Author: bittambatami.com

अखेर डोंबिवली पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण कल्याण :  भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या.  त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे. चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या संप पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.  वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे राजू नगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळण्यात येते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान पाळून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती पनवेल : पनवेल मधील कलाक्षेत्रातील सरगम संगीत अकॅडमीच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला शेकापचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी भेट दिली. शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर कार्यक्रम “राग एक-रंग अनेक” याची गाण्यांची खूप सुंदर मैफिल होती. अल्पावधीतच नरेश पाटील यांनी १०० पेक्षा जास्त कलाकारांमधील गायनाचे गुण ओळखून त्यांना एक सुमधुर गायक बनवून आपले चांगले शिष्य निर्माण केले आहे. यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या सोबत संजीवनी जाधव (सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेत्री), गणेश पाटील (माजी उपनगराध्यक्ष पनवेल), प्रीती जॉर्ज (माजी नगरसेविका पनवेल), माधुरी गोसावी,  करुणा ढोरे यांच्या सह समस्त विद्यार्थीवृंद उपस्थित होते.

केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! पनवेल : भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस 600 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी भाजप नेते वाय.टी.देशमुख,टीआयपीलचे संचालक अमोघ ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर म्हणाले की,केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे.अतिशय मेहनतीने,जिद्दीने ते पक्ष कार्य करत असतात.त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रम शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला.त्यामुळे केदार भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले.यावेळी विशाल सावंत,सुमित दसवते, फिरोझ शेख, राजेंद्र भगत,नितेश भगत,रवी पारचे, संतोष वर्तले,चिन्मय भगत, चेतन म्हसकर,यज्ञेश पाटील,ब्रिजेश बहिरा, जयदीप भगत, संकेत दसवते, अभिषेक भालेकर, निहाल पाटील, शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते.

मोडीची गोडी प्रचारक बनून इतरांनाही लावा- प्रशांत सातपुते

अशोक गायकवाड रत्नागिरी : सराव माणसाला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करुन तिची गोडी प्रचारक बनून इतरानांही लावा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोप प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरालेखागार संशोधन सहायक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहायक लक्ष्मण भिसे उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते म्हणाले, कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर, आत्मसात केल्यानंतर ती कायमस्वरुपी दृढ करण्याच्या दृष्टीकोनातून तिचा सराव करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. मोडीलिपीचे घेतलेले ज्ञान हे स्वत:पुरते मर्यादित न ठेवता तिचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून प्रचारक म्हणून काम करा, असे सांगून मोडीचा इतिहास, भाषानिर्मिती आणि बोरु या विषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. साखळकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महाविद्यालयात घेतलेल्या मोडीलिपी प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. मिळालेल्या नवीन कौशल्याच्या आधारावर व्यक्तीमत्व विकास त्याबरोबरच करिअर देखील उंचावता येते. संशोधन सहायक वाडकर यांनी मोडीलिपी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. पंकज घाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रशिक्षणार्थींनीही आपला अनुभव कथन केला. प्रा. मधुरा चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी ओंकार आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

