Category: मुंबई

Mumbai news

विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी ५०० ऐवजी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्रासाठी वापरण्याची परवानगी द्यावी – आमदार सुनिल शिंदे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती

केतन खेडेकर मुंबई : राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र, करार आणि आमबंधीत कागदपत्रांसाठी लागणारे १०० आणि २०० रुपयांचे स्टँम्प पेपर रद्दबातल करून त्याऐवजी ५०० रुपयांचा स्टँम्प पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. दि.…

ठाण्यात टिएमटीचे कंत्राटी चालक अघोषित संपावर

 नागरिकांचे हाल   ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ५५० कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी त्यातच, टिएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात टिएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे ५० बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही. यातील २२५ बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंद नगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टिएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी टिएमटीचे चालक अघोषित संपावर गेले. ठेकेदारने नियमानुसार वेतन वाढविले नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. टिएमटीच्या बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टिएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाकडून हा संप मिटविण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टिएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे. त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 00000

ठाण्याच्या मनोरमा नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची दुरवस्था

अनिल ठाणेकर ठाणे : शहराच्या मनोरमा नगर या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून उभारण्यात आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अत्यंत दुरवस्था झाली असून, संस्कार केंद्राची अनेक महिने स्वच्छता न केल्याने, पालापाचोळा आणि कचरा साचल्यामुळे, साहजिकच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा एकप्रकारे अवमान असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशीदेखील, संबंधित संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांचे याठिकाणी दुर्लक्ष झालेले असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मनोरमा नगरमधील श्रुती पार्क कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणाऱ्या, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसथांब्याला लागुनच हे संस्कार केंद्र असून, आधीच फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनोरमा नगरमध्ये वास्तव्यास असणारे आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि ‘लोकमित्र’ दैनिकाचे संपादक कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, या संस्कार केंद्राशी संबंधित असणाऱ्यांचा, बाबासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नसून, निव्वळ बॅनरवर झळकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झटणारे ते कार्यकर्ते असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सध्या ठाणे शहराच्या विविध भागांत, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती मोहीम व “जनमत-चाचणी” सुरु करण्यात आलेली असून, त्याच अनुषंगाने सोमवार, १६ डिसेंबर-२०२४ रोजी, मनोरमा नगर येथे, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरातील नागरिकांना केले जात असताना, याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या एका कार्यकर्त्याने, याठिकाणी बांधण्यात आलेला ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणांचा फलक, जो कार्यक्रम संपेपर्यंत ठेवण्यात येणार होता, तो दादागिरी करुन काढायला लावला होता. यासंदर्भात, पत्रकार कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, मतदानाचा अधिकार हा, बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार असून, त्याचा प्रसार करणारा फलक लावण्यास संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्याने आक्षेप घेणे, ही लाजिरवाणी घटना असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. एकेठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली संस्कार केंद्राची उभारणी करायची आणि दुसरीकडे त्याची स्वच्छता न राखता, उलट लोकशाहीमार्गाने जनजागृती करणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यकर्त्यांवर अरेरावी करायची, ही संस्कृती नसून, विकृती असल्याचे तिखट प्रतिक्रिया पत्रकार कुणाल बागुल यांनी, याप्रकरणी दिली आहे. 0000

भाजप सरकारचा फायदा गरिबांना नाही तर मुठभर श्रीमंतानाच-वर्षा गायकवाड

मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत…

 मुंबईकरांवर आता कचरा शुल्क आकारणार?

