Category: होम

प्राथमिक विद्यामंदिरमध्ये अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे उपक्रमाचे आयोजन

प्राथमिक विद्यामंदिरमध्ये अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे उपक्रमाचे आयोजन कल्याण: प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड कल्याण या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांना चालना मिळणारे प्रयोग,प्रकल्प,कृती, नवी संकल्पना सादर करण्यासाठी कल्पकता हवी यासाठी अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांघिक रित्या प्रकल्पाची मांडणी केली. अन्न व आरोग्य,वायु प्रदूषण, वाहतूक व दळणवळण, मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे या विषयावर प्रकल्प मांडणी मुलांनी केली. अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाचे उद्घाटन व परीक्षण धाकटे शहाडचे केंद्रप्रमुख रतिलाल चव्हाण व शीतल कोळी यांनी केले. शाळास्तरावर एकूण ७० प्रकल्पाची मांडणी करण्यात आली. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित अविष्कार कल्पकतेतून कृतीकडे या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी चार प्रकल्पाची निवड करण्यात आली. संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे यांच्या कल्पक कल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला जातो. यामुळे मुलांना प्रत्यक्ष कृती करून प्रकल्प तयार करण्याचा आनंद मिळतो व वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध होण्यास मदत मिळते अशा उपक्रमामुळे बाल वैज्ञानिक शाळेमध्ये तयार होण्यास मदत होते.

व्यवस्थेतले उंदीर…

छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात सुमारे सात कोटी रुपये किमतीचे 26 हजार क्विंटल धान गायब करण्यात आले. या घटनेने जनता हैराण झाली असली, तरी जिल्ह्याच्या पणन विभागातील अधिकारी या नुकसानीसाठी उंदीर, वाळवी…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरू हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांचे शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आलेले आहेत. तसेच जानेवारी २०२५ या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे; अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाचीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यातिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जानेवारी २०२६ या सत्राकरिता प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित पदवी सोवत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापनेपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजातील विविध घटकातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय व खाजगी संवेत उच्चपदावर कार्यरत आहेत. मानाची पदे भूषवत आहेत. हे विद्यापीठ सर्वसामान्य ते विशेष पारंगत अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रवेशद्वार ठरत आलेले आहे. येथे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तसेच वेब रेडिओ, दृकश्राव्य माध्यम व मोबाईलद्वारे देखील मार्गदर्शन केले जाते. दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित, दूरशिक्षण क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य यूजीसी मान्यताप्राप्त व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेले एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. विद्यापीठातर्फे सेनादल सैनिक, बंदीजन, कृषि सेवक, शेतमजूर आणि समाजातील इतरही घटक यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम आहेत. शिवाय ए.आय. डाटा सायन्स, सायबर ॲक्ट ते बीए, बीकॉम, एम. ए., एम. कॉम., एम. लिब., एम. सी. ए. यासह विविध व आधुनिक कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व शिक्षणक्रम नोकरदारांना आपली नोकरी व व्यवसायिकांना आपला व्यवसाय सांभाळून पूर्ण करता येतात. त्यामुळे संबंधित इच्छुकांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व सर्वार्थाने प्रगती साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक २० जानेवारी २०२६ पासून विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत विविध ८८ शिक्षणक्रमांचे ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. त्यात प्रमाणपत्र – ३२, पदविका – ३०, पदवी – ११ व पदव्युत्तर १५ शिक्षणक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्र्माचे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. प्रवेशासाठीची अंतिम मुदत ही येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मुदतीत विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटला भेट द्यावी. तेथे Admission  या पर्यायावरून Prospectus येथे विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (०२५३)२२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३१७१४ या विद्यार्थी मदत केंद्रावरील दूरध्वनी क्र्मांकावर किंवा ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२ अथवा ९२७२०४६७२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि लवकरात लवकर प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी

जि. प. व पं. स. निवडणूक वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी वापरणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहने वापरण्यास बंदी घालणारे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई केली आहे. हे आदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशांची जाहीर घोषणा व प्रसिध्दी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

