Author: bittambatami.com

 केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला

केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला आरोग्य कर्मचाऱ्यांचा केडीएमसी बाहेर ठिय्या कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, जुलै महिन्यापासून वाढीव पगार थकबाकी तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा थकबाकी पगार मिळावा या मागणीसाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालया बाहेर ठिय्या मांडला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनएचयुएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही.  तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी ही बिले थकीत आहेत. या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम  स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

पोलीस असल्याचे सांगत 5 लाख रुपये लांबवले

पोलीस असल्याचे सांगत 5 लाख रुपये लांबवले आरोपींना कोळसेवाडी पोलीसांनी घेतले अवघ्या 5 तासांत ताब्यात कल्याण: पुणे येथे राहणारे दीपक शिंदे यांना ५ लाख रुपयांच्या बदल्यात सुटे १०,५०,१०० च्या नोटा असलेले ७ लाख रु. असे २ लाख जास्तीचे पैसे मिळवून देतो असे सांगून कल्याण पूर्व येथे बोलवून घेतले. तक्रारदार हे ५ लाख रुपये घेऊन विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन कल्याण पूर्व येथे आले असता सुट्टे पैसे देण्याचा बनाव करून एका स्कॉर्पिओ गाडीतून तीन-चार इसमांनी येऊन पोलीस आहेत तुम्ही इथे काय करता असे बोलून पैसे बदली करणारे इसमास त्यांच्या गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील पाच लाख रुपये असलेली पैशाची बॅग ओढून गाडीत बसून ते सर्वजण स्कॉर्पिओ गाडी मधून पळून गेले. हि माहिती तक्रारदाराने पोलीस ठाण्याला कळवताच कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच आरोपींचा शोध घेत या आरोपींना अवघ्या 5 तासांत अटक केली. गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी पैसे बदली करण्यासाठी आलेल्या आरोपींचे मोबाईलचे वेळोवेळी तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची स्कॉर्पिओ गाडी जुन्या पुणे हायवेने जात असल्याचे समजून आल्याने तात्काळ तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी यांना कळवले असता, सोमाटणे फाटा या टोल नाक्यावर स्कॉर्पिओ गाडी MH-04-GD-7823 व त्यातील चार आरोपी संजय नागोजीराव भोसले,  राह. गौरीपाडा, कल्याण, गौसपाक गुलाम हुसेन शेख, राह. गौरीपाडा, कल्याण, सोमीनाथ तुळशीराम गायकवाड, राह. मोहने, अरविंद नागनाथ जॉजट, राह. इंदिरानगर, कल्याण यांना पाच तासामध्ये ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता गुन्हयातील इतर आरोपी आळंदी मार्गे अहिल्यानगर कडुन शिर्डी मनमाड कडे स्कॉर्पिओ गाडी क्र. MH-05-AJ-0247 याने पळून जात असल्याचे समजल्याने लागलीच जवळचे पोलीस ठाणे राहुरी यांच्याशी संपर्क करून अहिल्या नगर शिर्डीरोड वर नाकाबंदी करून अहिल्या नगर-शिर्डी रोडवर पाहिजे असलेले आरोपी ५) उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू ६) शरद कुमार मोहन  ७) नरेश फट्टू शर्मा तसेच आरोपी नामे ८) लक्ष्मण उर्फ प्रदिप विश्वनाथ धनवे राह. उल्हासनगर यास पुढील ३६ तासात ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गुन्हयातील चोरीस गेलेल्या रोख रक्कमेपैकी २ लाख ३६ हजार रूपये, गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या २ स्कॉर्पिओ गाडया, आरोपींचे वापरते एकुण ९ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हि कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरख, पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप भालेराव, पोउनि जगन सापटे, पोहवा. जाधव, सांगळे, वाघ, मुसळे, जरग, सौंदाणे, घुगे, आव्हाड, बोरसे, सांगळे, कापडी, पोना कोती, फटांगरे, पोशि गिते, इंगळे  यांनी केली आहे.

पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी आम्ही वचनबद्ध

पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी आम्ही वचनबद्ध मुंबई : लीलावती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरने (लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट – एलकेएमएमटी) सध्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल चॅनेलद्वारे प्रसारित झालेल्या दिशाभूल करणाऱ्या आणि बदनामीकारक बातम्यांचे आरोप फेटाळले आहेत. हे सर्व दावे खोटे आहेत असे रुग्णालयाचे म्हणणे आहे. लीलावती रुग्णालय हे वैधानिक नियमांचे पालन करत कार्यरत आहे. पारदर्शकता, नैतिकता आणि रुग्णांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होताच रुग्णावर तात्काळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात येतात. चॅरिटेबल ट्रस्टच्या धोरणानुसार व कायदेशीर जबाबदाऱ्यांनुसार रुग्णांवर मोफत उपचार सुरू असून कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा उपचार नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त  राजीव किशोर मेहता यांनी स्पष्ट केले. हॉस्पिटलची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात एक हजार कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. एक रुग्णाची आई प्रमिला चौधरी सांगतात की, माझ्या मुलाला अपघातानंतर लगेच दहिसरच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर प्लास्टिक सर्जरीसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये आणले. कोणतीही ठेव रक्कम न घेता मानवतेच्या आधारावर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचार नाकारल्याचे जे कोणी आरोप करत आहेत ते चुकीचे आहे असे त्यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस

साहित्य क्षेत्रातील अशोकराव टाव्हरे यांचे योगदान उल्लेखनीय – डॉ. श्रीपाल सबनीस रमेश औताडे मुंबई : पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत तीन वर्षे कनेरसर, मुंबई , राजगुरुनगर येथे साहित्य संमेलन आयोजित करून विविध क्षेत्रात कार्यरत राहून साहित्यासाठी कवी-लेखक अशोकराव टाव्हरे हे उल्लेखनीय योगदान देत आहेत असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी तिसऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. दोन कवितासंग्रह, लेखसंग्रह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर मराठी व इंग्रजीत पुस्तकांचे लेखन, अनेक स्मरणिका व विशेषांकाचे संपादन करून अशोकराव टाव्हरे हे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नावारूपास येत आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याचे टाव्हरे यांचे कसब व त्यांची पत्नी सुरेखा टाव्हरे यांची त्यांना असलेली साथ गेली तीन वर्षे साहित्य संमेलनात अनुभवत आहे असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नमुद केले. पुर- कनेरसर चे सुपुत्र व विश्व साहित्य नामदेवराव ढसाळ यांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी टाव्हरे गेली तीन वर्षे साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन करीत आहेत.  ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगून डॉ. श्रीपाल सबनीस व त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री ललिता सबनीस यांनी टाव्हरे दाम्पत्याचा  सन्मान केला.

युध्दामुळे आखाती देशांमध्ये जाणारी शहापूरतील भेंडीची निर्यात ठप्प

युध्दामुळे आखाती देशांमध्ये जाणारी शहापूरतील भेंडीची निर्यात ठप्प अविनाश उबाळे ठाणे : अमेरीका,इस्रायल,इराण यांच्यातील युध्दजन्य अशा परिस्थितीमुळे पश्चिम आशियात युध्दाची व्याप्ती वाढली आहे.त्याचे परिणाम आयात निर्यातीवर झाले आहेत भारतातून विशेषता महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातून आखाती देशात एक्सपोर्ट होणाऱ्या भेंडीची निर्यात पुर्णपणे ठप्प पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ही युध्दजन्य परिस्थिती कधी थांबेल याकडे शेतकरी व व्यापारी डोळे लावून बसले आहेत.निर्यात थांबल्याने मोठ्या प्रमाणावर रोज भेंडीचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भेंडीची आवक वाढल्याने विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणलेल्या  भेंडीचा साठा पडून आहे.शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या हिरव्यागार भेंडीला तसेच कारली,काकडी,व भोपळा,डांगर व अन्य भाजीपाल्याला इराण,युरोप, ब्रिटन अफगाणिस्तान, दुबई तसेच आखाती देशांमध्ये मोठी मागणी आहे. गेली अनेक वर्षे शहापूरची भेंडीला परदेशात मागणी आहे.खास करुन भेंडीची निर्यात येथून थेट परदेशात होते पण अचानक युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचे परिणाम हवाई वाहतूक व सागरी वाहतूकीवर झाले आहेत.परिणामी महाराष्ट्रातील भाजीपाला निर्यात ठप्प झाली आहे. विशेषता शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आणलेली भेंडी सध्या पडून आहे.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धामुळे परदेशात होणारी आयात निर्यात ही पुर्णपणे कोलमडून पडल्याने सध्या व्यापारी हे भाजीपाला खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये येत नसल्याने याचा मोठा फटका सामान्य गरीब शेतकऱ्यांना बसला असून उत्पन्नाचे एकमेव साधन असलेला भाजीपाला व्यवसाय हा आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. अगदी कवडीमोल भावाने भेंडी व अन्य भाजीपाल्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. भाजी मालाला उठावच नसल्याने तो खराब झालेला भाजीपाला एकतर फेकून द्यावा लागेल अशी एकंदरीत परिस्थिती येथे निर्माण होण्याची शक्यता आहे. -शहापूरच्या बाजारपेठेत रोज एक ते दोन हजार क्विंटल भेंडीची आवक होत असून किलोमागे शेतकऱ्यांना ३५ ते ४० रुपयांचा भाव मिळतो आहे.शहापूर तालुक्यात या वर्षी भेडीचे सर्वाधिक…

