Author: bittambatami.com

विठ्ठल घाडगे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांची45 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ठाणे  : ठाणे शहरातील सुधागड तालुका रहिवाशांच्या सेवेसाठी झटणारी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण…

 नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्याचा शासन आदेश निर्गमित 

 खासदार नरेश म्हस्के यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींचे आभार   मुंबई : गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण या तालुक्यांमधील प्रकल्पग्रस्त गेले ४० वर्ष संबंधित प्राधिकरण आणि शासनस्तरावर प्रयत्न करत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. आज नगर विकास विभागाने जीआर काढत ही बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींचे खासदार नरेश म्हस्के यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासन आदेश निघूनही अडचणी येत होत्या. मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत तात्काळ बैठक घेण्याचे आदेश दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागात 11 सप्टेंबर 2024 रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सिडको अधिकारी आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्यात चर्चा झाली. 25 फेब्रुवारी 2022 आणि 7 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या आदेशामधील त्रुटी दूर करत प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार आदेशात दुरुस्ती करुन नवीन जीआर काढण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक सिआयडी – 3317/प्र.क्र.94/नवि-10 नुसार गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित करत असल्याचा आदेश काढला आहे. या शासन निर्णयानुसार 25 फेब्रुवारी 2022  पर्यंतची प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित झाली आहेत. प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, माजी नगरसेवक शिवराम पाटील, किशोर पाटकर, स्थानिक शिवसैनिक आणि भूमिपुत्र यांच्या सहकार्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत. 00000

 पावसाळी अधिवेशनातील आश्वासनाचे घोंगडे भिजत

हिवाळी अधिवेशनची तयारी सुरू झाली असताना रमेश औताडे मुंबई :  मागील पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी  बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता हिवाळी अधिवेशन आले तरीही त्या…

 डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा

 बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा-  श्रीकांत शिंदे   कल्याण : ‘आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे महायुतीला धक्का लागणार नाही, अशी कोणतीही कृती कोणत्याही शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्याने करायची नाही. शिवसेनेच्या डोंबिवली विभागातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी महायुतीकडून जो उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिला जाईल, त्याच्यासाठीच जोमाने काम करायचे आहे,’ असा सल्ला कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी, नेत्यांना दिला. डोंबिवलीत शिंदे गटातून बंडखोरी करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून किंवा अपक्ष म्हणून भाजप उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या एका युवा नेत्याला आम्ही तुमच्या पाठीशी नाहीत, असा इशारा यानिमित्ताने खासदारांनी दिला. गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा खास समर्थक म्हणून ओळखला जाणारा एक युवा नेता विविध पक्षातील आपल्या ज्ञातीमधील १२ हून अधिक नगरसेवक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. तसे वातावरण या युवा नेत्याने तयार करण्यास सुरुवात केली होती. गणेशोत्सव काळात या युवा नेत्याने आगरी समाजासह डोंबिवलीतील विविध ज्ञातीमधील ज्येष्ठांच्या भेटी घेऊन आपण आगामी विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत देण्यास सुरूवात केली होती. वर्षानुवर्षाचा वैरभाव विसरून या युवा नेत्याने गणेशोत्सवाचे निमित्त करून शत्रूंच्या घरात प्रवेश केला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपण हे सगळे खासदार डॉ.शिंदे यांच्या आशीर्वादाने करत असल्याची मल्लीनाथी हा युवा नेता करत होता. स्थानिक शिवसैनिक चक्रावून गेले होते. या युवा नेत्याच्या या हालचालींची ज्येष्ठ शिवसैनिक बालीशपणा, पोरखेळ अशी संभवना करत होते. डोंबिवलीतील हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांना माहीत नव्हता. खड्डे फलक भोवले गेल्या महिन्यात गोकुळ अष्टमीनिमित्त आपण शहरात फलक लावणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना डिवचण्यासाठी या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुक्रवारी वाढदिवस असताना त्याच्या आदल्या मध्यरात्री त्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक डोंबिवलीत लावण्यात आले. फलक छपाईदाराने युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून आपण हे केल्याचे पोलिसांना सांगितले. या विषयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाखडी झाली. युवा नेता बाहेर डोंबिवली परिसरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खा. डॉ.शिंदे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी दोन दिवस बैठका घेतल्या. त्या युवा नेत्याने बंडखोरी केली तर त्याच्या सोबत कोण जाईल, अशी चाचपणी केली. त्यांच्या बंडखोरीचा विचार न करता शिवसैनिकांनी महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, असे स्पष्ट केले. शिवसेना पदाधिकारी बैठकीत असताना युवा नेता स्वत:हून वर्षा निवासस्थानाबाहेर त्याच्या वाहनात बराच उशीर डॉ.शिंदे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. कोट डोंबिवलीतून शिवसेनेतून काही जण निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अशा कोणत्याही प्रवृत्तीला थारा न देता शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवाराचे जोमाने काम करायचे आहे. कोणत्याही ऐकीव, दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याच्या खासदार डॉ.शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसैनिकांना सूचना केल्या आहेत. – राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, डोंबिवली. ०००००

अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक !

प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या ठाणे : कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथील एका अंध दाम्पत्याची फसवणूक करून त्यांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न देता त्यांचे नवजात बाळ छत्तीसगड राज्यातील एका जोडप्याला परस्पर दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंध दाम्पत्याने तक्रार केल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने हस्तक्षेप केल्यानंतर मोहने येथे गणपती नर्सिंग होम नावे दवाखाना चालवणाऱ्या अनुराग धोनी या डॉक्टरविरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथे एक अंध दाम्पत्य राहते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत. यातील अंध महिला पुन्हा तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने ते गावातील गणपती नर्सिंग होम येथे डॉक्टर अनुराग धोनी यांच्याकडे तपासणीसाठी गेले. यावेळी त्यांना हे बाळ नको असल्याचे त्यांनी डॉक्टर धोनीला सांगितले. मात्र आता तुम्ही तीन महिन्यांच्या गरोदर असून गर्भपात करता येणार नसल्याचे डॉक्टर धोनीने त्या अंध दाम्पत्याला सांगितले. मात्र तुम्ही या बाळाला जन्म दिल्यानंतर माझ्या परिचयातील इच्छुक पालकांना दत्तक देऊ शकतात. त्या मोबदल्यात ते पालक तुमचा सर्व रुग्णालयाचा खर्च आणि तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अर्थ साहाय्य करतील असे सांगितले. कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्याने अंध दाम्पत्याने त्यास संमती दिली. मात्र मागील महिन्यात प्रसुती झाल्यानंतर अंध दाम्पत्याशी संवाद न साधता ते बाळ डॉक्टर धोनीने छत्तीसगड येथील कौर नामक दाम्पत्याला थेट देऊन टाकले. यानंतर संबंधित अंध दाम्पत्याने अर्थ साहाय्य आणि रुग्णालयाच्या खर्चाविषयी विचारणा केली असता डॉक्टरने ते देण्यास साफ नकार दिला. यामुळे आमचे बाळ आम्हाला परत द्या, आम्ही त्याचा सांभाळ करू असे सांगितले. मात्र डॉक्टरने बाळ देण्यासह नकार दिला. हा संपूर्ण प्रकार अंध दाम्पत्याच्या शेजारील कुटुंबाला कळला असता त्यांच्या मदतीने एक ते दोन आठ्वड्यांनी बाळ पुन्हा अंध आई वडिलांच्या ताब्यात घेण्यात आले. यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाला हा प्रकार कळताच त्यांनी हस्तक्षेप करून डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर अनुराग धोनी विरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तर त्याने याआधीही अशाच पद्धतीने काही जणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अंध दाम्पत्याची फसवणूक केल्यानंतर डॉक्टर अनुराग धोनी याने प्रसूतीनंतर संबंधित अंध महिलेला स्तनपान बंद होण्याच्या अर्थातच दूध बंद होण्याच्या गोळ्या दिल्या असल्याचाही धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आला आहे. यामुळे अशा पद्धतीचे अतिशय धक्कादायक आणि निंदनीय कृत्य करणाऱ्या डॉक्टर विरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जात असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. 00000

निरुपयोगी, भंगार साहित्यविक्रीसाठी सिलबंद लिफाफे कार्यालयात जमा करा – एन.के.चौधरी

