट्टयातील झाडे तोडण्यासाठी, तेथील खुरटी झाडे नष्ट करण्यासाठी जेसीबी, पोकलेन या रस्त्यावरून नेत आहेत. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहे. त्याचा गैरफायदा भूाफियांनी घेतल्याची चर्चा आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये हरितपट्टे विकसित करण्याचे आणि अस्तित्वातील हरितपट्टे संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशाला आव्हान देत कोपर भागात भूमाफियांनी हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम केले आहे. त्यामुळे आयुक्त याविषयी काय भूमिका घेतात याकडे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे. हरितपट्ट्यात बांधकामे सुरू झाल्याने निसर्ग छायाचित्रकार, पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. आयुक्त डॉ. जाखड यांनी हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त कऱण्याची मागणी नागरिक करत आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्याने हे बांधकाम आमच्या हद्दीत नाही. या बांधकामाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कोपर रेल्वे स्थानक भागात हरितपट्ट्यात बेकायदा बांधकाम कोणी केले असेल तर त्या बांधकामाची पाहणी करतो. ते बांधकाम बेकायदा असल्याचे दिसून आले तर ते तात्काळ जमीनदोस्त केले जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

 ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार

राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती ठाणे : लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून श्री राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात असतानाच, आता ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात रामाची प्रतिकृतीसह मंदिराचा मोठा देखावा उभारला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साजरा होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून ठाकरे गटाने निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे २९ वे वर्ष असून यापूर्वी चरई भागात १२ वर्षे हा उत्सव साजरा होत होता. गेल्या १७ वर्षांपासून मैदानात हा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनाला भावीक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनीही राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराची उंची ७० फूट आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा आहे. ४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याठिकाणी रामाची मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावरून राजकारण तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभारण्यात आल्याचा मुद्दा भाजपच्या नेत्यांसह महायुतीचे नेते उपस्थित करत आहे. लोकसभा निवडणूक प्रचार मेळाव्यातही महायुतीच्या नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवरात्रोत्सवात राम मंदिर प्रतिकृती उभारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने राम मंदिराबद्दल आस्था असल्याचे ठाकरे गटाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत गीता दुबे व एस.आर. दुबे,शॉप नं 8,9,10, भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई , हार्दिक सुनिल गोखरू व  प्रेमप्रकाश भवंरलाल शर्मा, शॉप नं 14,15,16, कासा ब्ल्यानका सो,भूखंड क्र 85 सेक्टर-03, कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केले होते. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1)अ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्याअनुषंगाने सदर बांधकामावर निस्कासनाची कारवाई करण्यात आली व त्यापोटी रु.10,000/- एवढी वसूली  करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, न.मुं.म.पा पोलीस बंदोबस्त तसेच, 08 मजूर, 1 पिकअप व्हॅन, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, 01 गॅस कटर इत्यादी चा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे प्रतिपादन ठाणे: सर्व उमेदवारांना व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि अनुचित पद्धतीच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी आज येथे केले. 24- कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज सकाळी “सीझर कमिटीच्या” नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती सातपुते यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून म्हणजे दि. 16 मार्चपासून फिरत्या निगराणी पथकाचे  काम सुरू झाले आहे. या टीमने आक्षेपार्ह रोकड, दारू,भेटवस्तू इ.सापडल्यास कशा प्रकारे कारवाई करावी याच्या सूचना संबंधित बैठकीतील उपस्थित समन्वय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कार्यवाहीसाठी आयकर विभाग, वस्तू व  सेवा कर विभाग, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग या सर्वांचे प्राधिकृत अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. या सर्वांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशाही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यावेळी बैठकीत दिल्या. या बैठकीस 144 कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे सह.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर,  24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, नोडल अधिकारी (खर्च) दिलीप सूर्यवंशी, सहा.खर्च निरीक्षक शरद देशमुख, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या आदर्श आचारसंहिता पथकांचे समन्वय अधिकारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमार्फत मतदान जनजागृती मोहिम

 ठाणे विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्यावतीने ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने  स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत आज मो.ह विद्यालय, ठाणे येथे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे, असे आवाहन स्वीप पथक यांनी केले. स्वीप आराखड्यानुसार मतदार नोंदणी व त्यांचा सहभाग वाढविण्यासांठी प्रचार, प्रसिद्धी, जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती मार्फत चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी स्वीप कार्यक्रम राबविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदान जनजागृती’ विषयावर स्पर्धा घ्या प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मतदान जनजागृती’ या विषयांवरती माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे दिल्या. सदर कार्यक्रमात मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी  मी मतदान करणारंच…, आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा, या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्यावतीने तलावपाळी येथे मतदान जनजागृती मोहिम

ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने रविवारी सुट्टीच्या दिवशी तलावपाळी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. सुट्टीनिमित्त फिरावयास आलेल्या नागरिकांनी या…

उल्हासनगर महानगरपालिकेत सामान्य जनतेची सत्ता आणणार !

