Author: bittambatami.com

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती अनिल ठाणेकर मुंबई, शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.  त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कोणतेही सोहळे, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार नाहीत. तसेच शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने त्या दिवशी कोणत्याही सोहळ्याचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन न करता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ  एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत, असे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

  संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा

संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश! मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानचा परिसर हा चोहोबाजूंनी डोंगर दर्यांनी हा संपूर्ण भूभाग व्यापलेला आहे. जागेअभावी अनेकांनी पूर्वीपासून जवळपास(चार दशकांपासून) कड्यालगत कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी घरे बांधलेली आहेत.झोपडपट्टी म्हणून हा भाग आजही ओळखला जात आहे.पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कड्यालगत असणाऱ्या घरांच्या बाजूच्या मातीची पूर्णपणे धूप होऊन वाहून गेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना अतिवृष्टी काळात जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहून आपले जीवन कंठावे लागत होते. पंचवटी नगर येथील रहिवासी राकेश कोकळे यांनी याबाबत मागील पंधरा वर्षांपासून अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही काहीएक साध्य झाले नव्हते.अखेरीस ही बाब विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपल्या परीने अधिकारी वर्गाशी चर्चा करून याभागात संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.या महत्वपूर्ण कामामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील अनेक वर्षा पासून पंचवटी नगर भागात जमिनीची धूप होत होती. अनेक वर्षे त्या ठिकाणचे रहिवासी असणारे राकेश कोकळे पाठपुरावा करीत असताना मी पाहत होतो. प्रत्येक वेळी या कामासाठी राजकीय अडथळे येत असताना या भागातील गोर गरीब व्यक्तीची घरे वाचली पाहिजे या सामाजिक भावनेने मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांना सूचना केली होती.त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे—गटनेते माथेरान नगरपरिषद आमच्या पंचवटी नगर येथील माझ्या घराच्या मागील बाजूस दरवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे तेथील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन हा भाग पूर्णपणे धोकादायक बनला होता. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळ्यात जीवन जगावे लागत होते. मी अनेकवेळा याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती की या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनेकवेळा विविध वर्तमानपत्रात बातम्या सुध्दा दिल्या होत्या. अखेरीस नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आम्हा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे,  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे,तसेच पत्रकार मुकुंद रांजाणे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. राकेश कोकळे–पंचवटी नगर रहिवासी,माथेरान

 ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

मराठीतून विज्ञान प्रसाराचा उपक्रम ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन  सिद्धेश शिगवण ठाणे :मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित व लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ हॉल, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला ‘जिज्ञासा’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा मंडळ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे व सरचिटणीस राजेंद्र साळवी यांचीही उपस्थिती राहणार आहे. ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकात ११८ मूलद्रव्यांची माहिती मराठीत देण्यात आली असून विविध वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी या मराठीतून विज्ञान प्रसाराच्या उपक्रमाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक सोमण यांनी केले आहे.

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम अनिल ठाणेकर ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे कालपासून सुरू झालेल्या “मालवणी महोत्सव- २०२६” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजित पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी,गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कवीवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असुन रिल स्पर्धाही आयोजित केली आहे. तर, महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने नगरसेवक सीताराम राणे गेली २७ वर्षे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे भव्य आयोजन करतात. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार,वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत. चौकट – रामती येथे नुकतेच अपघाती दुःखद निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणुन कोकण ग्रामविकास मंडळाच्या ठाण्यातील उन्नती गार्डन मैदानातील मालवणी महोत्सवासाठी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी उभारण्यात आली आहे. या मालवणी महोत्सवात एकुण ७५ च्या आसपास व्यावासायिकांचे स्टॉल्स आहेत. प्रवेशद्वारावर कोकणस्थ रेखीव मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन भाविक आणि खवय्यांना घेता येणार असुन या मंदिरात दररोज भजन आणि मालवणी पद्धतीतील आरती केली जाणार आहे.तसेच, श्री स्वामी समर्थाची महती विषद करणारे विशेष भजन कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळ सादर करणार आहे. चौकट – मालवणी महोत्सवात ११ दिवस दररोज अग्निहोत्र विधी होणार असुन विविध लोककलांचा जागर आणि कथा – कविता आदी साहित्यरूची वाढवणारे रंगतदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार असुन राज्यस्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत.असे आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे.

केरळमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण

केरळमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण अनिल ठाणेकर केरळ : केरळ राज्यातील डाव्या आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आहे! २०२६ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री के. एन. बालागोपाल यांनी मोठी घोषणा…

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात कल्याण: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि त्यामुळे पक्षी व इतर व जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे माझा रूपया  निसर्गासाठी’ या लोकसहभाग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त एक रुपया योगदान देऊन निसर्ग संवर्धनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी मोठ्या देणग्यांपेक्षा सामूहिक सहभाग अधिक प्रभावी ठरतो या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकासाठी सहज शक्य असलेले एक रुपये  योगदान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य असून, कोणताही आर्थिक बोजा न पडता प्रत्येक नागरिकाला निसर्गासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. या उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या योगदानातून पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणे, वृक्षरोपण करणे, पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे, तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याअभावी होणारे पक्ष्यांचे हाल कमी करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे. योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी सांगितले की, “₹1 ही केवळ रक्कम नसून निसर्गासाठी दिलेला सहभाग आहे. मोठ्या योगदानाची अपेक्षा न ठेवता, सामान्य माणसालाच या चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन ही केवळ संस्था किंवा शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या लोकसहभाग उपक्रमात सहभागी होऊन *‘माझा ₹1 निसर्गासाठी’* या संकल्पनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे कल्याणमध्ये उद्घाटन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्या हस्ते वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याण : कल्याण शहराच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर घालत ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन कल्याणात करण्यात आले.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉ. पौर्णिमा सातोस्कर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वैष्णवी रुग्णालयाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कल्याणातील सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांच्या पुढाकारातून हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे. तळ मजला अधिक सात मजले अशा भव्य इमारतीमध्ये तब्बल ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हे रुग्णालय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॅटर्निटी हॉस्पिटलपैकी एक ठरले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेला शस्त्रक्रिया कक्ष, लेबर कक्षासह नवजात अर्भकांना बाहेरून येणाऱ्या लोकांकडून कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी या रुग्णालयात घेण्यात आली आहे.  डॉ. अश्विन कक्कर यांना २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांच्या जुन्या रुग्णालयात ४३ हजारांहून अधिक महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ७० टक्के प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. कक्कर म्हणाले की, या नव्या रुग्णालयासाठी आपल्याला कोविड काळात केडीएमसीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रेरणा दिली. तर तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी जागेच्या अडचणी दूर केल्या आणि विद्यमान आयुक्त अभिनव गोयल यांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या वेळेत उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे विक्रमी २६ महिन्यांत ही भव्य इमारत उभी राहू शकल्याचेही ते म्हणाले. या नव्या रुग्णालयामुळे परिसरातील महिलांना आधुनिक आणि आणखी सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ओला-उबरचा आज संप

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कॅब, बाइक आणि ऑटो सेवा देणाऱ्या चालकांच्या युनियनने शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.  तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार…