Author: bittambatami.com

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे व्यवस्थापनावर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविरोधात ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याना न्याय द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. शालेय नवीन वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निराश पालकांनी याबाबत संपर्क करुन माहिती दिली असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटले  ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनाने, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजल्या पासून शाळेबाहेर उभे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार शाळा व्यवस्थापनाने केला नाही. यावेळी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील भेटलो. याप्रकरणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासंबंधी ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करत राहणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा आनंदात शाळेत जाताना पाहण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कारवाईची व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे. यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवासेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजूडे, नितेश पाटोळे, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर,अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

येऊरचा सायकल राजा ठरला शिवम तर सायकल राणी ठरली निकीता

ज्येष्ठ नागरिक गटातून ॲड. मोहन निंबाळकर प्रथम ठाणे : कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकलप्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी स्पर्धेची संकल्पना होती. अखेर रविवारी भर पावसात ही स्पर्धा संपन्न झाली. येऊरचा सायकल राजा (खुला गट) शिवम खरात, ज्येष्ठ नागरिक गटातून ६३ वर्षीय ॲड. मोहन निंबाळकर तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मधार. तसेच, खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक तसेच, महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपटू प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना प्रा. बारसे म्हणाले की, सायकलिंग येऊरला नियमीत केली तर फुप्फुसाची क्षमता खूप वाढते. मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात ३०० लूप्स येऊरला केले होते. त्यामुळे मला येऊरचा फायदा माहित आहे. येऊरला साधारणपणे फारसे सायकलप्रेमी येत नाही. येऊरला सायकलिंग केले तर स्नायू बळकट होतात. या स्पर्धेमुळे नवीन सायकलप्रेमींनी येऊरला आले. सायकल सर्वांनी नियमीतपणे चालवायला हवी, फिट राहायला हवे.. सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते. अशा भावना प्रा. बारसे यांनी व्यक्त केल्या. सुरूवातीला प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊरसारख्या चढ उतार अशा शार्प वळणावर भर पावसात ही स्पर्धा आयोजित करुन ती यशस्वी करणे हे खूप मोठे आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनसमोर होते. ते पेलण्यात संस्था यशस्वी ठरली हे विशेष. या स्पर्धेसाठी दिवसरात्र मेहनत करणारी माझी कोअर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसारा सर, निखील गावडे, पंकज रिझवानी, गुरूप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फर्डे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली.

राज्य कॅरम –  माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेची उपांत्य फेरीत धडक

मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप…

अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांकडून घेतला आढावा

राज्यातील पाऊस, खते, बी-बियाणे, टँकर, पीक कर्ज, पाणीसाठ्याचा मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करावा. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव श्री. चांदवले आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मणियार, नाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणे, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे आदींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचा, वेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपाय योजण्याचा प्रयत्न करावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागातील पाऊस, धरणातील जलसाठा, खरीप हंगामाचे नियोजन, तर पुणे विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी यासोबतच आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मुंबई :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल. संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.   शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : १५ जूनपासून नवीण शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकार्‍यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सूपूर्द करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पाऊले उचलण्यात येत आहेत. १५ जून रोजी शळा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकाची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शाळांना तोरणे लावण्यात येणार आहेत. रांगोळ्या काढण्यात येतील. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावात, वार्डात प्रभातफेरी काढण्यात येईल. या प्रभातफेरीत युवक, गावकरी, जेष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हस्तरीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षित उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जात आहे.

राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण नाही

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान मोदींना आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर निवडणूक पार पडली. भाजपाला २४० तर एनडीएला एकूण २९३ जागा मिळाल्या. एनडीएला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर एकूण ७१ जणांना शपथ देण्यात आली. मात्र राज ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं. त्याबाबत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसे पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नाही. पण एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. पण निमंत्रण असते तर कुठं दिसले असते, असे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. गरज असेल तेव्हा उंबरे झिजवायचे आणि संपली की दरवाजे लावायचे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला बोलवलं असतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता. आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. आम्हाला निमंत्रण असतं तर ते कळलं असतं. मात्र राज्यात मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आम्हाला आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपामध्ये संपली आहे. गरज असेल तेव्हा उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही, हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या ते उमेदवार विजयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसंच राज ठाकरेंनी कणकवलीत नारायण राणेंसाठी, कळवा आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी सभा घेतल्या होत्या. पुण्यात त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेतली होती. या सगळ्यांना चांगलं यशही मिळालं. मुरलीधर मोहोळ तर मंत्रीही झाले आहेत. अशात राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नव्हतं हेच दिसून आलं. त्यामुळे प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी मोदींवर स्तुती सुमनं उधळली होती हे देखील महाराष्ट्राने पाहिलं आहे.