टाटा मोटर्सकडून 1७ नेक्‍स्‍ट- जनरेशन ट्रक्‍स लाँच

टाटा मोटर्सकडून 1७ नेक्‍स्‍ट- जनरेशन ट्रक्‍स लाँच ठाणे : भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज आपल्‍या 1७ ट्रक्‍सचा नेक्‍स्‍ट- जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्‍स ७ टन ते ५५ टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत. यासह सुरक्षितता, नफा व प्रगतीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले आहे. या सर्वसमावेशक लाँचमध्‍ये ऑल- न्‍यू अझुरा सिरीज, अत्‍याधुनिक टाटा Trucks.ev श्रेणी आणि प्रस्‍थापित प्राइमा, सिग्‍ना व अल्‍ट्रा प्‍लॅटफॉर्म्‍समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे. जागतिक सुरक्षितता मानकांचे (ECE R29 ०3) काटेकोरपणे पालन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे ट्रक्‍स उत्‍पन्‍न क्षमता वाढवतात, एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतात आणि वेईकल अपटाइम वाढवतात, ज्‍यामुळे वाहतूकदारांना मोठे यश मिळते. नवीन ट्रक्स लाँच करत टाटा मोटर्स लि.चे एमडी व सीईओ गिरीश वाघ म्‍हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत आहे, ज्‍याला प्रगतीशील राष्‍ट्रीय धोरणे, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित, अधिक स्‍वच्‍छ व अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक्‍ससाठी वाढत्‍या मागणीने गती दिली आहे. टाटा मोटर्स मापदंड स्‍थापित करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे, जे उद्योगाच्‍या भविष्‍याला आकार देतात. लाँच करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या नेक्‍स्‍ट- जनरेशन पोर्टफोलिओमध्‍ये ऑल- न्‍यू अझुरा सिरीज, दोन प्रगत उच्‍च- कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स, आमच्‍या नवीन आय- एमओईव्‍ही आर्किटेक्‍चरवर आधारित भारतातील शून्‍य- उत्‍सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्‍स व ट्रिपर्सची व्‍यापक श्रेणी, युरोपियन मानक केबिन्‍स व उद्योग- अग्रणी सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड्स, अधिक पेलोड क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश आहे, जे सर्व फ्लीट एज डिजिटल सेवांसह एकीकृत करण्‍यात आले आहेत. यासह आम्‍ही या वारशाला अधिक पुढे नेत आहोत. ‘बेटर ऑल्‍वेज’ तत्त्वामधून प्रेरित आमची नाविन्‍यतेप्रती अविरत मोहिम, स्‍थानिकीकरणाप्रती दृढ कटिबद्धता आणि ग्राहकांना यशस्‍वी करण्‍यावरील निरंतर फोकस ‘आत्‍मनिर्भर भारत’च्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहेत, ज्‍यामुळे शाश्वत गतीशीलतेमध्‍ये नेतृत्‍व करण्‍याप्रती भारताचा आत्‍मनिर्भरपणा व महत्त्वाकांक्षा अधिक दृढ झाली आहे.’’

शहापूर वनविभागाचे सरकारी फलक भंगारात

शहापूर वनविभागाचे सरकारी फलक भंगारात धक्कादायक वास्तव उजेडात अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासनाकडून जनजागृतीपर बसविण्यात येणारे सरकारी फलक चक्कं आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून आहेत.अगदी निष्काळजीपणे हे फलक येथे टाकून देण्यात आले आहेत.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे. वनसंपत्तीचे नुकसान होऊ नये,यासाठी वनविभागाची सरकारी नियमावली त्यांचे कडक कायदे,याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे सुचना फलक शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या शहापूर, धसई,डोळखांब, वाशाळा, विहीगाव, खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात लावण्यात येणारे होते. परंतु हे सुचना फलक जंगलात लावण्यातच न आल्याने यातील बहुतांश फलक वनविभागाच्या आसनगाव काष्ट विक्री आगारातील आवारात अक्षरशः भंगारात अस्तव्यस्त, अवस्थेत अडगळीत, धुळखात, कचऱ्यात पडून आहेत. या सरकारी फलकांवर वनक्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणे,वन हद्दीतील खुणा व बुरुज नष्ट करणे, झाडांना इजा पोहचविणे व त्यांची तोड करणे, अतिक्रमण करणे, खोदकाम करणे, दगड,माती, वाळू काढणे व वाहतूक करणे, वणवे पेटविणे, वनास आग लावणे,धूम्रपान करणे,मद्यपान करणे,आदी कृत्य आढळून आल्यास सदर व्यक्ती भारतीय वन अधिनियमानुसार नुकसान भरपाई व्यतीरिक्त कारावास,तसेच द्रव्य दंडास पात्र असेल हा गुन्हा अजामीन पात्र आहे.गुन्हयात वापरलेली हत्यारे,अवजारे व वाहने,शासन जमा करण्यात येतील असं हुकुमावरून उपवनसंरक्षक शहापूर वनविभाग असा वनविभागाच्या या शासकीय कठोर नियमावली बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संदेशपर माहीती या सरकारी फलकांवर लिहिण्यात आलेली आहे.असे हे वनखात्याचे फलक वनविभागाकडून जंगलात लावण्यासाठी संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना पुरवठा करण्यात येणार होते.तथापि हे सरकारी फलक वेळेवर काही वनपरिक्षेत्र कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून नेण्यात आले नाहीत.परिणामी यातील बरेच फलक जंगलात बसविण्यात न आल्याने हे फलक आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळीजपणामुळे हे सरकारी फलक भंगार जमा झाल्याचे चित्र काष्ट विक्री आगारात दिसत असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अभिजीत पिंगळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी

