Author: bittambatami.com

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य संकेत,दीपाली,सारिका, मुकुंदला रौप्य तर आकाश, शुभमला कांस्य   डेहराडून ः उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर,सांगलीची दिपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रूपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली. पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला  मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिल्ह्याची खेळाडू दिपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मानसिक तंदुरुस्ती भक्कम ठेवीत मात करीत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले. दीपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर  क्लीन व जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅच मध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्टकुल स्पर्र्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकयचे असल्याचे संकेत सरगर यांनी सांगितले. पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौड याने मध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलले. पुण्याजवळील राजगुरूनगरमधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 26 वर्षीय सारिका रेल्वेची खेळाडू असून पुण्यातील वडगाव मावळ येथे अनिकेत निवघणे यांच्याकडून प्रशिक्षण घेते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे. महिलांच्या 45 किलो गटातील  दीपाली हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूणाचा 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती मात्र पंधरा दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्यावर आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय अशी शंका तिला निर्माण झाली मात्र तिचे प्रशिक्षक संतोष सिंहासने यांनी तिला मानसिक आधार दिला त्यामुळे तिने पंधरा दिवस जमेल तसा सराव करीत येथील स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदकाची कमाई करून दिली. मुकुंद हा 21 वर्षीय खेळाडू रेल्वेमध्ये नोकरी करीत असून गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. तो मनमाड येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या मेघा व वीणाताई या दोन बहिणींही राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडू आहेत. मुकुंदचे यश पहाण्यासाठी त्याचे आजोबा एकनाथ , आजी गंगुबाई, आई इंदुबाई व वडिल संतोष आहेर डेहराडून आले होतेे. लाडक्या लेकाचे पदक पाहून सार्‍याचे कुटुंबियाचे डोळे आनंदाने पाणावले होते. आता मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे असल्याने मुकुंद यांने सांगितले. 0000

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

संयमाच्या जोरावर आर्याचे रूपेरी यश, नेमबाजीत महाराष्ट्राचे उघडले खाते   डेहराडून ः उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. संयम व चिकाटी दाखवली की यश हमखास मिळते असे आपण नेहमी म्हणतो हा प्रत्यय आर्या बोरसे हिच्याबाबत दिसून आला. नेमबाजीमधील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या आर्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशुल शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने 252.5 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकणार्‍या आर नर्मदा या तामिळनाडूच्या खेळाडूने 254.4 गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत आर्याने दुसरे स्थान घेत अंतिम फेरीसाठी प्रवेश निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात तिने अन्य दोन खेळाडू समवेत तिने आघाडी घेतली होती. मात्र अठराव्या नेमच्या वेळी ती चौथ्या स्थानावर होती. त्यावेळी तिला पदक मिळणार की नाही अशी शंका निर्माण झाली होती तथापि तिने शेवटच्या चार नेम मध्ये अतिशय संयम आणि आत्मविश्वास दाखवीत पदक खेचून आणले. पदकाची खात्री होती- आर्या गतवेळच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला पदक मिळवता आले नव्हते त्याची खंत मला सतत जाणवत होती. यंदा या स्पर्धेमध्ये आपण पदक जिंकायचेच या दृष्टीने मी भरपूर सराव केला होता त्यामुळेच पदक जिंकण्याची मला खात्री झाली होती असे आर्या हिने सांगितले. यंदा जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या भारतीय संघाच्या निवड चाचणीत भाग घेत सर्वोत्तम यश मला मिळवायचे आहे अर्थात ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत पदक मिळवणे हे माझे मुख्य ध्येय आहे त्यासाठी टप्प्याटप्प्याने माझी वाटचाल असेल असे तिने सांगितले. आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेलो इंडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. महाविद्यालयाकडून तिला भरपूर सहकार्य मिळत आहे त्यामुळेच मी फक्त नेमबाजीच्या सरावावर लक्ष ठेवू शकते असेही तिने सांगितले. रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने अंतिम फेरीत महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू रूद्रांक्ष पाटील व पार्थ माने यांनी पुरुषांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक फेरीत पाटील याने  633.8 गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे तर पार्थ हा तिसर्‍या क्रमांकावर असून त्याचे 632.6 गुण झाले आहेत. 0000