उल्हासनगर : महानगरपालिकेच्या येणारी निवडणूक कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील सर्व प्रभागांमधून लढवेल, अशी घोषणा कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी  आयोजित केलेल्या ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमात केली. उल्हासनगर पूर्वेकडील वाघमारे हाॅलमध्ये ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमाचं आयोजन कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर प्रमुख मार्गदर्शक होते. राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात मंगला मुजुमदार यांची प्रभाग क्रमांक १८ च्या अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली. कायद्याने वागा लोकचळवळीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रदीप कपूर यांनी काय्रक्रमाची प्रस्तावना मांडली. राकेश पद्माकर मीना यांनी ‘संकल्प लोकशाही प्रस्थापनेचा’ या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कावालो माध्यम समन्वयक प्रफुल केदारे संपूर्ण चर्चेचे सूत्रधार होते. संदेश मुकणे, शशिकांत दायमा, संजय वाघमारे, ॲड. वनिता ओवळेकर, प्रा. सिंधु रामटेके, अनिल शर्मा, उमेश देबनाथ, मुकेश माखिजा, कुमार रेड्डीयार, अभिजीत मोंडल, अरिदीप जाना, प्रकाश भोसले, ललित कवात्रा, राहुल परब, शैलेंद्र रुपेकर अशा अनेकांनी वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपापली मतं व्यक्त केली. वालधुनी नदी, भ्रष्टाचार, प्रदुषण, प्रशासनिक अव्यवस्था, अनधिकृत बांधकामे, नियोजनशून्य विकास, अनारोग्य अशा विविधांगी मुद्यांवर चर्चा झाली. राज असरोंडकर यांनी सांगितले की कायद्याने वागा लोकचळवळ शहरातील नागरिकांकडून शिफारशी मागवेल आणि त्यातून उमेदवारांची निवड व त्यांचं प्रशिक्षण करेल. हा खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं.

भास्कर जाधव म्हणजे दुसरे संजय राऊत- अविनाश जाधव

ठाणे : सकाळी उठल्यावर प्रसिध्दीसाठी काही तरी बडबडत राहणारे आमदार भास्कर जाधव हे दुसरे संजय राऊत आहेत असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. तसेच लोकसभेसाठी उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीतील एकही उमेदवार निवडून येण्याच्या लायकीचा नाही असेही ते म्हणाले. येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसवल्या शिवाय राहणार नाही असे ही यावेळी त्यांनी भाकीत वर्तवले आहे. भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना टोमणे मारत असतील. मध्यंतरी त्यांनी स्टेटस ठेवले होते. स्वतःच्या मुलाला तिकीट मिळावी,यासाठी ते इतर राजकीय पक्षांच्या वाऱ्या करत होते अशी टीकाही त्यांनी केली. तसेच येत्या रत्नागिरीच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा महाराष्ट्र सैनिक दाखवतील. याशिवाय येत्या निवडणुकीत विनायक राऊत यांना महाराष्ट्र सैनिक घरी बसल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. राज ठाकरे हे परंपरेनुसार बाळासाहेबांची युती असणाऱ्या भाजपसोबत गेले आहेत, त्यामुळे भास्कर जाधवांना का मिरची लागते. असा सवालहि त्यांनी केला. याशिवाय उध्दव ठाकरे यांच्यासारखा माणूस काँग्रेस सोबत गेला त्यांच्यासोबत लाचट भास्कर जाधव सारखी माणस गेल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच भास्कर जाधव यांना रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या निवडणुकीत कळेल राज ठाकरे गेल्यानंतर काय होत. राज ठाकरे त्यांचा नीट समाचार घेतील असेही ते म्हणाले. मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना हि टीका केली.

मॉरिशसमधील मराठी कलाकार सादर करणार नृत्य आणि नाट्याची अनोखी कलाकृती

ठाणे : मॉरिशसमधील मराठी नृत्य आणि नाट्याज कलाकारांनी साकारलेली अनोखी कलाकृती पाहण्याची संधी राज्यातील रसिकांना मिळणार आहे. मॉरिशस मराठी क्लचरल सेंटर ट्रस्ट (एमएमसीटी) यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम १० ते १९ एप्रिल या काळात राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचे सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथे प्रयोग झाले असून बुधवार, १७ एप्रिल रोजी ठाण्यात सायंकाळी ६ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे त्यांचा प्रयोग होणार आहे. सहा नृत्य कलाकार आणि चार नाट्य कलाकार असा हा संच आहे. डिसेंबर-२०२३मध्ये ‘एमएमसीटी’ने आयोजित केलेल्या नृत्याविष्कार स्पर्धेतील हे कलाकार आहेत. तर, नाट्य कलाकारांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ‘एमएमसीटी’चे अध्यक्ष आणि सांस्कृतिक प्रकल्पाचे शिल्पकार अर्जून पुतला हे करत आहेत.  ठाण्यातील प्रयोग, बुधवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वा. डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मिनी थिएटर येथे होणार आहे. या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, ‘एमएमसीटी’ने केले आहे.

ठाण्यात शेतकऱ्यांना बसला अवकाळीचा फटका

पिकांचे मोठे नुकसान ठाणे : काल रात्री साडेसातच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. किन्हवली,शेणवा व डोळखांब परीसरात अनेक घरांची छप्परे उडाली असून आंबा बागायतदार,काकडी, भेंडी आदी रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर वीटभट्टीचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. आपटे येथील जिल्हा परिषद शाळा, माणेखिंड येथील अनिल सपाट, काशिनाथ गोडांबे,कानडी- झापवाडी येथील दौलत धर्मा शिद, शिरवंजे येथील उत्तम बांगर, लक्ष्मण लातार,सावरोली येथील गणेश आराज यांची राईसमिल,टिकबाईपाडा आदी गावांतील अनेक आदिवासी ,शेतमजूर व शेतकऱ्यांच्या घरांची,गोठयांची छप्परे उडाली असून काही घरे कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील कपडे, धान्य,गृहपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणत नासधूस झाली आहे.गुरे, ढोरे व अनेक जण जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून रस्त्यांवर पडल्या होत्या, त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली. काकडी,भेंडी,घोसाळे, कारले,घेवडा आदी. रब्बी पिके व आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कच्च्या आंब्यांचा पडलेला खच बघून शेतकरी त्याकडे हताशपणे बघत होते. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून बधितांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.