वीस हजार विद्यार्थ्यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

नीट वादग्रस्त निकाल प्रकरण : मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या नीट निकालाविरोधात देशातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नीट पुन्हा घेण्यात यावी किंवा श्रेणी गुण पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घाई-गडबडीत जाहीर केलेला नीटचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेने नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु केला आहे. त्यात २० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून कोटा येथील शिक्षणतज्ज्ञ नितीन विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नीट परीक्षेत ६७ विद्यार्थी हे प्रथम क्रमांकावर आहेत. नीटच्या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत असल्याने सर्व प्रश्न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकला तरी त्याला ७२० पैकी ७१५ गुण मिळणे अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण कसे दिले गेले, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. क्लॅटसाठी अतिरिक्त गुण देण्याच्या सूचना न्यायालयाने २०१८ मध्ये दिल्या होत्या. त्याचा हवाला एनटीएकडून देण्यात येत आहे. परंतु ती परीक्षा ऑनलाइन होती तर नीट ही ऑफलाइन आहे. त्या सूचनेचा दाखला देत ग्रेस मार्क्स देणे कितपत योग्य आहे? पेपर उशिरा वाटला तर जास्त वेळ देता आला असता, गुण का दिले? परिपत्रक, निकाल पत्रात ग्रेस गुणांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. तक्रार करणाऱ्यांनाच ग्रेस गुण मिळाले आहेत. ज्या मुलांनी तक्रार केली नाही त्यांचा काय दोष? एनटीएने १४ जून रोजी निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली असताना १० दिवस आधीच निकाल जाहीर करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. वेळ कमी पडल्यास अतिरिक्त गुण देण्याबाबत एनटीएकडे कोणताही आधार नसल्याचा मुद्दाही नितीन विजय यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.

‘पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडू नका’

पालिकेचे आवाहन; संरक्षक जाळ्यांचे काम पूर्ण मुंबई : पावसात मॅनहोल्समध्ये कोणीही पडून अपघात होऊ नये, यासाठी मलनिस्सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांवरील एकूण १ लाख २८६ हजार मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पालिकेने ७ जूनपर्यंत पूर्ण केली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी मॅनहोल्समुळे होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. मात्र, मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी उघडू नयेत, असे आवाहन पालिकेने समाजमाध्यमांद्वारे केले आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पावसाळ्यात जलवाहिन्यांमध्ये कचरा अडकून पाणी साचू नये, यासाठी मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी सुरुवातीला जाळ्यांचा प्रोटोटाइप बनवण्यात आला. त्यानंतर जाळ्या बसवण्यास सुरुवात झाली. हे काम ३१ मेच्या आधी होणे अपेक्षित होते. एक लाख संरक्षक जाळ्या बसवण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, २४ मेपर्यंत त्यातील केवळ ४३ हजार ५८१ संरक्षक जाळ्या मॅनहोल्समध्ये बसवण्यात आल्या होत्या. बॅरिकेड्सचा उपाय मॅनहोलवरील झाकण चोरीला जाणे, तसेच मॅनहोलमधून पाणी ओव्हरफ्लो होण्याच्या घटना नेहमीच घडतात. त्याला आळा घालण्यासाठी मॅनहोलवर सायरन वाजून अलर्ट देणारी यंत्रणा मुंबईतील १४ ठिकाणी बसवून त्याची गेल्या तीन महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी तांत्रिक अडचणी आणि यंत्रणाही उपयुक्त ठरत नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही चाचणी बंद करण्यात आली. पावसाळ्यात मॅनहोल काही कारणास्तव उघडे राहिल्यास त्याला तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. काही उघड्या मॅनहोलमध्ये झाडाची फांदी किंवा लाकडी सामान ठेवण्याचेही प्रकार केले जातात. मात्र, तसे न करता आता तात्पुरते बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली

सर्व कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा गोखले पूल आणि अंधेरी पश्चिम येथे असलेला सी. डी. बर्फीवाला पूल यांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे उर्वरित कामे जलदगतीने करून हा गोखले-बर्फीवाला पुलाची मार्गिका जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांसाठी खुली करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी अंधेरी पश्चिमेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. परिणामी, बर्फीवाला पूल बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांच्या अहवालानुसार हे दोन पूल जोडण्यासाठी जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून पातळी समतल करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. महापालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. दोन्ही पूल जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यातील पातळी वरखाली झाल्यामुळे जे हसे झाले, त्यावरून प्रशासनाने आता बोध घेण्याचे ठरविले आहे. याप्रकरणी सत्यशोधन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांची नियुक्ती केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकल्पाच्या नियोजनात त्रुटी राहू नयेत म्हणून सत्यशोधन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या चौकशीचा अहवाल प्रलंबित आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत दुसऱ्या गर्डरचे सगळे भाग एकत्र करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.