Author: bittambatami.com

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील  इतर पालिका सदस्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली तर डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीकच्या परिसरात उपमहापौर राहुल दामले व इतर पालिका सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सह १०० पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या प्रभागांतही मनपा स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पालिका सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आमदार राजेश मोरे व सुलभा गायकवाड यांनी देखील इतर पालिका सदस्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ ,माती साफ सफाई करून घंटागाडी,डंपर मार्फत संकलित करण्यात आली. सुमारे १७५८० किलो ओला कचरा आणि ४६९९६ सुका कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४००० सदस्य व महापालिकेचे जवळपास १००० कर्मचारी तसेच पालिका सदस्य सहभागी झाले होते.

 कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन कॅनेडियन शिष्टमंडळासाठी स्वागत कार्यक्रम मुंबई : (अशोक गायकवाड )—जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे. महाराष्ट्रही हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगतीचा ठसा उमटवत आहे. कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी आहेत. कॅनडा येथील शैक्षणिक संस्था, उद्योजक यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन, कॅनडातील न्यू ब्रन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट व शिष्टमंडळासाठी आयोजित स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबईला दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागात विकासाच्या मोठ्या संधी आहेत. तसेच नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी विदेशातील नामांकित विद्यापीठे आपले शैक्षणिक दालने उघडणार आहेत. आतापर्यंत पाच विद्यापीठांना ‘ लेटर ऑफ इन्टेंट’ देखील देण्यात आले आहे. विद्यापीठांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन काम करीत आहे. महाराष्ट्र हे ६० टक्के २७ वर्ष वयापर्यंत लोकसंख्या असलेले राज्य आहे. कॅनडा येथे राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे कॅनडा येथील विद्यापीठांनी महाराष्ट्रात येत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’ मध्ये आपली शैक्षणिक दालने उघडावी. कॅनडा कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन यामध्ये मोठे काम करीत आहे. कॅनेडियन शासनाने यासाठी व्यवस्था उभ्या केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी डाटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, स्टार्टअप आदी क्षेत्रात कार्य करीत आहे. नुकतीच कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरती यशस्वी वैचारिक मंथन करणाऱ्या परिषदेचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले. कृषी विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून डिजिटल व्यासपीठावर आणण्यात आले आहे. याकरिता राज्य शासन महाविस्तार उपक्रमही राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. महाराष्ट्र पण त्याला अपवाद नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम आपल्या द्विपक्षीय संबंधांची खरी सुरुवात आहे. भविष्यातही कॅनडाने अशाच प्रकारे भारत आणि महाराष्ट्राला भेट देण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना मोठा इतिहास असल्याचे सांगत भविष्यातही हे सहकार्य असेच दृढ होत राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच कॅनडाच्या न्यू ब्रन्सविकच्या राज्याच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रन्सवीकमधील सहकार्य आणि संबंधाविषयी भाष्य केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ पी अनबलगन यांनी राज्य शासनाच्या उद्योग धरण आणि ‘ इज ऑफ डूइंग बिझनेस’ विषयी सादरीकरण केले. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांविषयी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एज्युसिटी, मेडिसिटी एरोसिटी, खारघर येथील आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र याविषयी सादरीकरण केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी नवी मुंबई येथे विदेशी विद्यापीठांसाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व राज्यातील उच्च शिक्षणाच्या परिस्थितीविषयी सादरीकरण केले. तसेच मित्रा संस्थेच्या वतीने राज्यातील विकासाच्या परिवर्तनाविषयी चित्रफित दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी केले. कार्यक्रमाला कॅनडियन शिष्टमंडळातील प्रतिनिधी, विद्यापीठांचे प्रतिनिधी, भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके

विज्ञान, वाणिज्य शाखेसाठीही लवकरच मराठीतून पुस्तके विश्व मराठी संमलेनातील परिसंवादात दावा हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत मातृभाषेतील ज्ञानाने आत्मविश्वास विकसित करणे तसेच मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाचे मूळ संस्कृतीत आहे. लवकरच पदवीसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पुस्तके मराठीत आणण्यात येणार असल्याची माहिती अभ्यासक्रमातील मराठी भाषा या विषयावरील परिसंवादात देण्यात आली. येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या आवारात आयोजित विश्व मराठी संमेलनात परिसंवाद झाला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणककर , कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. डॉ. देवळाणकर यांनी, शिक्षणाचे महत्व कमी होत असल्याचे सांगितले. शुल्क किंवा अन्य गोष्टींवर चर्चा होत असतांना परदेशात मात्र शिक्षण आणि शिक्षकाला महत्व आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मातृभाषेला महत्व देण्यावर भर दिला जात असल्याचे नमूद केले. डॉ. सोनवणे यांनी अभ्यासक्रम आणि मराठी या गोष्टींचा विचार करायला हवा. मराठी भाषा आत्मविश्वास निर्माण करते. भाषेमध्ये आपण आशयाचा आधार घेतो. मराठी समृद्धीसाठी भाषा समकेंद्री , शब्द संपदा, व्याकरण यांचा विचार व्हायला हवा. मराठी भाषा तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मांडले. डॉ.आवलगावकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी शैक्षणिक पातळीवर भाषेचा व्यापार, व्यवहार यामध्ये कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे असल्याचे मांडले. शैक्षणिक पातळीवर या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम मराठीत तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये उच्चारण आणि लेखन यावर भर देणे आवश्यक आहे. भाषेशी असणारी आपली नाळ तुटता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ. कुलकर्णी यांनी शब्दकोशाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. डॉ. गोसावी यांनी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत येत असून पुढील वर्षापासून ती मिळतील. विज्ञान आणि भाषा एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. बोलीभाषाही तितकीच महत्वाची असल्याचे मांडले.