पगार नसल्याने गिरणी कामगारांची निदर्शने

रमेश औताडे मुंबई : मुंबईतील एनटीसीच्या चार बंद‌ गिरण्यातील कामगा रांच्या थकीत पगारावर राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी‌ निदर्शने केली. संघटनेचे‌ अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार  हे निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले. गेल्याच महिन्यात २४ डिसेंबर रोजी गिरणी कामगा रांनी तीन‌ महिन्या पेक्षा अधिक काळाच्या थकीत पगारासाठी एनटीसी व्यवस्थापनाला घेराव घालून,आपला संतप्त राग व्यक्त केला होता.त्यावेळी एनटिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांकुमगुणा यांनी दिल्ली होर्डींग्ज कंपनीशी बोलणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते. पण या प्रश्नावर संघटनेने‌ सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाने अकारण कालापव्यय लावला.त्यामुळे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने उपासमारीने त्रस्त कामगारांच्या प्रश्नावर हे निदर्शनाचे पाऊल उचलले. खजिनदार‌ निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रधान कार्यालयावर तिव्र निदर्शने केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील देशभरातील चालू असलेल्या २३ गिरण्या सन २०२० मध्ये कोविडचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या, त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत.रामिम संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिट णीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समन्वयक कृती समिती स्थापन करुन दिल्ली संसदेवर आंदोलन छेडण्यात आले. या प्रश्नावर खासदारांच्या  शिष्टमंडळाकडून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेटही घेण्यात आली होती.परंतु या प्रश्नावर केंद्र सरकारने पहिल्या पासूनच नरो वा कुंजोरोची भूमिका घेतली.या गिरण्यात मुंबईतील टाटा,इंदू मिल क्र.५,पोद्दार, दिग्विजय तसेच बार्शी,अंमळनेर या महाराष्ट्राच्या सहा एनटीसी गिरण्यांचा समावेश आहे.मुंबईतील गिरण्या म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी या द्रुष्टीकोनातून पाहिले गेले आहे. मुंबईसह राज्यातील सहा एनटीसी गिरण्यांच्या गंभीर परिस्थितीकडे  लक्ष वेधण्यासाठी मुंबईत किमान तीन‌‌ वेळा गिरगावात अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली.एनटीसी गिरण्यांची स्तावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. देशातील  इस्पितले,सरकारी‌ कार्यालये आदी ठिकाणी लागणारे कापड खरेदी एनटीसी गिरण्यां मधून सक्तीने‌ झाली तर‌ या गिरण्या सुस्थितीत चालू शकतील,शिवाय या गिरण्यांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, ही संकल्पना आमदार सचिनभाऊ अहिर यांनी मांडली होती.या गिरण्या सरकारला चालवाव्या लागतील अन्यथा कामगारांना मागील पगार द्यावा लागेल.गेल्या पाच वर्षांत सेवावृत्त झालेल्या कामगारांना त्यांची न्याय देणी द्यावी लागतील.

ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत

यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबविली असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्यातील बिल्डरांनीही घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाच्या काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांनी घराची २० टक्के रक्कम भरली तर, त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३० लाखांपासून ते कोटी रुपयांच्या किंमतीची घरे असणार आहेत. ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यात होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा आणि जय वोरा उपस्थित होते. ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन  ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाईल, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून प्रदर्शनस्थळापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रदर्शनात एका इमारतीबरोबरच प्रशस्त गृहसंकूले आणि परवडणाऱ्या घरांपासून उत्तम जीवनशैलीतील आलिशान घरे, व्हिला, कार्यालयीन जागा, दुकाने असे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल. अनेक गृहसंकूलांमध्ये छोटे वन बीएचकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याला अपेक्षित किंमतीनुसार घरांची निवड करता येतील. तसेच गृहसंकुलातील सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन तुलना करता येईल. तसेच सुरक्षित व सोयीस्कर घराची निवड करता येईल. यामध्ये ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. यामुळे प्रदर्शनात ३० लाखांपासून पुढे कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. कशेळी-काल्हेर भागातील काही घरेही प्रदर्शात विक्रिसाठी असतील, असेही मेहता म्हणाले. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील, असेही ते म्हणाले. प्रदर्शनाची वैशिष्टये सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले, ठाणे पूर्व रेल्वे स्टेशबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वैलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृह प्रकल्प स्टाॅल, १५ हून अधिक वित्त संस्था, २५ हजारांहून अधिक घरखरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दिड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

मुंबई पोर्ट रुग्णालयातील परिचारिकांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार सोहळा संपन्न

