खर्डी : शहापूर तालुक्यात केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजनेतील कामांची मुदत संपली असतानाही कामे रखडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जल जीवनच्या कामांना गती न मिळाल्यास १० जून रोजी शहापुरातील शिवतीर्थ याठिकाणी उपोषण करणार असल्याचा इशारा वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेने दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन वनश्री संस्थेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आहे, परंतु ”धरण उशाला आणी कोरड घशाला” अशी स्थिती तालुक्यातील नागरिकांची आहे. दरवर्षी टंचाई आराखडा तसेच कोट्यवधी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च होतात. यावर्षी देखील तालुक्यातील ग्रामीण भागात भीषण टंचाई सुरू आहे. १९२ गावपाड्यांना ४२ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या सर्व टंचाईग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १८९ योजनांची कामे मुदत संपूनही पूर्ण झालेली नाहीत, तसेच अतिशय धीम्यागतीने कामे सुरू असल्याचा आरोप वनश्री पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बुधाजी वाढविंदे यांनी निवेदनात केला आहे. तालुक्यात ११० ग्रामपंचायती तसेच तीन लाख ३४ हजार लोकसंख्या आहे, तर जल जीवनच्या १८९ योजना आहेत, मात्र योजनेअंतर्गत जल वाहिन्यांची कामे करणे, चर खोदणे, जलवाहिनी, विहीर व टाक्यांची बांधकामे अपूर्ण असतानादेखील ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांनी कामाची बिल हडप करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप वनश्री संस्थेने केला आहे. ठोस उपाययोजना नाही तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव अंतर्गत येणाऱ्या पेढ्याचीवाडी, कामतवाडी, सोनारशेत आदी गावांसाठी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे, तसेच कामाची मुदत संपल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संबंधित अधिकारी यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने बहिष्कार मागे घेतला, परंतु त्यानंतर कोणतीही ठोस उपायोजना झाली नसल्याने १० जून रोजी उपोषणाचा इशारा सामाजिक संस्थेने दिला आहे. डोळखांब परिसरातील रोडवहाळ येथील जल जीवन योजनेचे काम अपूर्ण आहेत. तालुक्यातील डोळखांब, खर्डी, गुंडे, कसारा, किन्हवली, टाकीपठार अशा विविध भागातील गावपाड्यांवर जल जीवन योजनेचे एकही काम पूर्ण झालेले नाही. ठिकठिकाणी जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रीट रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तिथे गटार निर्माण होऊन चिखल होण्याची शक्यता आहे.