व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास

व्ह्यूज पेपर : वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून उलगडणारा कलाप्रवास राजेंद्र साळसकर मुंबई : वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून ते एक कला कॅनव्हास ठरू शकते, याची प्रचिती व्यंगचित्रकार, लेखक, कवी आणि अमूर्त कलावंत प्रदीप म्हापसेकर यांच्या…

 शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात

शासनाचे सुरक्षा रक्षक मंडळ हप्तेखोरीच्या विळख्यात मंडळाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप, रक्षक संतप्त रमेश औताडे मुंबई : नवी मुंबई येथील वाशी परिसरात शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळातील पर्यवेक्षकाला लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर शासनाच्या या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९८१ साली स्थापन झालेल्या या मंडळाला ४६ वर्षाहून अधिक काळ लोटला असताना, आजही या मंडळात कामगार मंत्री व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार, संगनमत आणि हप्तेखोरीच्या आरोपांनी मंडळातील वातावरण गढूळ झाल्याची चर्चा सुरक्षा रक्षक व कामगार विभागात सुरू आहे. काही सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे की, मंडळातील अध्यक्ष, सचिव, निरीक्षक, क्लार्क आणि काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमतामुळे खाजगी सुरक्षा ठेकेदारांकडून नियमित आर्थिक व्यवहार (हप्ते) चालतात. ‘पोस्टिंग, ड्युटी वाटप, हजेरी नोंदणी, कंत्राट नूतनीकरण अशा प्रत्येक टप्प्यावर दबाव टाकला जातो. पैसे दिले तरच काम सुरळीत चालते,’ असा गंभीर आरोप काही रक्षकांनी केला आहे. काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, सुरक्षा रक्षकांकडून दरमहा कपातीच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. वेतनवाढ, पीएफ, ईएसआय, सुट्ट्या आणि इतर हक्कांबाबत सातत्याने टोलवाटोलवी केली जाते. ‘मंडळ सरकारचे आहे. पण निर्णय मात्र खाजगी ठेकेदारांच्या फायद्याचे घेतले जातात,’ असा आरोपही करण्यात आला आहे. अध्यक्ष व सचिव बघ्याची भूमिका घेत आहेत. कामगार मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असा कारभार शक्य नाही, असा दावा काही कामगार संघटनांनी केला आहे. ‘तक्रारी दिल्या जातात; पण त्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रारदारांनाच त्रास दिला जातो,’ असा आरोप एका संघटनेच्या नेत्याने केला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार युनियनचे नेते लक्ष्मणराव भोसले यांनी निवेदन देत मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी, आर्थिक लेखापरीक्षण आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कायद्याची व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार मंत्री यांना २० पानाचे सविस्तर एक निवेदन दिले आहे.त्या निवेदनात मी असे म्हटले आहे की, कामगार कायद्याप्रमाणे व शासनाच्या शासन निर्णयात जे म्हटले आहे ते जर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी मनावर घेतले तर व त्याची काटेकोर अंमलबजाणी केली तर सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल. मात्र कामगार मंत्री यांचे बगल बच्चे खाजगी ठेकेदार यांना नाराज करू शकत नाहीत. म्हणून कामगार मंत्री पण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कामगार नेते लक्ष्मणराव भोसले यांनी दिला आहे आहे. काही अधिकाऱ्यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. “मंडळाचा कारभार नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने चालतो. काही नाराज घटकांकडून बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. शासन चौकशी करेल, आम्ही सहकार्य करू,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण आमचेच हक्क असुरक्षित आहेत,”  शासनाने तातडीने सर्वंकष चौकशी करून, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता सुनिश्चित करावी आणि रक्षकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या सर्व आरोपांमुळे सुरक्षा रक्षक मंडळाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता शासन आणि कामगार मंत्रालयाकडून ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण :  शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला ही अत्यंत महत्त्वाची आहे. कला विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देते. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांच्या जन्मजात प्रतिभांना वाव मिळावा या उद्देशाने, कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेल्या नऊ वर्षांपासून ही जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली आहे. आणि हे वर्ष स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुतेक शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावर्षी या स्पर्धेला सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सर्व शाळांमधील सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले. या वर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी या स्पर्धांमध्ये दोन नाविन्यपूर्ण स्पर्धा जोडण्यात आल्या आहेत: एकपात्री अभिनय आणि समूह गायन. या दोन्ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने, सहभागींची संख्या तुलनेने कमी होती, परंतु प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. सुमारे २०० स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. तसेच, स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शाळांनी आयोजक म्हणून काम करणाऱ्या आमच्या बालक मंदिर संस्थेबद्दल स्पर्धकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, २८ फेब्रुवारीला कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  निखिल राणे (स्मायलिंग व्हिसलर), सुधीर चित्ते (रंगकर्मी) आणि रमेश गोरे, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष उपस्थित होते.

 किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत

किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत कल्याण: कल्याणमधील किडनी पेशन्टला  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामबाग शाखेतर्फे रूपये ५० हजार रुपयांची  मदत करण्यात आली.  शिवसेना रामबाग शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक व ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे यांना किडनीचा मोठा आजार झाला. त्यांना आता डायलीसच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस उपचार घ्यावे लागले, मीरा हॉस्पिटल ने त्यांना बिल कमी करून भरपुर सहकार्य केले. त्यांचा डायलीसीसच्या मोठ्या खर्चाचा विचार करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी  मार्गदर्शनाखाली  रामबाग शाखेने तसेच  शिवजयंती उत्सवात तर्फे रू.५० हजरांचा धनादेश देऊन सहकार्य केले.

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, ‘हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’ असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना नाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असे – परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन

आझाद मैदानातील उपोषण दरम्यान पोलीस आयुक्तांना निवेदन रमेश औताडे मुंबई : बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडी  प्रदेशाध्यक्ष लीनाताई अहिर यांनी आझाद मैदानात २१ जानेवारी पासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अद्याप सुरू केले आहे. कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी त्यांनी  ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन दिले. मागणी मान्य नाही झाली तर आंदोलन तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे. कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, संबंधित चालक व जागा मालकांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी लीनाताई अहिर यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निवेदन स्वीकारून महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. लीनाताई अहिर यांनी प्रशासनाला ठोस कारवाईसाठी निश्चित कालमर्यादा द्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकीची होळी होळीच्या एक दिवस आधी रविवार, १ मार्चला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सुमारे ८४ वर्षापूर्वी खंडीत झालेली ही परंपरा २०१५ साली जमात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी सुरु केली. यंदा या उत्सवाचे १२ वे वर्ष होते, त्यामुळे एक गाव एक होळी या संकल्पनेची तपपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली. सुरुवातीला परंपरेनुसार होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदांपत्याला देण्यात आला. त्यानुसार जमात ट्रस्टचे विश्वस्त जमीर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री प्रियंका विहंग कोळी, प्रांजल भावेश ठाणेकर, प्रभुती कैवल्य ठाणेकर, केतकी वैभव ठाणेकर, स्मिता रोहित कोळी, अमृता धीरज पाटील, अक्षता तन्मय कोळी, जागृती जित बारांगुळ, कोमल सन्मान कोळी या दांपत्यांनी होळी मातेची रितसर विधिवत पूजा केली. त्यानंतर कोळी गाण्यांच्या गजरात जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी होळीला अग्नी दिला. चेंदणी कोळीवाड्याचा १२ वा गावकीचा होलिकोत्सव यावर्षी पूर्व ठाण्यात कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला. याआधीचे सात पूर्वेत आणि पाच उत्सव पश्चिम भागात साजरे झाले. गावकीची ही परंपरा पुन्हा सुरु करण्यात जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी विरोध सहन करून पुढाकार घेतला होता. यासंदर्भात चंद्रकांत नाखवा म्हणाले, चेंदणी कोळीवाड्यात एक गाव एक होळी ही परंपरा खूप आधी सुरु होती. पण ८५ वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली. २०१५ साली  जमात ट्रस्टचा अध्यक्ष असताना पुन्हा एक गाव एक होळी ही संकल्पना पुढे आली. मी आणि माझ्या कार्यकलरिणीतील सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत सुरुवात केली. त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला, पण त्यांची समजूत घालण्यात आली. त्यावेळी हरियाली तलावाचा काही भाग सुकला जायचा. त्याठिकाणी होळी लावली जात असे. २०१५ साली हा उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी एक अट टाकली. होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर लागणारी कुटुंबीयांची होळीही दारात लागणार. माझ्या कार्यकारीकरिणीसह सर्वांनी गावकीची ही अट मान्य केली. २०१५ साली गावाचा पाटील म्हणून मला होळी पेटवण्याचा मान देण्यात आला.  पश्चिम विभागात होळी लावण्यासाठी लागणारा गाडा मी उपलब्ध करुन देतो. होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदाम्पत्याला देण्याची प्रथा आजही पाळली जाते. तरुण वर्गानेही सक्रिय होत या उत्सवात काळाप्रमाणे बदल केलेत. होळीसाठी म्हणून दरवर्षी ड्रेसकोड असतो. त्यालाही गावकीचा चांगला प्रतिसाद असतो. उत्सव साजरा करताना बदल पाहिजेत. आतापर्यंत तन,मन, धनाने माझा सहभाग असतोच तो नेहमीच असेल.