अशोक गायकवाड रायगड : औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल व यंत्रनिगराणी कार्यशाळा व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल या संस्थेमधील निर्लेखित झालेले निरुपयोगी व भंगार साहित्याची दरपत्रके मागवून विक्री करावयाची आहे. त्याकरिता इच्छुक जी.एस.टीधारक भंगार खरेदीदारांनी विहित नमुन्यातील नमुना अर्ज ङिडी.सह २७ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक संस्था, पनवेल एन.के.चौधरी यांनी केले आहे. सदरील भंगार साहित्य संबंधित विभागामध्ये ठेवण्यात आलेले असून सदरचे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने विक्री करणे प्रस्तावित आहे. यामध्ये निरनिराळ्या व्यवसायामधील जुन्या व निकामी झालेल्या यंत्रसामुग्री तसेच भंगार व निरुपयोगी साहित्याचे एम.एस. स्क्रॅप, कॉपर स्क्रॅप, अॅल्युमिनियम स्क्रॅप, ट्युबपट्टी स्क्रॅप, कास्टिंग जॉब इत्यादी विविध प्रकारच्या बाबी समाविष्ट आहेत. या निविदा प्रक्रियेकरिता लिफाफापध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी. (GST) नोंदणी धारक भंगार खरेदीदाराकडुन सिलबंद निविदा मागविण्यात येत असून ज्या खरेदीदाराचे दर कमाल असतील अशा पात्र जी.एस.टी. नोंदणी धारक खरेदीकारास भंगार साहित्याची विक्री करण्यात येईल. विक्री करावयाच्या वस्तू संबंधित विभागामध्ये २१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून पहावयास मिळतील.या कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहित नमुन्यातील अर्ज प्रति निविदारु. ३००/- (ना परतावा) संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येतील. सदर नमुन्यातील अर्जातील माहिती अचूकपणे निविदेसोबत रु. १०,०००/- (अक्षरी रु.दहा हजार मात्र) अनामत रक्कम म्हणून जमा करणे अनिवार्य असेल. सदर रक्कमेचा धनाकर्ष, Registrar, Industrial Training Institute Panvel, Dist- Raigad. यांचे नावाने ङिडी. च्या स्वरुपात करावा. संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा व त्यामध्ये फेरबदल करण्याचा पुर्ण अधिकार प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल हे राखून ठेवीत आहेत. सिलबंद निविदा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता समिती सदस्यांमार्फत प्राचार्यांच्या दालनात उघडण्यात येतील.

 माथेरान-कर्जत मार्गावर नवीन मिनीबस केव्हा उपलब्ध होणार ?

स्थानिकांमध्ये नाराजी माथेरान  : माथेरान साठी २००८ मध्ये कर्जत नेरळ मार्गे माथेरान मिनीबस सेवा सुरू होऊन जवळपास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी असणाऱ्या मिनीबस जुन्या झाल्याने अनेकदा घाटरस्त्यात बंद पडण्याच्या घटना घडत असतात.त्यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात पायपीट करावी लागते. काही महिन्यांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी नवीन बस देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप या कर्जत – माथेरान मार्गावर नवीन बस उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. स्थानिकांनी अनेकदा संघर्षाला सामोरे जाऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी कठोर परिश्रम घेऊन ही मिनीबसची सेवा उपलब्ध करून घेतली होती. या मार्गावर दोन बसेस देण्यात आल्या आहेत परंतु यातील एक बस कर्जत पनवेल अशी फेऱ्या मारत असून एक बस कर्जत नेरळ मार्गे माथेरान अशा फेऱ्या करत आहे. घाट रस्त्यात ही बस वारंवार बंद पडत असते यामुळे शालेय विद्यार्थी,व्यापारी वर्ग त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे मिनीबसच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातून सर्वाधिक भरघोस उत्पन्न मिळत असताना देखील परिवहन महामंडळ इकडे का दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न अनेकांमधून उपस्थित केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या मिनीबस या मार्गावर सुरू व्हाव्यात यासाठी अनेकदा उपोषणे त्याचप्रमाणे स्थानिकांनी,विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील निवेदने कर्जत आगारात त्याचप्रमाणे वरिष्ठांना सुध्दा दिलेली आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलेल्या आहेत परंतु अद्याप इथे नव्याने बसेस सुरू केलेल्या नाहीत त्यामुळे स्थानिकांमधून याबाबत प्रचंड नाराजी दिसून येत आहे. नेरळ कर्जत अथवा बदलापूर या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिनीबस सेवा ही जीवनवाहिनी बनली आहे. आजवर शेकडो विद्यार्थ्यांनी परिसरात जाऊन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याने ही मुले विविध क्षेत्रात,व्यवसायात, नोकरीत चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत तर नियमितपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला स्वस्त आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही सेवा खूपच सोयीस्कर बनलेली आहे. कर्जत तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी ही एकमेव बस असल्याचे बोलले जात आहे.

