Author: bittambatami.com

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा –  भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी

सहा वर्षे, हिमालयाएवढा लढा –  भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी बालताल (जम्मू-काश्मीर), ९ जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअऱींगच्या  शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा होता, जो क्वचितच कोणी विसरू शकेल. १३.१५३ किमी लांबीचा झोझिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला आहे. तरीही, यामागे जगातील सर्वात बांधकाम करण्यास कठीण परिस्थितींपैकी एक  असलेल्या ठिकाणी दाखवलेल्या जिद्दीची आणि चिकाटीची मानवी कहाणी दडलेली आहे. जवळपास सहा वर्षे, मेघा इंजिनीअरीगंच्या बांधकाम पथकांनी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर काम केले आणि अनेकदा उणे ३० अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाचा सामना केला. हिवाळा केवळ थंडी घेऊन आला नाही, तर त्यासोबत हिमस्खलनाचे संकटही ओढवले. मेघा इजिनीअरींगच्या  प्रकल्पात १,२०० हून अधिक लोकांनी योगदान दिले, ज्यामध्ये जवळपास ८० टक्के लोक जम्मू-काश्मीरमधील स्थानिक समुदायांमधील होते. त्यांनी संपूर्ण भारतातील बोगदा-बांधणी तज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, सुरक्षा तज्ञ आणि यंत्रचालक यांच्यासोबत काम केले. कामकाज अविरत चालू ठेवण्यासाठी, पर्वतांमध्ये एक संपूर्ण यंत्रणा (इकोसिस्टिम) उभी करावी लागली. कामगार विशेषतः विकसित केलेल्या छावण्यांमध्ये राहत होते; या छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वयंपाकघर आणि चोवीस तास काम सुरू ठेवण्यास सक्षम अशा निवासस्थानांची सोय होती. कारगिल आणि लडाखच्या रहिवाशांसाठी, हा प्रकल्प आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवनावश्यक वस्तूंचा अधिक विश्वसनीय पुरवठा करण्याचे काम करेल. व्यापाऱ्यांसाठी मालाचा पुरवठ्यातील अनिश्चितता कमी होईल. पर्यटकांसाठी, यामुळे वर्षभर प्रवास करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, अनेक स्थानिक कुटुंबांसाठी हा बोगदा  अधिक वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक आहे: ते म्हणजे हंगामी विलगीकरणाचा अंत. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात जेव्हा कामगार बोगद्याच्या जोडणीच्या ठिकाणाहून बाहेर आले, तेव्हा हे यश केवळ अभियंते आणि यंत्रांचेच नव्हते, तर त्या हजारो लोकांचेही होते ज्यांनी हवामान, उंची किंवा भौगोलिक परिस्थितीला आपल्या मार्गातील अडथळा बनू दिले नाही. हिमालयाच्या कुशीत त्यांनी पर्वताला छेदून एक मार्ग तयार केला आहे — आणि कदाचित संपूर्ण प्रदेशाचे भविष्यच बदलून टाकले आहे.

इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात

उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कामाला सुरुवात सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले. महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आज वह्यावाटप आणि सत्कार ठाणे : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप व ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे. भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चिंतामणी कोळी यांच्यातर्फे सलग १९ व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ठाणे शहरातील गरजू विद्यार्थी व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.

वाढवण बंदर प्रकल्पामुळे तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी प्राप्त होणार

वाढवण बंदर प्रकल्पामुळे तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी प्राप्त होणार रवींद्र चव्हाण यांचे भारत लीडरशिप समिटमध्ये आश्वासक वक्तव्य मुंबई : लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नुकताच मुंबईतल्या अंधेरी येथे “भारत लीडरशिप समिट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक आणि मनोरंजन वर्तुळातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली.६ जून रोजी अंधेरी पूर्व येथील कोर्ट यार्ड बाय मॅरीएट येथे या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.”सन्मान गुणवंतांचा संवाद महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा” या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये अनेक महत्त्वाचे विषय मांडले गेले. महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि राज्य व देश हिताच्या विषयांवर राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमात सखोल चर्चा केली. यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र चव्हाण आणि युवा नेते सिद्धेश कदम यांच्यातील चर्चा चांगल्याच रंगल्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लोकशाही समूह नवीन इंग्रजी वृत्तवाहिनी लॉन्च करत असण्याची घोषणा करण्यात आली. लोकशाही इंग्लिश या नावाने लवकरच इंग्रजी वृत्तवाहिनी कार्यान्वित होणार आहे. भारत लीडरशिप समिटमध्ये आपले विचार मांडताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबत अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याला तब्बल ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सध्या या ठिकाणी मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांचे माध्यमातून बंदरे कार्यान्वित असली तरी देखील त्यांच्या मर्यादा ध्यानात घेता या ठिकाणी जागतिक स्तरावरील बंदराची निर्मिती झाली पाहिजे अशी सर्वांचीच धारणा होती. परंतु आमच्या अगोदरच्या सरकारांनी फक्त विचार केला, त्याला मूर्त आणि वास्तव स्वरूप दिले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. तब्बल ७२ हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वाढवण बंदर उभे राहत आहे. ज्याप्रमाणे जे एन पी ए नजीक नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले आहे तशाच पद्धतीने वाढवण बंदरा नजीक देखील विमानतळ कार्यान्वित करण्याचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भारतात २० मीटर खोली असलेल्या बंदराचा अभाव असल्याने मालवाहू जहाजांना प्रथम कोलंबो (१५ मीटर खोल) किंवा सिंगापूर (१२ मीटर) या बंदरावर माल उतरावा लागतो. जो नंतर लहान मालवाहू जहाजातून जेएनपीटी (११ मीटर खोली)सारख्या भारतीय बंदरांवर येतो. आपला आयात-निर्यातीचा ९०% माल समुद्रमार्गे जात असल्याने आयातदार व निर्यातदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. यासाठी भारताला पश्चिम किनाराऱ्यावर २० मीटर खोलीचे बंदर झाल्यास मालवाहतूक वाढेल. कंटेनर जहाजांचा वाढता आकार असल्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल कंटेनर पोर्ट विकसित होणेही अत्यावश्यक आहे. वाढवण किनाऱ्याजवळ जवळपास २० मीटरची नैसर्गिक खोली आहे, ज्यामुळे बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणे शक्य होईल. या बंदराच्या विकासामुळे १६०००-२५००० टीईयू क्षमतेच्या कंटेनर जहाजांची वाहतुकीसाठी कॉलिंग सक्षम झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा फायदा होऊन इतर खर्च कमी होईल. या समिटमध्ये लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर हे देखील सहभागी झाले होते तसेच मर्दिनी या मराठी चित्रपटाची टीम देखील सहभागी झाली होती आणि त्यांनी निवोदितांना संधी व अभिनयातील आव्हानांवर आपले विचार मांडले.