सतीची विहीर प्रशासनाकडून दुर्लक्षीत

सतीची विहीर प्रशासनाकडून दुर्लक्षीत पडघ्यातील १०० वर्षे जुनी ऐतिहासिक विहीर खुली करण्यास टाळाटाळ ठाणे: भिवंडी तालुक्यातील पडघे गावात ऐतिहासिक वारसा जपणारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी सर्वे नं. ७९/१० मधील ‘सतीची विहीर’ प्रशासनाकडून दुर्लक्षीत झाली आहे.ही विहीर बुजवण्यात आल्याचा धक्कादायक असा प्रकार उजेडात आला आहे. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सतीची विहीर पुन्हा खुली करून तिचे ऐतिहासिक स्वरूप जतन करावे, या मागणीसाठी पडघा ,समतानगर येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी मुंबई येथील पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे लेखी निवेदने दिली. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल भिवंडी तहसील कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे. मात्र, दोन महिने लोटूनही तहसीलदार स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा केवळ कागदोपत्री राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पडघा ग्रामपंचायत हद्दीतील ही विहीर जवळपास १०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या मते, याच सतीच्या विहिरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाणी सत्याग्रह केला होता. त्या वेळी ते समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी उतरले होते. सत्याग्रहींसह विहिरीवरून पाणी काढून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेमुळे ही विहीर केवळ पाण्याचा स्रोत नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याची जिवंत साक्ष मानली जाते. समतानगर येथील दिवंगत हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय ९६) यांनी जिवंत असताना सांगितलेल्या आठवणी आजही ग्रामस्थांच्या मनात ताज्या आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेबांनी सतीच्या विहिरीवर सत्याग्रह केल्यानंतर शिसवीच्या झाडाखाली सभा घेतली होती आणि “मुलांना शिक्षण द्या” असा संदेश दिला होता. या आठवणींमुळे सतीची विहीर ही पडघ्याच्या इतिहासाचा अविभाज्य भाग ठरते.ही ऐतिहासिक विहीर पुन्हा खुली होणार का? प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का? की प्रक्रिया सुरू असून नागरिकांना माहिती दिली जात नाही? सतीची विहीर हा केवळ स्थानिक वादाचा विषय नसून सामाजिक न्यायाच्या इतिहासाशी निगडित वारसा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चौकट (“डॉ. बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेली ही विहीर आमच्या पडघ्याचा अभिमान आहे. त्यांच्या पाऊलखुणा पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. शासन या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार का, की अर्जांना केराची टोपली दाखवली जाणार?” असे आम्ही होऊ देणार नाही. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जाधव)

 ‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्चला ठाण्यात प्रकाशन सोहळा

‘लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?’ या पुस्तकाचा, ७ मार्चला ठाण्यात प्रकाशन सोहळा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गजांची राहणार उपस्थिती अनिल ठाणेकर ठाणे : ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ यांच्या, “लोकशाही भारत-राष्ट्र की, सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मार्चला ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’ या संघटनेच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे यांच्यासह, अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, त्याचा प्रचार आणि प्रसार करुन बहुजनवर्गात; विशेषत: तरुणांमध्ये, संविधान-लोकशाही-समता-बंधुता-राष्ट्रीय एकात्मता यांबाबत जनजागृती करण्याचा वसा, आनंदा होवाळ यांनी अखंडपणे सुरु ठेवलेला आहे. देशातील वाढता जातीयवाद, धर्मविद्वेष याबाबत, आपल्या व्याख्यानांतून भाजप-आरएसएस या धर्मांध संघटनांविरोधात त्यांनी अनेकदा प्रहार केलेला आहे. त्या सर्वांचा उहापोह त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सद्यस्थितीतील भारतीय राजकारणावर, आनंदा होवाळ यांनी परखड भाष्य केले आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली असून, त्यांनीदेखील मोदी-शहा यांचे भाजपाई सरकार व धनदांडग्या भांडवलदारी व्यवस्थेविरोधात तसेच, केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांविरोधात, कष्टकरी कामगारवर्गाला गुलामगिरीत ढकलणाऱ्या कंत्राटी पद्धतीविरोधात ताशेरे ओढले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ‘इंडियन सोशल मूव्हमेंट’च्या अध्यक्षा सविता सोनावणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य भूषवणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. राम पुनयानी, माजी न्यायमूर्ती डॉ. डी.के. सोनावणे, अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, ॲड. गाथा ढाले आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला जास्तीतजास्त लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आनंदा होवाळ यांनी केले आहे.

ई-चलान विरोधात वाहतुकदारांचा आज आझाद मैदानात एल्गार

ई-चलान विरोधात वाहतुकदारांचा आज आझाद मैदानात एल्गार शासनाने तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारच्या वाहतुक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ‘ई चलान’ अनेक वेळा ऑनलाइन पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ओनर्स सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीतर्फे गुरुवारी ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदानात धडकण्याचा इशारा दिला आहे. बुधवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वाहतुकदारांच्या समितीचे प्रवक्ते राजेंद्र पाटील यांनी याविषयी माहिती दिली. तसेच, शासनाने तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, वाहतुकदारांचा या संपाचा फटका शालेय विद्यार्थी तसेच चाकरमान्यांना बसण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने महसुल वाढीसाठी ई चलानचा हत्यार म्हणुन वापर सुरू केला आहे. टार्गेट देऊन वाहतूक नियम मोडल्याबद्दल दंडाच्या केसेस केल्या जात असुन दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे, असा आरोप वाहतूकदार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. एमएमआर रिजनमधील ४० हजार बसेसचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ई चलान दंड मुक्तीसाठी सरकारने समिती बनवुन तोडगा काढण्याची खात्री दिली होती. मात्र, आजवर काहीच तोडगा काढलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही वाहतुकदारांच्या समस्येची कबुली देत अडचणी विषयी सहमती दर्शवली. मात्र, ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. ई चलानच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत, प्रत्येक कॉन्स्टेबलला ई चलान कारवाईचे टार्गेट दिलेले आहे. एकप्रकारे हा महसुल वाढीचा स्त्रोत बनवला आहे. हे सर्वानाच जाचक आहे तेव्हा शासनाने चर्चेसाठी यावे. अशी मागणी असुन गुरुवारी ५ मार्च रोजी आझाद मैदानात वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ई-चलान देताना वापरण्यात येणारी उपकरणे मान्यताप्राप्त नाहीत.  ई-चलान देण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेले नाही. ई चलनसाठी दिला जाणारा नमुना आणि पावती नियमबाह्य आहे. ई चलाननुसार पुराव्यांशिवायच दंडवसुली केली जाते. पुरावे म्हणून सादर केलेले छायाचित्र धुसर असल्याचे अनेकदा आढळलेले आहे. ई-चलान यंत्रणा राबवून वाहनधारकांचर खोटे गुन्हे दाखल करून जबरदस्तीने दंड वसूलण्यात येत असल्याचा आरोप करून वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे म्हणजे सरकारची डिजिटल रॉबरी असल्याचा गंभीर आरोप केला आहे

 ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

इराण-इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन – डॉ.श्रीकृष्ण पांचाळ अनिल ठाणेकर ठाणे- इराण-इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी (SEOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून इराण-इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.याची नोंद घेवून नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे नियंत्रण कक्ष : ०२२-२५३०१७४०/९३७२३३८८२७, ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२२५४४५३५३/०२२२५४४२८२८/०२२-२५४४३६३, मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई :९३२१५८७१४३/ ०२२-२२०२७९९०

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा पाहणी दौरा कल्याण: काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांनी नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे व पूरस्थिती याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे निवेदन सादर केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी उपस्थित राहून नदीची सद्यस्थिती, पूरकाळातील अडचणी व नागरिकांच्या समस्या यांची सविस्तर माहिती दिली. भवानीनगर, अनुपम नगर, घोलप नगर, योगिता, त्रिमूर्ती कॉलनी, गुरु आत्मा स्मार्ट सिटी शाळा, बंदर पाडा, मोना रोड, वालधुनी विभाग, छत्रपती शिवाजी महाराज नगर, मिलिंद नगर आदी भाग नदी पात्रालगत आहेत. जुलै महिन्यात पूर आल्यावर या परिसरातील नागरिकांना स्थलांतर करावे लागते. पाच ते सात फूट पाणी दुकाने व घरांमध्ये शिरते. पूर ओसरल्यानंतर दोन दिवस सरकारी यंत्रणेकडून साफसफाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत आहे की,‘आम्हाला तात्पुरती मदत नको; पण नदी कायमस्वरूपी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करा. वालधुनी नदीचे सुशोभीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा’. यावेळी डॉ. राजाकुमार पातकर यांनी संस्थेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. ‘वालधुनी नदी संदर्भात कोणताही विषय असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ असे त्यांनी स्पष्ट केले. वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, रुंदी व खोली वाढवणे, प्रदूषणमुक्ती आणि सुशोभीकरण या कामांसाठी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.