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

जलतरणामध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश हल्दवानी –   उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरणामध्ये सलग दुसर्‍या दिवशी  पदकांचा चौकार झळकविला. सान्वी देशवालचे सोनेरी यश संपादले. चार बाय शंभर मीटर मिडले रिले शर्यतीमधील पुरुष गटात कांस्य तर महिला गटात रौप्यपदक मिळाले तर महिलांच्या डायव्हिंग मध्ये ईशा वाघमोडे हिने रौप्य पदक जिंकले सान्वी देशवाल हिने 4 बाय 100 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सोनेरी यश संपादन केले. तिला ही शर्यत पूर्ण करण्यास पाच मिनिटे 5.49 सेकंद वेळ लागला. पुरुषांच्या विभागात चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत कास्यपदक मिळवताना महाराष्ट्राच्या संघात ऋषभ दास, पृथ्वीराज डांगे, मिहीर आम्ब्रे हीर गितेश शहा यांचा समावेश होता. त्यांनी हे अंतर पार करण्यास तीन मिनिटे 48.31 सेकंद वेळ लागला महिलांच्या चार बाय शंभर मीटर्स मिडले रिले शर्यतीत महाराष्ट्राला रुपेरी यश लाभले. ऋजुता राजाज्ञ,ज्योती पाटील, प्रतिष्ठा डांगी व आदिती हेगडे यांच्या समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत चार मिनिटे 31.29 सेकंदात पार केली. मुलींच्या दहा मीटर प्लॅटफॉर्म ड्रायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिला रौप्य पदक मिळाले तिने या प्रकारात 175.50 गुणांची नोंद केली. 0000

मोहिनी महागड्या घरांची आणि कोळंबीची!

  अर्थव्यस्थेची दिशा दाखवणाऱ्या काही बातम्यांमुळे या क्षेत्राची दिशा उलगडते. अस्थिर बाजारातही ‌‘सिक्युरिटी ट्रांझॅक्शन टॅक्स‌’ संकलनात 75 टक्के वाढ होणे ही यासंदर्भातील पहिली ताजी बातमी. एक कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांना…

देशात मानवी शरीरात प्रथमच यांत्रिक हृदय

  डॉ. अजिंक्य बोऱ्हाडे देशात पहिल्यांदाच माणसाच्या शरीरात यांत्रिक हृदयाचा ठोका सुरू झाला आहे. यांत्रिक हृदय प्रत्यारोपणाने एका महिला रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. दिल्ली कँट आर्मी हॉस्पिटलने प्रथमच ‘लेफ्ट व्हेंट्रिक्युलर…

श्री गजाननाच्या जन्मामागील व्यापक दृष्टिकोन !

कोणतेही शुभकार्य म्हटले की सर्वप्रथम पूजन केले जाते ते श्री गणेशाचे. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी आहे त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कोणीतीही देवता कार्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. श्री गणेशाने दिशा…

चोख आपत्ती व्यवस्थापन शिकणार कधी?

देशात 2006 मध्ये आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर आपत्ती निवारण कक्ष कार्यरत असतात. खारघर, हाथरस, दतिया, वैष्णोदेवी, मोरबी आणि आता प्रयागराजच्या घटनांच्या वेळी…

महाडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासकीय जमीन देण्याचा नवा जीआर काढा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना राजेंद्र साळसकर मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी शासकीय जमीन ठरली होती त्याचा नवीन शासन निर्णय काढावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाने प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गांवर महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना महत्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी या रुग्णालयांत यावे लागते. परंतु येथे सोयी-सुविधांची वाणवा असल्याने येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न्यावे लागते. याची दखल घेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडला २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली होती. तसेच तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहारही केला होता. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास शासनाने मंजुरी दिली व २८ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला. तसेच १४७ कोटींच्या या कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. केंबुर्ली येथील स. नं. ५२/२ व ५३/२ अ मधील १५ एकर जमिनीचा ताबा देण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र या जमिनीऐवजी स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयासाठी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना पाठवला होता. असे असताना स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय का काढला? असा सवाल करत महसूल मंत्र्यांकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार आज याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली व महसूल मंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शासकीय जमीन देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा, असा सूचना संबंधित विभागाला दिल्या. या बैठकीला प्रविण दरेकर, महाड १९४ भाजपा विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त जगन्नाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार

कल्याण : अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर एकाच दिवशी 80 हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबूक मध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. जगन्नाथ शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. रेमडेसिवीर यांसारखी त्यावेळी दुर्मीळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांच्या जीवन मरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करूनही त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे. एका दिवसात ८० हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते. त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत रहा आणि दुवा घेत रहा असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड आदींसह इतर अनेक मान्यवर  उपस्थित होते.