मुंबई : वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या  रुग्णालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी. जया धिरवाणी, नर्सिंग सिस्टर इन्चार्ज अश्विनी सकपाळ, नर्सिंग सिस्टर. पूजा चव्हाण आणि स्नेहा माळी यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने २८ जानेवारीला रुग्णालयाच्या गार्डन मधील लॉनवर ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. सेवानिवृत्त चारही कर्मचाऱ्यांचा युनियनच्या वतीने तसेच इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने  शाल,  पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. या प्रसंगी चारही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गुणगौरव ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस के शेट्ये,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी  डॉ. विराज पुरोहित, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. संदीप बिरारीस,  डॉ. सुजाता मोकल, सुलोचना शिंदे इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन केला. सत्काराला जया धिरवाणी, पूजा चव्हाण,  मनीषा सकपाळ व स्नेहा माळी यांनी उत्तर दिले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस सेच चिकित्सा विभागाच्या वतीने , वरिष्ठ उपमुख्य चिकित्सा अधिकारी, मेट्रन मेघा सोबाळकर, डॉ.  प्रणीला पुरोहित, असिस्टंट मॅट्रेन सौ बांदेकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण हॉस्पीटल मधील सर्व अधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तसेच अल्फाकॉम हाऊस कीपिंग सर्विसेस लिमिटेड मधील सर्व कर्मचारी प्रामुख्याने विशेष उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची सुत्र संचालनाची जबाबदारी नर्सिंग सिस्टर्स निशा बोरगांवकर,  शीला भगत व योगिनी दुराफे  यांनी आपल्या रसाळ आणि मधूर वाणीने करून संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्याची जबाबदारी सांभाळली. गार्डनमधील लॉनवर  इव्हेंट मॅनेजमेंट करणारे स्नेहा माळी यांचे चिरंजीव स्मित माळी यांनी सत्कार सोहळ्याची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती.  त्याबद्दल त्यांचा प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. विराज पुरोहित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रस्तावित आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घाला – धर्मराज्य पक्ष

अनिल ठाणेकर ठाणे : हिरानंदानी-वाघबीळ परिसरासह ठाणे शहरातील इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट, त्वरित बंद करण्यात येऊन, नवीन आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी करुन, याप्रकरणी राज्य शासन आणि ठाणे महापालिका प्रशासनाने ठोस पाऊले न उचलल्यास, ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशारा महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी दिला आहे. गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. परिणामी, घोडबंदरचे आता धूळबंदर असे नामांतर झाल्यास, आश्चर्य वाटायला नको. याच पार्श्वभूमीवर, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, घोडबंदर महामार्गावरील प्रस्तावित आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, हिरानंदानी-वाघबीळ याठिकाणी, गेल्या काही महिन्यांपासून एका मोठ्या गृह प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच, पर्यावरणमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र लिहून, आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी मागणी केली आहे. मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. यासंदर्भात, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने १ जानेवारी रोजी, पत्र पाठवून (संदर्भ क्र. धराप/सस-मराप्रनिमंमुं/ मनपाआ-ठामपा/२०२४/७७) वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र, प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच, याअगोदर घोडबंदर महामार्गावरील वृक्षतोडीसंदर्भातही हिरानंदानी या व्यवसायिकाच्या विरोधात लिखित तक्रार करण्यात येऊनही, महापालिका प्रशासनाने आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांनी त्याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले होते. याच पार्श्वभूमीवर, महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी पाठविलेल्या पत्रात प्रशासनाला सूचित केले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध घालण्याबरोबरच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या हिरानंदानी-वाघबीळ परिसरात, एका आरएमसी प्लांटचे काम प्रस्तावित असून, त्यावर त्वरित बंदी घालण्यात यावी. आरएमसी प्लांटच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती प्रणाली उभारणे, उत्सर्जन कमी होण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, प्लांटमधून ये-जा करणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणे, कच्च्या मालाच्या हस्तांतरणाचे क्षेत्र बंदिस्त ठेवणे, अशा बाबींचा समावेश करावा. दरम्यान, हा प्लांट उभारला गेल्यास, इथल्या निवासीक्षेत्राला, सिमेंट निर्मितीद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा मोठ्याप्रमाणात त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, असे धर्मराज्य पक्षाचे महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.

दिवा येथे २ फेब्रुवारीला कुणबी समाजाचा स्नेह मेळावा

ठाणे : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड च्या वतीने कुणबी समाजाचा स्नेह मेळावा, हळदीकुंकू समारंभ व दिनदर्शिकेचा वितरण सोहळाचे आयोजन रविवार 2 फेब्रुवारीला  सायंकाळी 4 वाजता दिवा येथील साऊथ इंडियन इंग्लिश स्कुल हॉल, दिवा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक आठ समोर, सुरेश नगर, दिवा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी रत्नागिरी खेड तालुक्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, येथील समाज बांधवांनी  व महिलांनी हळदीकुंकू समारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे.अधिक माहितीसाठी 9653391877 या नंबर संपर्क करावा, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड अध्यक्ष शंकर  बाईत यांनी केले आहे.