राज्यात कुपोषित बालकांचे मृत्यू रोखण्यात शासन अपयशी रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्रात कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे मृत्यू अद्याप थांबले नसल्याने राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सातत्य आणि प्रभावी अंमलबजावणीचा अभाव दिसून येत असल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व पोषण सुविधा पुरेशा प्रमाणात पोहोचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. केवळ कागदोपत्री योजना जाहीर करून प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दिसला पाहिजे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यात सुमारे १९५ बालकांचा मृत्यू कुपोषणाशी संबंधित कारणांमुळे झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये माता व बाल आरोग्याची अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्याने नियोजनावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली. राज्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, अजूनही मोठ्या लोकसंख्येला मूलभूत पोषण, स्वच्छ पाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली.  आदिवासी व दुर्गम भागांमध्ये आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवणे आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.कुपोषणामुळे होणारे मृत्यू ही प्रशासनाच्या अपयशाची बाब असून, या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने ठोस आणि कालबद्ध उपाययोजना राबवाव्यात, असा स्पष्ट इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे.

 तानसा अभयारण्यात मद्यपी टोळक्यांचा उच्छाद

तानसा अभयारण्यात मद्यपी टोळक्यांचा उच्छाद जंगलात शेकडो दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचऱ्याचे ढीग; वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात वन्यजीव विभाग, पोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अविनाश उबाळे ठाणे : तानसा वन्यजीव अभयारण्यातील संरक्षित जंगल…

आगामी जनगणना २०२७ मध्ये होणार डिजिटल स्वरुपात!

आगामी जनगणना २०२७ मध्ये होणार डिजिटल स्वरुपात! ठाणे- जनगणना २०२७ Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत महत्वाचे प्रशिक्षण १९ जानेवारी रोजी समिती सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.   यावेळी जनगणना संचालनालयाचे अधिकारी प्रवीण भगत, सहाय्यक निर्देशक व सांख्यिकी अन्वेशक  अरुण साळगांवकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त जनगणना विषयक कामकाज हाताळणारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना Houselisting Block Formation (घर यादी तयार करणे) बाबत प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणासाठी स्वतः जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, भिवंडी तहसिलदार अभिजित खोले, मुरबाड तहसिलदार अभिजित देशमुख, शहापूर तहसिलदार .परमेश्वर कासुळे, अंबरनाथ तहसिलदार अमित पुरी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.

गोवेली येथे २३ जानेवारीला मराठी भाषेच्या ‘बोलींचा जागर’

गोवेली येथे २३ जानेवारीला मराठी भाषेच्या ‘बोलींचा जागर’ कल्याण: मराठी भाषा ही विविध बोलींनी नटलेली, समृद्ध आणि सशक्त भाषा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठी भाषेचे वैभव असून त्या त्या प्रदेशाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख जपतात. या बोलींचे जतन, संवर्धन व अभ्यास घडावा, या उद्देशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘बोलींचा जागर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ जानेवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत गोवेली येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषेतील विविध बोली या भाषेची ताकद असून त्या लोकजीवन, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवतात. या बोलींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासन मराठी विभाग , भाषा संचालनालय, विद्यापीठे व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडी व शोभायात्रेने होणार असून त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल. मुख्य कार्यक्रमात बोलींचा जागर, प्रातिनिधिक वारली व कुपारी या स्थानिक बोलींतील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण, संवाद तसेच बोलीभाषा अभ्यासकांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. नेहा सावंत आणि डॉ. रुपेश कोडिलकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  रवींद्र घोडविंदे राहणार आहेत. या उपक्रमाचे निमंत्रण मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, तसेच महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय भाषा संचालक अरुण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून मराठी विभाग प्रमुख प्रा. हरेंद्र सोष्टे आणि प्रा. सतीश लकडे हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेच्या विविध बोलींचा सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, भाषा अभ्यासक, साहित्यप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.