Category: होम

 मुंबईकरांवर आता कचरा शुल्क आकारणार?

 १०० ते १००० रुपये भुर्दंड, प्रशासकांसमोर सादरीकरण झाले   मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारती, हॉटेल आणि कमर्शियल कारखान्यांतून निघणाऱ्या कचऱ्यांवर आता मुंबई महापालिका निर्मूलन कर आकारण्याच्या विचारात असून, सोमवारी झालेल्या सादरीकरणानुसार ही करवाढ लादली गेलीच तर केवळ निवासी घरांना तब्बल ६८७ कोटी रुपयांचा कचरा कर भरावा लागू शकतो. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सोमवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा कर लागू करण्यासोबतच उघड्यावर धुंकणे, उघड्यावर कचरा करण्यावरील दंड वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सध्या धुंकण्यावर फक्त २०० रुपये दंड आहे. तो ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव सादरीकरणात ठेवला गेला. मात्र, सर्वांत मोठा विषय आहे तो कचरा कर लावण्याचा आणि त्यासाठी महापालिकेचे उपविधी अर्थात बायलॉज बदलावे लागणार आहेत. या बदलासाठीची कायदेशीर बाबी तपासण्याचे निर्देश गगराणी यांनी दिल्याचे कळते. मुंबई महापालिकेकडून ५०० फुटांपर्यंतच्या घरांना किमान १०० रुपये, तर त्यापेक्षा मोठ्या घरांना ५०० ते १००० रुपये कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यापारी गाळे आणि व्यापारी संकुलांवर हेच कचरा शुल्क किती आकारायचे हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, निवासी भागापेक्षा ते नक्कीच जास्त असेल. अर्थात असे कोणतेही शुल्क लादताना मुंबईकरांच्या सूचना, हकरती विचारात घ्याव्या लागतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. यापूर्वी २०१९- २० मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि त्यानंतर २०२०- २१ मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रत्येक सोसायटीला कचरा शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तत्कालीन नगर सेवकांनी विरोध केल्याने सदर योजनेला स्थगिती मिळाली होती. आता प्रशासकीय राजवटीत या प्रस्तावाने पुन्हा उचल खाल्ली आहे. अधिकारी सूत्रांनी पुढारीला सांगितले की, मुंबई महापालिका कायद्यानुसार, घनकचरा व्यवस्थापनाच्या सेवा मोफत देणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. म्हणूनच या सेवेवर कोणतेही शुल्क आतापर्यंत आकारता आलेले नाही. ते लादायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. सध्या पुणे, चेन्नई आणि दिल्लीत घनकचरा उचलण्यासाठी निवासी गाळ्यांना सरसकट १०० रुपये, तर व्यापारी गाळ्यांसाठी ५०० रुपये कचरा शुल्क आकारले जाते. ही ढाल आता मुंबईतही पुढे केली जात आहे. अर्थात माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आदी नेत्यांनी या हालचालींना विरोध चालवला असून, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कचरा शुल्क आकारणी रोखली जाण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनीही या हालचालींना विरोध केला आहे. मुंबईकरांकडून महापालिका कचरा शुल्क आकारणार असल्याचे समजले असून लवकरच दोन-तीन दिवसांत मी आणि भाजपा नेते महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विरोध दर्शविणार आहोत, असे रवी राजा म्हणाले.

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते.

– रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा

 भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे मागणी ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे केली. घरग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्यांतर्गतची नोंदणी व बिल्डरने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून मंजूर झालेल्या कर्जातून कल्याण-डोंबिवलीतील ५८ इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांनी घरे घेतली असून, सहा हजार नागरिक राहत आहेत. कालांतराने रेरा कायद्याअंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी बिल्डरांनी महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिकेने संबंधित इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकारामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांची व्यथा आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज मांडली. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यावी. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला निर्देश द्यावेत. तसेच या प्रकरणी बिल्डरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली

रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

  मेनरोड, शालिमार भागात कारवाई नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड 

पनवेल : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे…

सांगलवाडी, सांगलीत कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या विद्यमाने व युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने २८ डिसेंबर ते १जानेवारी  या कालावधीत ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा चिंचबाग मैदान, सांगलवाडी, सांगली येते होईल. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला कुमार/कुमारी गटाचा संघ ८ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. मातीच्या ६ क्रीडांगणावर होणारी ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संलग्न जिल्हा मुलींच्या संघाने २७ डिसेंबरला सायं. ०४-०० वा. स्पर्धेच्या स्थळी आपली उपस्थिती राखाव.  त्याच दिवशी मुलींची वजने व छाननी केली जाईल. तर मुलांच्या सर्व संघानी २९ डिसेंबर सायं. ०४-०० वा. आपली उपस्थिती राखावी. मुलांची वजने व छाननी २९ डिसेंबरला करण्यात येतील. सर्व जिल्हा संघटनांच्या सचिवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन राज्य कबड्डी असो. चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे. 0000  

शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलीसांना बडतर्फ करा – हिरामण गायकवाड

