वाढवण बंदर प्रकल्पामुळे तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी प्राप्त होणार

रवींद्र चव्हाण यांचे भारत लीडरशिप समिटमध्ये आश्वासक वक्तव्य

मुंबई : लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नुकताच मुंबईतल्या अंधेरी येथे “भारत लीडरशिप समिट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राजकीय सामाजिक आणि मनोरंजन वर्तुळातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली.६ जून रोजी अंधेरी पूर्व येथील कोर्ट यार्ड बाय मॅरीएट येथे या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.”सन्मान गुणवंतांचा संवाद महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचा” या संकल्पनेवर आधारित या समिटमध्ये अनेक महत्त्वाचे विषय मांडले गेले.

महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि राज्य व देश हिताच्या विषयांवर राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमात सखोल चर्चा केली. यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक रवींद्र चव्हाण आणि युवा नेते सिद्धेश कदम यांच्यातील चर्चा चांगल्याच रंगल्या. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लोकशाही समूह नवीन इंग्रजी वृत्तवाहिनी लॉन्च करत असण्याची घोषणा करण्यात आली. लोकशाही इंग्लिश या नावाने लवकरच इंग्रजी वृत्तवाहिनी कार्यान्वित होणार आहे.

भारत लीडरशिप समिटमध्ये आपले विचार मांडताना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वाढवण बंदर प्रकल्प उभारणी बाबत अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याला तब्बल ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. सध्या या ठिकाणी मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांचे माध्यमातून बंदरे कार्यान्वित असली तरी देखील त्यांच्या मर्यादा ध्यानात घेता या ठिकाणी जागतिक स्तरावरील बंदराची निर्मिती झाली पाहिजे अशी सर्वांचीच धारणा होती. परंतु आमच्या अगोदरच्या सरकारांनी फक्त विचार केला, त्याला मूर्त आणि वास्तव स्वरूप दिले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच. तब्बल ७२ हजार २२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून वाढवण बंदर उभे राहत आहे. ज्याप्रमाणे जे एन पी ए नजीक नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले आहे तशाच पद्धतीने वाढवण बंदरा नजीक देखील विमानतळ कार्यान्वित करण्याचे व्हिजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे.

वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यानंतर दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. भारतात २० मीटर खोली असलेल्या बंदराचा अभाव असल्याने मालवाहू जहाजांना प्रथम कोलंबो (१५ मीटर खोल) किंवा सिंगापूर (१२ मीटर) या बंदरावर माल उतरावा लागतो. जो नंतर लहान मालवाहू जहाजातून जेएनपीटी (११ मीटर खोली)सारख्या भारतीय बंदरांवर येतो. आपला आयात-निर्यातीचा ९०% माल समुद्रमार्गे जात असल्याने आयातदार व निर्यातदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. यासाठी भारताला पश्चिम किनाराऱ्यावर २० मीटर खोलीचे बंदर झाल्यास मालवाहतूक वाढेल. कंटेनर जहाजांचा वाढता आकार असल्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल कंटेनर पोर्ट विकसित होणेही अत्यावश्यक आहे. वाढवण किनाऱ्याजवळ जवळपास २० मीटरची नैसर्गिक खोली आहे, ज्यामुळे बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणे शक्य होईल. या बंदराच्या विकासामुळे १६०००-२५००० टीईयू क्षमतेच्या कंटेनर जहाजांची वाहतुकीसाठी कॉलिंग सक्षम झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा फायदा होऊन इतर खर्च कमी होईल.

या समिटमध्ये लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकर हे देखील सहभागी झाले होते तसेच मर्दिनी या मराठी चित्रपटाची टीम देखील सहभागी झाली होती आणि त्यांनी निवोदितांना संधी व अभिनयातील आव्हानांवर आपले विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *