Author: bittambatami.com

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपाइं रायगड जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत

अशोक गायकवाड   रायगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून रिपाइं जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी मंत्रीपदी वर्णी लागल्याने ना. रामदास आठवले हे मंगळवारी, दि १८ जून २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, कोकण युवा सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, मावळ लोकसभा उपाध्यक्ष पंकज सोनावणे, खालापूर तालुका युवा अध्यक्ष सुनिल सोनावणे, खोपोली शहर अध्यक्ष नितिन वाघमारे, राहुल महाडिक युवा नेते, रुपेश रूपवते खोपोली युवा शहर अध्यक्ष, अशोक गोतारणे , उमरोली पंचायत समिती वार्ड अध्यक्ष निलेश गायकवाड आदींनी आठवले यांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ, पुष्पमालेव्दारे शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले. 00000

सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम

डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अशोक गायकवाड   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग असतो. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम आज तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर.१० सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांनी यशस्वी केली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त्‍ आयुकत्‍ सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली से.१० सानपाडा येथील वृक्षांच्या हरित पट्टयात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन त्यामध्ये १५ गोणी प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करण्यात आला. या मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त्‍ डॉ. अजय गडदे, तुर्भे विभाग अधिकारी तथा सहा आयुकत्‍ भरत धांडे आवर्जुन सहभागी झाले होते. वेस्टर्न कॉलेजचे एनएसएस विदयार्थी यांच्यासह डि-मार्ट मधील कर्मचारी व कामगार यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झालेल्या या मोहिमेच्या आयोजनात स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्र आणि पर्यवेक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरणाविषयी जागरूकता तसेच प्लास्टिक प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. ००००

मुरबाड मध्ये समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदात

राजीव चंदने   मुरबाड : मान्सून  दाखल झाला नसला तरी, मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावत उघडीप दिल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणी सफल झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे, दरवर्षी जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून ने मुरबाड तालुक्यात हजेरी लावण्यात उशीर केला असला तरी अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे, हे वातावरण भातशेती साठी आणि पेरणी साठी योग्य ठरले आहे, मागील वर्षी पेरणी केल्या नंतर पावसाने भरमसाठ बॅटिंग केली होती त्यावेळी पेरलेलं बियाणे तरंगले, रुजलेले पाण्यात कुजले, काही बियाणे वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना “रुजा ” (घरातच भात बियाण्यास मोड आणून तो शेतात पेरणे ) करण्याची वेळ आली होती. मात्र यंदा असे झाले नाही त्यामुळे तालुक्यातील बहुतेक ठिकाणी भातरोपे किमान वित भर वाढले आहेत. त्यात यावर्षी भात बियाणेची किंमतही वाढली आहे. खतांची किंमतही वाढली आहे.असे असताना पावसाने एक प्रकारे यावर्षी उपकारच केले आहेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत असून त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी चांगला पाऊस आहे. पावसाने चांगली उघडीप दिली भातरोपे चांगली झाली आहेत शेतकरी शेतीपयोगी वस्तू बी, बियाणे, औजारे यांच्या किमती वाढीव झाल्या आहेत,….रमेश हिंदुराव, शेतकरी न्हावे सासणे 0000

युवा बुध्दिबळपटू एलेश त्रिपाठीचे शानदार यश

मुंबई : नुकत्याच राजस्थान मधील उदयपुर शहरात झालेल्या फिडे रेटिंग लेकसिटी ओपन बुध्दिबळ स्पर्धेत विरारच्या मटिक अकादमी शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एलेश त्रिपाठी याने शानदार कामगिरी करताना खुल्या गटात आठवा क्रमांक मिळवला. त्याने अपराजित राहताना ९ पैकी ७.५ गुण मिळविले. त्याने ६ लढती जिंकल्या .तर ३ सामने बरोबरीत सोडवले.रेटिंग श्रेणीत त्याचा दुसरा क्रमांक लागला.त्याला ६१ हजार रुपये रोख आणि  आर्कषक चषक भेट देण्यात आला. भारतातील ५५ ० पेक्षा जास्त बुध्दिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रसाद घाटे एलेशचे प्रशिक्षक आहेत. तसेच अर्पित पांडे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन एलेशला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तो बुध्दिबळ खेळत आहे.तामिळनाडू येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. उदयपुर स्पर्धेतील एलेशच्या सुरेख कामगिरी बदल शाळेच्या मुख्याधापीका सीमा बहल यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.

आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम*

अशोक गायकवाड*   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग…

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर

महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प आता मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्पाचे काम लांबणीवर पडल्याने या मार्गावर आणखी वर्षभर कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे. प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टिका होऊ लागल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पूलांच्या प्रकल्पाचे महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाची कामांचीही यात समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे काम केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प कामाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतुक बदल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवडणूक प्रचाराच्या कालावधीतील वाहतूक तसेच निवडणूकीच्या कालावधीत मजूर गावी जाणे अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतरच ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये एकूण १ हजार १८२ कोटी ८७ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च होत आहे. खारेगाव येथे ३८ मार्गिकांचा टोलनाका चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्ते. महामार्गावरील महत्त्वाच्या पूलांपैकी खारेगाव पूलाचे ६२ टक्के, साकेत पूलाचे ६९ टक्के, रेल्वेपूलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपूलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. -0000

ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर

१५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण   ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. साथ आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासह पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी उपाययजोना आखण्यास सुरूवात केली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत विशेष करुन डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्याप्रमाणात पसरत असते. जिल्ह्यात सध्या तरी ऊन आणि पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. सलग पाऊस कोसळत नसल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये तापाची साथ मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती ठाण्यातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ज्या रुग्णांना वारंवार ताप येतो आहे, त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, डेंग्यू किंवा मलेरियाची लागण झाली नाही ना हे पहावे, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यात, धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, भितीपत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेकडून शहरातील मुख्य चौकात ‘शहर डेंग्यू मलेरिया मुक्त करुया ’ अशा मथळ्याचा फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे आजार रोखण्यासाठी कोणती कशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मलेरियाचे २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाणे १२, कल्याण-डोंबिवली सहा, नवी मुंबई एक, मिराभाईंदर पाच आणि ठाणे ग्रमाणीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात डेंग्यूचे ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीत दोन, नवी मुंबईत दोन आणि ठाणे ग्रामीण मध्ये तीन असे एकून ११ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 00000

 ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर बांबूचे छत

पावसापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता आडोसा   ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्यानेच विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात हिरव्या जाळीचे बांबूचे छत उभारले आहे. फलाट क्रमांक पाचचे अलीकडेच रूंदीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या फलाटावर पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढ उतर करताना त्रास होत होता. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे विस्तारिकरण झाल्यानंतर समाधानाने प्रवास करता येईल, असे प्रवाशांना वाटले होते. विस्तारिकरण करण्यात आलेल्या फलाटाच्या भागावर पत्र्याचे छत नाही. त्यामुळे पहिल्याच मोसमी पावसाचे पाणी फलाटावर पडून साचले होते. फलाटावरील काँक्रीटचे बांधकाम नवीन असल्याने त्याच्यावर काँक्रीटच्या गारव्यासाठी घायपताच्या पाण्यात भिजवलेल्या गोण्या टाकण्यात आल्या होत्या. या गोण्यांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून पडण्याचे प्रमाण वाढले होते. डोक्यावर छत नाही आणि पावसातून सुटका करून घेण्यासाठी घाईत फलाटावर उतरले तर गोण्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडत होते. या फलाटावर दोन्हीकडून प्रवाशांना त्रास होत होता. या त्रासाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचवर विस्तारित फलाट क्रमांक पाचवर पत्र्याचा निवारा होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हिरवी जाळी असलेले बांबूचे छत विस्तारित भागात लावून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या बांबुच्या छतामुळे आता पावस किंवा उन्हापासून बचाव होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला तर मात्र बांबूच्या छतामधून पावसाच्या पाण्याची गळती होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली. बांबूचे छत लगतच्या लोखंडी सांगाड्यांना बांधून तयार करण्यात आले आहे. हे छत कोसळणार नाही याची दक्षता रेल्वेने घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत. ०००००