अशोक गायकवाड कर्जत:परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील विश्वरत्न बाबासाहेब डॉ . भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारका शेजारच्या संविधान प्रतिमेची विटंबना व अवमान प्रकरणी संबंधित घटनेचे शांततापूर्ण निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना अमानुष बेदम मारहाण केली. या आंदोलनामध्ये सामील नसलेला कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी, भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला असल्याने सदर प्रकरणात सखोल कठोर व निपक्षपणे न्यायालयीन चौकशी करावी व याप्रकरणी मारहाण करणारे जे पोलीस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड या जातीयवादी आणि मनुवादी विचार सरणीच्या पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करावे, अशी संतप्त मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी केली. सोमवार १६ डिसेंबरला कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत डी.डी टेळे , तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना या घटने संबंधी निवेदन देण्यात आले. झालेली घटना ठरवून केली असून केलेली मारहाण अतिशय निंदनीय होती. यामुळेच एका निष्पाप भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेची चौकशी होवून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा त्यांनी जाहीर निषेध करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे अशी संतप्त मागणी आर पी आय (आ) कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी केली आहे. यावेळी कर्जत तालुक्यात संतप्त वातावरण असून निवेदन देतेप्रसंगी किशोर गायकवाड – संपर्कप्रमुख आरपीआय, अशोक गायकवाड सचिव, प्रेमनाथ जाधव – पत्रकार / पक्ष प्रवक्ता, विकास गायकवाड – खजिनदार, विजय गायकवाड – प्रसिद्धी प्रमुख, नितीन सोनवणे पंचायत समिती अध्यक्ष वेणगाव, अमर जाधव पंचायत समिती अध्यक्ष सावेळे, सतीश रिकेबे – तालुका संघटक, हरिश्चंद्र सदावर्ते – कार्याध्यक्ष नेरळ शहर, बाळा चंदनशिवे – अध्यक्ष नेरळ शहर, मयूर गायकवाड, रूपेश उर्फ बिनू रोकडे, उमेश भालेराव, महेंद्र भालेराव, अमित गायकवाड, ईश्वर भालेराव, कैलास पोटे सामाजिक कार्यकर्ता, जगदीश जाधव, अनिल जाधव, विश्वास भालेराव, त्याचप्रमाणे महिला कार्यकर्ते मंजुळा किशोर गायकवाड, अक्षदा अमित गायकवाड उपाध्यक्ष महिला आरपीआय, राधिका रविंद्र गायकवाड, योगिनी हिरामण गायकवाड, रेखा देवराम गायकवाड, रेखा चंद्रकांत जाधव, निशा प्रमोद लवांडे , अस्मिता जितेंद्र गायकवाड, शुभांगी महेंद्र भालेराव, कविता राजेश गायकवाड, ज्योती भारत रोकडे, कांचन उमेश भालेराव, त्याचप्रमाणे आर पी आय चे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सफाई मित्रांकरिता विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

नवी मुंबई : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDS) व्दारे ‘नमस्ते’ योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्रांसाठी महानगरपालिका क्षेत्रातील मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक यांची सुरक्षित साफसफाई या विषयाबाबत विशेष कार्यशाळा नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यधुनिक यंत्रणा वापरुन शहर स्वच्छतेवर भर दिला जात असतानाच शहर स्वच्छतेसाठी झटणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत सफाईमित्रांसाठी आयोजित करण्यात आलेली ही विशेष कार्यशाळा प्रातिनिधीक स्वरुपातील 50 हून अधिक सफाईमित्र यांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या वतीने जेनरोबोटिक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक सुरक्षितरित्या सफाई करण्याची गरज विशद करण्यात आली तसेच त्याकरिता असलेल्या नियमांची व कायद्यांची माहिती देण्यात आली. मॅनहोलची सफाई पध्दत पूर्णपणे बंद करुन मशीनहोल सफाईचा अंगिकार करण्याच्या कायद्याविषयी माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका कायदा होण्याच्या आधीपासूनच मशीनहोल सफाईला प्राधान्य देत असल्याबद्दल जेनरोबोटिकच्या प्रशिक्षकांनी प्रशंसा केली. यावेळी सुरक्षा साधने व सुरक्षित यंत्रसामुग्री यांचीही सविस्तर माहिती प्रशिक्षकांनी दिली. सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देत प्रशिक्षकांनी स्वच्छता उद्यमी योजनेंतर्गत सफाई मित्रांना कर्ज स्वरुपात वित्त पुरवठा केला जातो त्याची सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच ‘नमस्ते’ आणि ‘दक्ष’ उपक्रमांतर्गत करण्यात येणा-या कामाची माहिती दिली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता श्री. दिपक सूर्यराव, कनिष्ठ अभियंता श्री. दिलीप बेनके व श्री. वैभव देशमुख यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. मलनि:स्सारण व्यवस्थापनाप्रमाणेच हा स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग असल्याने तसेच स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सध्या स्वच्छ शौचालय अभियान सुरू असल्याने यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागानेही महत्वाचा आयोजन सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती

मुंबई : विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. विधीमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची २०१२ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदविली. गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले. तसेच ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून, `एमपीएससी’साठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मंजूर करुन घेतले. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सर्व शाळा डिजिटल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत कोकणातील शेकडो शाळांना संगणकासह विविध साहित्यपुरवठा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  हेपाच जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय, तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

घोडबंदरवासींच्या माथी टँकरपोटी लाखोंचा बोजा !

तत्काळ २५ एमएलडी पाणी द्या – आमदार संजय केळकर अनिल ठाणेकर नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त २५ एमएलडी पाणी देण्याची मागणी केली. घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. एकीकडे पाणी टंचाईने रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत. या संकुलामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही श्री.केळकर यांनी उपस्थित केला आहे. ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला मी पत्र दिले असून पाठपुरावाही करत आहे. शहराला ५० एमएलडी ज्यादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी २५ एमएलडी पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.