२ री खेलो इंडिया बीच स्पर्धा, दीव २०२६ दीवच्या खेलो इंडिया मैदानात परभणीच्या अक्षय कोटलवारांचे कौतुक दीव: खेलो इंडिया बीच स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर यशस्वी पार पडली. या यशामागे परभणीचा मराठमोळा अक्षय कोटलवारांचे मेहनत दिसून आली. यामुळेच साऱ्या देशभरात कोटलवार यांच्या संयोजनाचे कौतुक होत आहे. मूळचे परभणी येथील अक्षय कोटलवार हे सध्या दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खेलो इंडिया बीच स्पर्धेची संकल्पना त्यांच्यासमोर येताच भव्य आयोजनात ध्येय पाहिले. आणि ते यशस्वी करून दाखवलीही. कोटलवार हे राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्यानंतर त्यांनी बीच स्पर्धेसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून अनोखे आयोजनाचा अध्याय लिहिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पहिल्या मल्टी-स्पोर्ट्स बीच गेम्ससाठी नोडल अधिकारी म्हणून अक्षय कोटलवार यांनी जबाबदारी यशस्वी पेलली. याबाबत बोलताना कोटलवार म्हणाले की, पहिल्या स्पर्धेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला. या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केल्यामुळे संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.पहिल्सा यशस्वी आयोजनानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली. दुसऱ्या पर्वातही आम्ही यशस्वी ठरलो. स्पर्धा संयोजनाच्या प्रवासात नैसर्गिक वाळूवरील खेळ, बदलते हवामान, समुद्रकिनारी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, खेळाडूंची सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्स यांसारखी अनेक आव्हाने समोर आली. मात्र, टीमवर्क, योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्ही ही सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पार केल्याचेही सांगून कोटलवार पुढे म्हणाले की हा अनुभव केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हता, तर भारतात बीच स्पोर्ट्सच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गतवर्षीच्या स्पर्धेत समरोपाच्या आधीच्या रात्री भरतीमुळे साऱ्या मैदानात पाणी भरून आले होते. बीच सॉकरचा अंतिम लढत होणार की नाही असो सवाल उपस्थित झाला होता. तेव्हा रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत उभे राहून पाणी काढण्यासाठी अक्षय कोटलवार यांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करीत नव्याने मैदान तयार केले. सॉकर लढत खेळवून स्पर्धा यशस्वी करून दाखवली होती. यंदाही स्पर्धा काळात महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्या खेळाडूंना अक्षय कोटलवार विशेष पाहुणचार देत होते. खेळाडूंची गैरसोय होऊ नये स्वतः मैदानात उपस्थित होते. खेलो इंडिया बीच स्पर्धेच्या यशानंतर आशियाई बीच स्पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे प्रयत्नशील आहेत.