 अनिकेत तटकरे यांचा विजय दादांना समर्पित

 आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई – सुनिल तटकरे मुंबई : पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि अनिकेतचे वडील म्हणून बिनविरोध निवडीचा विजय आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादांना समर्पित करतानाच आज जे काही यश मिळवू शकलो ही दादांची पुण्याई आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच सुनिल तटकरे आणि पदाधिकाऱ्यांनी दादांना अभिवादन करून या विजयाचा आनंद पेढे भरवून साजरा केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने एक अभूतपूर्व यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनिकेत तटकरेंच्या रुपाने मिळवले आहे त्यामुळे या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार सुनिल तटकरे यांनी मानले. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अंत:करणापासून आभार मानतानाच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडील शब्द भांडारात शब्द कमी पडले आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. या मतदारसंघात शिवसेनेची संख्या जास्त होती. गेले काही दिवस समज – गैरसमज जे काही होते. या सगळ्या पार्श्वभूमी एकनाथ शिंदे यांनी समन्वय घडवून आणण्यात महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, मंत्री योगेश कदम, आमदार भरत गोगावले, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार रवी पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह संबंध महायुतीतील नेत्यांचे याशिवाय सर्व मतदारांचेही आभार सुनिल तटकरे यांनी मानले. राजकारणात वावरत असताना संयम, समन्वय, आणि परस्परांबद्दल असलेला आदर योग्य पध्दतीने राखला तर त्यातून पाठबळ मिळते. या निवडणुकीत कमालीचे यश मिळाले आहे. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. ०००००००

नगरपरिषदेच्या आवारातील रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती व्हावी– किशोर मोरे

मुकुंद रांजाणे माथेरान : नगरपरिषदेच्या बी. जे. हॉस्पिटल आवारातील रस्ता खराब झालेला असून रस्त्यात  दगडगोटे असल्याने याठिकाणी एखाद्या रुग्णाला हातरीक्षा असो किंवा ई रिक्षातून आणताना रुग्णाचे हाल होत असतात. एखाद्या गर्भवती महिलेला या वाहनातून आणण्यासाठी तर हा रस्ता खूपच त्रासदायक बनला आहे.या छोट्याशा रस्त्यासाठी फार काही खर्च नसून जे या ठिकाणी जुने पेव्हर ब्लॉक पडून आहेत तेच या रस्त्यासाठी वापरले तरी हा रस्ता आणखीन दहा वर्षे सहज तग धरू शकेल. नुकताच या दवाखान्यात सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक किशोर मोरे हे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी हृदयविकाराचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. ई रिक्षाच्या साहाय्याने त्या रुग्णाला आणण्यात आले होते. परंतु दवाखान्याच्या आवारातील ओबडधोबड रस्त्यावर ई रिक्षा सुध्दा चालणे कठीण बनले होते. त्यावेळी डॉ. प्रशांत यादव,  ई-रिक्षा चालक शैलेश भोसले, आणि बी. जे. हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब त्या रुग्णाला व्हीलचेअर मध्ये बसवून वेळेत दाखल करून डॉ. यादव यांनी ताबडतोब प्रथमोपचार केल्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत. कोट रुग्णालयाच्या रस्त्याबाबत यापूर्वी वारंवार प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा निष्काळजीपणामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो.हा रस्ता कोणत्याही वैयक्तिक वाहनांसाठी, घोडेवाले किंवा रिक्षावाल्यांसाठी बनवायचा नाही, तर तो केवळ नगरपालिकेच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सामान्य जनतेच्या रुग्णसेवेसाठी बनवणे गरजेचे आहे. रुग्णालयाचा रस्ता तयार करण्यासाठी कोणाच्याही नाहरकत (NOC) प्रमाणपत्राचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेली सेवा आहे. रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे.नगरपालिकेच्या संबंधित विभागाला तात्काळ आदेश देऊन हा रस्ता २४ तासांत पूर्ण करून घ्यावा.जनतेच्या जिवाचा विचार करून या गंभीर विषयावर त्वरित लक्ष द्यावे. किशोर मोरे—नगरसेवक माथेरान