 सुरेश पोटे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ, फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ कुर्ला येथे संपन्न झाली. सभेची सुरवात श्री. साने गुरुजी यांच्या “खरा तो एकची धर्म” या कवितेने करण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव श्री सुरेश पोटे यांनी केले. ज्ञात-अज्ञात दिवंगतांना श्रद्धांजली, वार्षिक जमा-खर्च मंजुरी, लेखा परीक्षकांची नेमणूक करणे इत्यादी कामकाज झाले. सदर सभेत, निवडणूक अधिकारी अनंत भाटे व यशवंत देशपांडे यांनी अलिकडे पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाची २०२४ ते २०२७ पर्यंतची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली ती खाली नमूद केल्याप्रमाणे आहे. अध्यक्ष सुरेश पोटे, उपाध्यक्ष डॉ रेखा भातखंडे, सचिव मुकुंद फडतरे, सह सचिव राजन फणसीकर, कोषाध्यक्ष सुधीर सावंत, कार्यकारणी सदस्य म्हणून प्राचार्य लता पोवार, बबन पाटणकर, बळवंत पाटील व सुरेश सरनोबत यांची निवड झाली. त्याचप्रमाणे, सर्वसाधारण सभेत संपर्क सचिव दिलीप गाडेकर, संघटक सचिव स्वाती फडके, सांस्कृतिक अध्यक्ष म्हणून प्रतीभा सराफ, निमंत्रित सदस्य उज्ज्वल पाठरे, दिलीप धारकर, विनय पाटील व संजय साने यांची निवड करण्यात आली. सल्लागार पदी विजय औंधे यांची निवड एकमताने करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार-यांनी आपला अल्पपरिचय करून दिला. या सभेस पदसिद्ध अध्यक्ष श्री विजय औंधे व व श्री शरद डिचोलकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नूतन कार्यकारिणी सदस्यांना अध्यक्ष शरद डिचोलकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पोटे यांनी सर्वांचे आभार मानताना आपण सर्वांनी एकत्र व एक विचाराने काम करावे असे आवाहन केले. राष्ट्रगीत गायनानंतर अल्पोपहार करून अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सभा समाप्त झाली.

भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलन

 प्रताप सरनाईक यांच्याकडून २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांनी २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग ‘सनातन राष्ट्रसंमेलना’चे आयोजन केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, भाईंदर येथे दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत हा सत्संग संपन्न होईल. मिरा-भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संगात, शंकराचार्य , साधू महंत सनातन संमेलनात सहभागी होणार आहेत.भाविकांना श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज यांच्या प्रवचनाची पर्वणी लाभणार आहे.सनातन राष्ट्रसंमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदर मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री  श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज उपस्थित राहणार आहेत. तीनही दिवस त्यांचे प्रवचन होईल. तर तिसऱ्या दिवशी प. पू. बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसलेस सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य ‘विद्याभास्कर’ जी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमाम्नाय द्वारकाशारदापीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीश्री सदानन्द सरस्वती जी महाराज, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज कोषाध्यक्ष – राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास (अयोध्या), गजानन ज्योतकर गुरूजी अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींचेही या संमलेनात प्रवचन होणार आहे. मिरा-भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.३० सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.२८ सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच ३० सप्टेंबर रोजी सायं. ५.०० वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येईल. या यात्रेत ५१०० महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होईल. या भागवत सत्संगासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात ४० ते ५० हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १०० महिला व १०० पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत. सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. पहिल्यांदाचो होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक व टीम करीत आहे. ०००००