 १०० ते १००० रुपये भुर्दंड, प्रशासकांसमोर सादरीकरण झाले   मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारती, हॉटेल आणि कमर्शियल कारखान्यांतून निघणाऱ्या कचऱ्यांवर आता मुंबई महापालिका निर्मूलन कर आकारण्याच्या विचारात असून, सोमवारी झालेल्या सादरीकरणानुसार ही करवाढ लादली गेलीच तर केवळ निवासी घरांना तब्बल ६८७ कोटी रुपयांचा कचरा कर भरावा लागू शकतो. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सोमवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा कर लागू करण्यासोबतच उघड्यावर धुंकणे, उघड्यावर कचरा करण्यावरील दंड वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सध्या धुंकण्यावर फक्त २०० रुपये दंड आहे. तो ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव सादरीकरणात ठेवला गेला. मात्र, सर्वांत मोठा विषय आहे तो कचरा कर लावण्याचा आणि त्यासाठी महापालिकेचे उपविधी अर्थात बायलॉज बदलावे लागणार आहेत. या बदलासाठीची कायदेशीर बाबी तपासण्याचे निर्देश गगराणी यांनी दिल्याचे कळते. मुंबई महापालिकेकडून ५०० फुटांपर्यंतच्या घरांना किमान १०० रुपये, तर त्यापेक्षा मोठ्या घरांना ५०० ते १००० रुपये कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यापारी गाळे आणि व्यापारी संकुलांवर हेच कचरा शुल्क किती आकारायचे हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, निवासी भागापेक्षा ते नक्कीच जास्त असेल. अर्थात असे कोणतेही शुल्क लादताना मुंबईकरांच्या सूचना, हकरती विचारात घ्याव्या लागतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. यापूर्वी २०१९- २० मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि त्यानंतर २०२०- २१ मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रत्येक सोसायटीला कचरा शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तत्कालीन नगर सेवकांनी विरोध केल्याने सदर योजनेला स्थगिती मिळाली होती. आता प्रशासकीय राजवटीत या प्रस्तावाने पुन्हा उचल खाल्ली आहे. अधिकारी सूत्रांनी पुढारीला सांगितले की, मुंबई महापालिका कायद्यानुसार, घनकचरा व्यवस्थापनाच्या सेवा मोफत देणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. म्हणूनच या सेवेवर कोणतेही शुल्क आतापर्यंत आकारता आलेले नाही. ते लादायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. सध्या पुणे, चेन्नई आणि दिल्लीत घनकचरा उचलण्यासाठी निवासी गाळ्यांना सरसकट १०० रुपये, तर व्यापारी गाळ्यांसाठी ५०० रुपये कचरा शुल्क आकारले जाते. ही ढाल आता मुंबईतही पुढे केली जात आहे. अर्थात माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आदी नेत्यांनी या हालचालींना विरोध चालवला असून, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कचरा शुल्क आकारणी रोखली जाण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनीही या हालचालींना विरोध केला आहे. मुंबईकरांकडून महापालिका कचरा शुल्क आकारणार असल्याचे समजले असून लवकरच दोन-तीन दिवसांत मी आणि भाजपा नेते महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विरोध दर्शविणार आहोत, असे रवी राजा म्हणाले.

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड 

पनवेल : पत्रकारिता क्षेत्रासोबत सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या पनवेल तालुका विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.  पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची वार्षिक सर्वसाधारण बैठक मंचाचे…

सांगलवाडी, सांगलीत कुमार राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसीएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसीएशनच्या विद्यमाने व युवक मराठा क्रीडा संस्था यांच्या सहकार्याने २८ डिसेंबर ते १जानेवारी  या कालावधीत ५१व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य कबड्डी असो.चे उपाध्यक्ष व माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा चिंचबाग मैदान, सांगलवाडी, सांगली येते होईल. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला कुमार/कुमारी गटाचा संघ ८ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. मातीच्या ६ क्रीडांगणावर होणारी ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व संलग्न जिल्हा मुलींच्या संघाने २७ डिसेंबरला सायं. ०४-०० वा. स्पर्धेच्या स्थळी आपली उपस्थिती राखाव.  त्याच दिवशी मुलींची वजने व छाननी केली जाईल. तर मुलांच्या सर्व संघानी २९ डिसेंबर सायं. ०४-०० वा. आपली उपस्थिती राखावी. मुलांची वजने व छाननी २९ डिसेंबरला करण्यात येतील. सर्व जिल्हा संघटनांच्या सचिवांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन राज्य कबड्डी असो. चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे. 0000  

सफाई मित्रांकरिता विशेष कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

नवी मुंबई : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDS) व्दारे ‘नमस्ते’ योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्रांसाठी महानगरपालिका क्षेत्रातील मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक यांची सुरक्षित साफसफाई या विषयाबाबत विशेष कार्यशाळा नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यधुनिक यंत्रणा वापरुन शहर स्वच्छतेवर भर दिला जात असतानाच शहर स्वच्छतेसाठी झटणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत सफाईमित्रांसाठी आयोजित करण्यात आलेली ही विशेष कार्यशाळा प्रातिनिधीक स्वरुपातील 50 हून अधिक सफाईमित्र यांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या वतीने जेनरोबोटिक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक सुरक्षितरित्या सफाई करण्याची गरज विशद करण्यात आली तसेच त्याकरिता असलेल्या नियमांची व कायद्यांची माहिती देण्यात आली. मॅनहोलची सफाई पध्दत पूर्णपणे बंद करुन मशीनहोल सफाईचा अंगिकार करण्याच्या कायद्याविषयी माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका कायदा होण्याच्या आधीपासूनच मशीनहोल सफाईला प्राधान्य देत असल्याबद्दल जेनरोबोटिकच्या प्रशिक्षकांनी प्रशंसा केली. यावेळी सुरक्षा साधने व सुरक्षित यंत्रसामुग्री यांचीही सविस्तर माहिती प्रशिक्षकांनी दिली. सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देत प्रशिक्षकांनी स्वच्छता उद्यमी योजनेंतर्गत सफाई मित्रांना कर्ज स्वरुपात वित्त पुरवठा केला जातो त्याची सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच ‘नमस्ते’ आणि ‘दक्ष’ उपक्रमांतर्गत करण्यात येणा-या कामाची माहिती दिली. अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता श्री. दिपक सूर्यराव, कनिष्ठ अभियंता श्री. दिलीप बेनके व श्री. वैभव देशमुख यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. मलनि:स्सारण व्यवस्थापनाप्रमाणेच हा स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग असल्याने तसेच स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सध्या स्वच्छ शौचालय अभियान सुरू असल्याने यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागानेही महत्वाचा आयोजन सहभाग घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती

मुंबई : विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आमदार डावखरे यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे. विधीमंडळातील तरुण चेहरा म्हणून आमदार निरंजन डावखरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून त्यांची २०१२ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी विधान परिषद निवडणुकीत हॅट्रिक नोंदविली. गेल्या १२ वर्षांच्या काळात त्यांनी विधान परिषदेत शैक्षणिक, सामाजिक आणि नागरी समस्यांकडे सातत्याने लक्ष वेधले. तसेच ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील शिक्षकांचे प्रश्नही त्यांनी हिरीरीने मांडले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या असून, `एमपीएससी’साठी बेलापूर येथे स्वतंत्र मुख्यालय मंजूर करुन घेतले. कोकणातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सर्व शाळा डिजिटल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत कोकणातील शेकडो शाळांना संगणकासह विविध साहित्यपुरवठा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग  हेपाच जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत. त्याचबरोबर काही शहरात विद्यापीठाची उपकेंद्रे आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालयातील समन्वय, तसेच उपकेंद्रात नवे अभ्यासक्रम आणि प्रशासकीय सुधारणा आदी करण्यामध्ये कोकणचे आमदार निरंजन डावखरे यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळाली मान्यता !

एनआरएमयुचा हा ऐतिहासिक विजय रेल्वे कामगारांना समर्पित – वेणू नायर अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय रेल्वेत ४ ते ६ डिसेंबरला रेल्वे कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली. या निवडणुकीत वेगळ्या संघटनांनी भाग घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन मात्र कामगारांच्या विश्वासावर एकटी मान्यतेसाठी निवडणूक रिंगणात होती. कामगारांनी या निवडणुकीत आव्हानाला सडेतोड उत्तर देऊन आपला विश्वास,  सर्वधर्म समभाव असलेली व कामगारांचे खरे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरचिटणीस वेणू नायर यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला विजय मिळवून दिला.रेल्वे कामगारांचा हा ऐतिहासिक विजय असून, हा विजय आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रीया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस वेणू नायर यांनी दिल्याचे कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी सांगितले. नॅशनल रेल्वे फेडरेशन ऑफ इंडिया ला संलग्न असलेली सेंट्रल रेल्वे मंजूर संघटना या संघटनेने आपला संपूर्ण जीव ओतून अनेक राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कामगार संघटनाला सोबत घेऊन: मान्यता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला मान्यता मिळू नये म्हणूनसर्व संघटना बरोबर हातमिळवणी केली. परंतु कामगारांच्या मनात रुजलेली, भ्रष्टाचारी नसलेली शंभर वर्षाची परंपरा असलेल्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला ४१.५८ टक्के मतदान करून मध्य रेल्वेच्या कामगारांनी मोठे योगदान देऊन विरोधी संघटनांना त्यांची जागा दाखवून दिली. या निवडणुकीत रेल्वे कामगारानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनवर विश्वास ठेवून आपले बहुमूल्य मतदान केले. त्याबद्दल युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांनी कामगारांना धन्यवाद देऊन सांगितले की.  रेल्वे कामगारांचा ऐतिहासिक विजय असून, हा विजय  आम्ही रेल्वे कामगारांना समर्पित करीत आहोत यबद्दल. . या निवडणुकीत कामगारांची एकता,  प्रगतीची दिशा दिसून आली. या निवडणुकीत प्रत्येक शाखा, मंडळ,  मुख्यालय व प्रत्येक सदस्यांनी मनापासून काम केले,  त्याचीच ही पोहचपावती आहे. रेल्वे कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता मिरवणूक काढून मध्य रेल्वेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला मिळालेल्या मान्यतेचा हा ऐतिहासिक विजयी सोहळा साजरा करण्यात आला. अशाच प्रकारे विविध ठिकाणी मोर्चे काढून विजय सोहळा, मंडळ व डेपोमधील कार्यकर्त्यांनी साजरा केला.