Category: मुंबई

Mumbai news

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई: भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई  : पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एक ची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे  यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी १ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे व तसे निवेदन संबधितांना दिले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात.काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही.जुन्नर-आंबेगाव चे प्रांत यांच्यावर शुक्रवारी झालेली कारवाई काय अधोरेखित करीत आहे? १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी,खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही असे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे. एका प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांचा आदेश नऊ वर्षापुर्वी रद्द करूनही आजतागायत अंमल नाही.अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांच्या आदेशात स्पष्ट बाबी नमुद असुनही राजकीय दबावातून नोव्हेंबर २०२५ मध्ये तहसीलदार खेड यांचेकडील चौकशी पुर्ण होऊनही अर्जदारांना न्याय नाही.खेडमधील महसुल विभागातील एक मोठा अधिकारी व त्याची केबिन एजटांसाठी खुली असते.  एजंट,पुढारी आले का ते थेट अँटी चेंबरमध्ये साहेबाला न विचारता जातात व नंतर साहेबही अँटी चेंबरमध्ये जातात व खुप वेळ गोपनीय चर्चा होत असते, नागरिक मात्र वाऱ्यावर अशी स्थिती आहे असा आरोप अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी? उपविभागीय अधिकारी खेड कार्यालयात अनेक सामान्य नागरिकांच्या केस सुनावणी पुर्ण होऊनही निकाल पुर्ण होत नाही.दोन महिन्यापुर्वी काहींनी सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी उपविभागीय अधिकारी,प्रांत खेड यांची भेट घेतली तर अपिल विभागाचे क्लार्क यांना केस नं व माहिती सांगा ,आठवड्यात होईल असे सांगितले,त्यांना अनेकदा भेटल्यानंतर माहित नाही,फाईल पाठविली अशी उत्तरे दिली जात आहेत असे टाव्हरे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन १ एप्रिलपासून करणार असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले असून जर प्रशासनावर कोणताही अंकुश नसेल,महसुलमंत्री तीन महिन्यात आदेश झाले पाहिजे किंवा नागरिकांसाठी तातडीने जिल्हाधिकारी यांना देखी निर्देश देतात,परंतु अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी विशद केले आहे.

अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धा

श्रेयांश, पलाशचा विजयी फॉर्म कायम मुंबई, ३० मार्च: श्रेयांश सोमैयाने (३ गुण) सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला.  पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने पुन्हा एकदा काळ्या सोंगट्यांनी खेळताना अथर्व पोलेकरवर (२ गुण) मात दिली. पाचव्या बोर्डवर, पलाश मापाराने (३ गुण) काळ्या सोंगट्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (२ गुण) पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. एएफएम सोहम पवारने (३ गुण) देखील अनिश एस कश्यपचा (२ गुण) पराभव करत तिसरा गुण मिळवला. निकाल – दुसरी फेरी (टॉप-10): अथर्व पोळेकर (2) पराभूत वि. श्रेयांश सोमय्या(3) – 0-1;तनुज, दयाल (2.5) बरोबरी वि. एआयएम आकाशकुमार यादव (2.5) – 0.5-0.5; दीपक सोनी (2) पराभूत वि. आश्वी अंकित अग्रवाल (3)- 0-1; एएफएम सोहम पवार (3) विजयी वि. अनिश एस कश्यप (2) – 1-0; प्रेयस वाघमारे (2) पराभूत वि. पलाश मापारा (3)- 0-1; तिस्या अपूर्वा पट्ट (2) पराभूत वि. प्रतीक यादनिक (3)- 0-1; ईशान जथान (2) पराभूत वि. एजीएम राजवीर नहार (3)– 0-1; मेहुल तांडेल (२) पराभूत वि. अनिरुद्ध आनंद अय्यर(३) – ०-१; अहान कातरुका (3) विजयी वि. अभिजय बरुआ (2) – 1-0; पंकज बोरसे (2.5) बरोबरी एएफएम ओंकार विश्वास गायकवाड (2.5) – 0.5-0.5. 00000000

आम्ही सातारकर उद्योजक संघाचा ४ एप्रिलला भव्य व्यावसायिक मेळावा

मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान संलग्न आम्ही सातारकर उद्योजक संघाचा भव्य व्यावसायिक मेळआवा ४ एप्रिलला होणार आहे. हा मेळावा मनोहर जोशी हायस्कूल, निसर्ग उद्यानासमोर, धारावी, मुंबई येथे सकाळी १०…

‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचा प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सहभाग

अनिल ठाणेकर मुंबई, प्रथम भारतीय नौकानयन लीग २०२६ मध्ये सागर जोंधळे आणि अनीता म्हात्रे, ‘मुंबई मेरिडियन्स’ या टीमचे मालक म्हणून मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही प्रतिष्ठित स्पर्धा ३१ मार्च २०२६ पर्यंत सुंदर उमियम वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये एकूण १४ टीम्स, १८२ सहभागी, ८ देश आणि ५८ आंतरराष्ट्रीय सेलर्स सहभागी झाले आहेत जे या स्पर्धेचा जागतिक दर्जा आणि भव्यता दर्शवतात. ‘मुंबई मेरिडियन्स’ टीमची खासियत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधता. या टीममध्ये रशिया, मलेशिया आणि मुंबई येथील उत्कृष्ट खेळाडू सहभागी आहेत, जे एकत्र येऊन जागतिक स्पर्धात्मकता आणि टीमवर्क दाखवत आहेत. प्रशिक्षक, वर्ल्ड चॅम्पियन कोच विकास कपिला यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एशियन चॅम्पियन टीम मॅनेजर शिल्पा ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली, सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहोत. ‘मुंबई मेरिडियन्स’ ही केवळ एक टीम नाही ती एक मिशन आहे. ‘मुंबई मेरिडियन्स टीमला सपोर्ट करा, आणि चला एकत्र येऊन भारताला जागतिक नौकानयन मंचावर उजळून टाकूया.भारतामध्ये नौकानयन खेळाला नवीन उंचीवर नेण्याचं, आणि युवा पिढीला या साहसी खेळासाठी प्रेरित करण्याचे सर्व क्रीडाप्रेमींना आणि देशवासियांना आवाहन सागर जोंधळे यांनी केले आहे. 00000000

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा

प्रतिष्ठित ‘पंजाब मेल’ ट्रेन महोत्सव होणार साजरा (राजेंद्र साळसकर) मुंबई- मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक ‘पंजाब मेल’ (ट्रेन क्रमांक १२१३७/१२१३८) च्या ‘ट्रेन महोत्सवा’चे आयोजन करत असल्याची घोषणा मोठ्या  अभिमानाने केली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच ३० मार्च २०२६ रोजी  संध्याकाळी ६.३५ वाजता, या उत्सवाला सुरुवात होईल. या गाडीला वारसा-आधारित  नक्षीकाम आणि दृश्यांनी सुशोभित करण्यात येईल; जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करेल. हा सोहळा ‘पंजाब मेल’च्या प्रवासाचा लक्ष  वेधून घेईल, जी भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे,. ‘ट्रेन महोत्सव’ उपक्रमाचा एक भाग म्हणून, ‘पंजाब मेल’ची ऐतिहासिक मोहिनी अबाधित राखतच, प्रवाशांचा आराम व सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने या गाडीचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे: आतील भाग (प्रथम वातानुकूलित), उत्तम सौंदर्यासाठी कूपै आणि आयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग. बाहेरील ब्रँडिंगमध्ये प्रथम वातानुकूलित-  द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंगने केले गेले आहे. पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत. वातानुकूलित कोचच्या  आत वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.  सर्व वातानुकूलित कोचमध्ये नवीन पडदे पुरवले आहेत. ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद. सामायिक जागा: अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि शौचालयांमध्ये विनाइल रॅपिंग. फलक: सर्व कोचमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक. फायनल टच: अधिक सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा फायनल टच-अप करण्यात आला आहे. पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.बॅलार्ड पिअर मेल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मोलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. ‘पंजाब मेल’ ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यान- पिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या ‘मध्य रेल्वे’च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतिक म्हणून उभी आहे.  मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगती यांच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध महापौर  रितू तावडे यांनी दिली मदतीची ग्वाही मुंबई : “वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालविण्यात येणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या  ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ मध्ये मुंबईच्या महापौर  रितू तावडे या प्रमुख पाहुण्या म्हणून  उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट ज्येष्ठ व बाल सभासदांचा महापौर  रितू तावडे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.ग्रंथोत्सवातील शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाच्या दालनास भेट देऊन महापौरांनी ‘भारताचे संविधान’ (सुधारित आवृत्ती २०२५) हा ग्रंथ स्वत: खरेदी केला. ‘हा अमूल्य ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा, या  कार्याध्यक्ष  व द ग्लोबल टाइम्स दैनिकाच्या कार्यकारी संपादक  शीतल  करदेकर  यांच्या सूचनेचे स्वागत करुन तशी सूचना करून महापौरांनी याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासह इतरही विविध ग्रंथ, पुस्तके यांची महापौरांनी खरेदी केली. संदर्भ विभागात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. इतिहासाचा हा ठेवा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या ग्रंथसंग्रहालयातील डिजिटलायझेशन प्रकल्पाची महापौरांनी बारकाईने पाहणी केली. दुर्मिळ ग्रंथ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कसे जतन केले जातात, या स्कॅनिंग प्रक्रियेची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांची ग्रंथोत्सवातील उपस्थिती पाहून महापौरांनी आनंद व्यक्त केला आणि ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर राज्य भाषा संचालक  अरुण गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे आणि कार्याध्यक्ष  शीतल करदेकर उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल  मिताली तरळ,  उमा नाबर, जयवंत गोलतकर, विनायक परब यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान

अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  बृहन्मुंबई गुजराती समाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गिरनार ॲवॉर्ड समारंभात अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. रविवारी त्यांचे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आगमन झाले असतांना बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. याचवेळी डॉ हेमराज शाह यांनी अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई गुजराती समाज तर्फे गेल्या तीस हून अधिक वर्षांपासून समाजातील विशिष्ट व्यक्तींचा, खेळाडू, कलावंत आदींना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्मारक गिरनार ॲवॉर्ड प्रदान करण्यात येतो. संतांच्या श्रेणीत अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींना गुजराती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे रविवारी हा गुजराती गौरव पुरस्कार डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वयाची ८६ वर्षं पूर्ण करणाऱ्या डॉ हेमराज शाह यांना अखिल भारती अचलगच्छ संघा तर्फे गौरविण्यात आले. अचलगच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वरजींनी डॉ हेमराज शाह यांना आशीर्वाद देतांना सांगितले की, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे महत्त्व अनोखे आणि त्यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे. अंधेरी येथील सात मजली गुजराती भवन म्हणजे आपला गौरव आहे. यात नवनीत परिवाराचे योगदान सुद्धा महत्वपूर्ण आहे. डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ‘हेमूदादा’चा सुगंध या वर्षातही डोळे दीपविणारा आहे.  अचल गच्छाधिपती प. पू. कलाप्रभ महाराज यांना गुजराती गौरव पुरस्कार बृहन्मुंबई गुजराती समाजचे अध्यक्ष डॉ हेमराज शाह यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राजेश दोशी, एल एम शाह, चिमण मोता, दिनेश टी. शाह, हिराचंद दंड, नयन भेडा आणि डॉ. उर्मी पासद आदी मान्यवर उपस्थित होते.

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम

तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात “एमएमआरडीए” प्रथम मुंबई: महाराष्ट्र  राज्यात तब्बल १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई महानगर प्रदेश अधिक आधुनिक आणि डिजिटल होत असताना, “एमएमआरडीए” देखील आता अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकांसाठी सोयीस्कर अशी प्रशासन व्यवस्था उभारण्यावर भर देत आहे.  यामुळे प्राधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद होत व्यक्त होत आहे. तब्बल  १५० दिवसांच्या ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रमात एमएमआरडीएने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.      तसेच, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित १५० दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत ‘एमएमआरडी’एने राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. संजय मुखर्जी  महानगर (आयुक्त) एमएमआरडीए यांनाही प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहे. ‘सेवाकर्मी प्लस’ कार्यक्रम पुरस्कारासाठी सहभागी शासकीय संस्थांचे मूल्यमापन कर्मचारी विकास आणि सेवा नियमांच्या पालनाशी संबंधित ९ निकषांवर करण्यात आले. तसेच, ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ पुरस्कारासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल प्रशासनाचा वापर करण्यासंदर्भातील ७ विविध निकषांच्या आधारे संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. हे यश डॉ. संजय मुखर्जी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि टीम “एमएमआरडीए”च्या प्रत्येक सदस्याच्या अथक परिश्रमाचा पुरावा आहे, ज्यांची वचनबद्धता, नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्कृष्टतेवरील विश्वास या प्रदेशाच्या परिवर्तनाला दररोज नवी ऊर्जा देत आहे.

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी.. मुंबई: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे. या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.