ठाण्यात मैदानावरील प्रदर्शनासाठी मुंबईच्या धर्तीवर नियमावली करणार

संजय वाघुलेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन   ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक मैदानांवरील व्यावसायिक प्रदर्शनाबाबत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार वर्षातील ३६५ पैकी ४५ ते ५० दिवसांपर्यंत मैदानात प्रदर्शन भरविता येतील. तर उर्वरित काळ मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी काल मंगळवारी येथे दिली. त्याचबरोबरच वर्षातून दोन वेळा झाडांच्या फांद्या कापण्याचे, गावदेवी व ज्युपिटर हॉस्पिटलजवळील वाहनतळ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले आहे. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक- नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावंड, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाण्यातील मुलांना जास्तीत जास्त दिवस खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध राहावीत, अशी भाजपाच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती. त्यावर आयुक्त राव यांनी मुंबई महापालिकेचे मैदाने भाड्याने देण्याचे धोरण मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महापालिकेच्या धोरणानुसार ठाण्यात धोरण तयार केले जाईल. त्यामुळे केवळ ४५ ते ५० दिवसांपर्यंत सार्वजनिक मैदानात प्रदर्शन भरविता येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी सांगितले. वर्षातून दोनदा वृक्ष फांद्यांची छाटणी रस्त्यालगतची झाडे व झाडांच्या फांद्या कोसळून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याची विनंती भाजपाकडून करण्यात आली. त्यावेळी वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या फांद्या तोडण्याच्या निविदा जारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील दोन वाहनतळ लवकरच खुला ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडी व गावदेवी भाजी मार्केट येथील दुचाकींचा वाहनतळ खुला करण्याची मागणी करण्यात आली. ज्युपिटर वाहनतळात १४०० वाहने पार्क होणार असून, तो वाहनतळ महिनाभरात खुला होईल. तर गावदेवी पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांच्याकडून देण्यात आले. बेकायदा होर्डिंगची पाहणी शहरातील काही भागात महापालिकेकडून कमी क्षेत्रफळाची परवानगी घेऊन भव्य होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग थाटले आहेत. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणीही भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. त्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ००००

महाराष्ट्र सदनात पाणीटंचाई पण केंद्रीय मंत्री करताहेत चक्क मिनरल वॉटरने आंघोळ !

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कुलूपबंद करावे – नितीन देशपांडे   अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. दिल्लीतील पाणीटंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनालाही बसला असल्याचे दिसून आले असून, एका नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरुन पाण्याच्या (मिनरल वॉटर) बाटल्या आणून, त्यांत्या्या आंघोळीची व्यवस्था करण्याची वेळ व्यवस्थापनावर आल्याचे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव उघड झालेले आहे. दिल्लीत भीषण पाणीटंचाई असताना, महाराष्ट्रातील एका नवनियुक्त केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असणे आणि त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध नसतानादेखील या केंद्रीय मंत्र्याने चक्क मिनरल वॉटरच्या फिल्टरच्या पाण्याने अंघोळ करणे, ही घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हे सरकार जनतेचे की लोकप्रतिनिधींचे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, एकीकडे महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांत, पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्यामुळे, अबालवृद्धांना पाच-पाच किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, हे नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करतात, यालाच असंवेदनशीलता म्हणतात. याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असून, जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करीत, आपली संवेदनशीलता प्रकट करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत असल्याचे नितिन देशपांडे यांनी सांगितले आहे. ००००