Category: मुंबई

Mumbai news

 साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’

साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’ धामणगाव अपघातातील जखमींना दिले जीवदान! मुंबई : ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने देव पावल्याची प्रचिती येते. असाच अंगावर काटा आणणारा आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलवून टाकणारा प्रसंग रविवारी रात्री धामणगाव – कवडदरा येथे घडला. भीषण रस्ते अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीन मरणोन्मुख तरुणांसाठी ‘भटवाडी साईदर्शन सेवा संस्थे’चे पदयात्री अक्षरशः देवदूत बनून धावून आले आणि त्यांनी प्राण वाचवले. नेमके काय घडले होते ? रविवारी धामणगाव – कवडदरा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक इतकी जोराची होती की तीन जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. अंधाराची वेळ आणि मदतीची वानवा अशा अगतिक परिस्थितीत अपघातग्रस्तांचे प्राण कंठाशी आले होते.जेव्हा टाळ-मृदुंगाचा गजर थांबला आणि माणुसकी धावली… नेमक्या त्याच वेळी भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेची पदयात्रींची दिंडी तिथून मार्गक्रमण करत होती. साईंच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या भक्तांनी रस्त्यावरील हे विदारक दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी भक्तीसोबतच कर्तव्याचे भान राखत तातडीने मदत कार्य सुरू केले. डॉ. जयेश सरमळकर यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी त्वरित हालचाली केल्या. मंडळासोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून या जखमींना अत्यंत सुरक्षितपणे मोहन वामन व जितेंद्र हरमळकर यांनी नजीकच्या रुग्णालयात पोहोचविले.विभागप्रमुख दिपकबाबा हांडे, गुरुनाथ सामंत, सिद्धू मांजरेकर, प्रतिक जाधव, सागर गायकवाड, करन पायमोडे यांनी रुग्णालय गाठून त्यांना उपचारासाठी दाखल केले आणि गोल्डन आवर्स मध्ये अपघातग्रस्थांना सहकार्य केल्यामुळे एसएमबीटी  रुग्णालयाकडून देखील साईभक्तांचे विशेष कौतुक केले. रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “भटवाडी साई दर्शन सेवा संस्थेची रुग्णवाहिका अगदी वेळेत पोहोचली, ज्यामुळे जखमींना गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार मिळू शकले. या भक्तांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे प्राणहानी टळली आहे.” खऱ्या भक्तीचे दर्शन… पायाला फोड आले तरी साई दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटर चालणाऱ्या या भक्तांनी केवळ मंदिरात देव न शोधता, संकटात सापडलेल्या माणसांत देव पाहिला. अंगात थकवा असतानाही दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेली ही धडपड पाहून आज प्रत्येकाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आहेत. या घटनेने भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेच्या पदयात्रींनी साईंची ‘माणुसकीची’ शिकवण खऱ्या अर्थाने जगून दाखवली आहे. आज मुंबई वरून शिर्डीला येणाऱ्या सर्व पालख्यांना या थोर कार्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांनी म्हटले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी निधी आमदार अमित गोरखेंच्या प्रयत्नाला यश मुंबई / रमेश औताडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सावा निमित्त ठाणे, मुंबई महानगरपालिके प्रमाणे नवी मुंबई महानगरपालिके तर्फे प्रतिवर्षी सात लाख रुपया मंजूर करणे बाबत जे समाज आंदोलन व मागण्या झाल्या त्याला आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. अशी माहिती समाजसेवक राजीव मानकर यांनी दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील महान साहित्यिक, समाजसुधारक व लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांचे प्रश्न समाजासमोर मांडले व सामाजिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यामुळे त्यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ठाणे महानगरपालिका व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी आर्थिक तरतूद करण्यात येते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रु. सात लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात यावी अशी मागणी असणारे निवेदन दिल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे राजीव मानकर यांनी सांगितले.

एसएनडीटी विद्यापीठात शिवाजी महाराज जयंती उत्सव

मुंबई: चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव” हा कार्यक्रम नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख निर्माण करणे व त्यांच्यापासून प्रेरणा देणे हा…

रुबेनच्या दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखान्याचा सहज विजय

सुपर कॉर्पोरेट फुटबॉल लीग रुबेनच्या दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखान्याचा सहज विजय मुंबई, २३ मार्च: आक्रमक स्ट्रायकर रुबेन फर्नांडिसच्या अप्रतिम दोन गोलच्या जोरावर कॅथलिक जिमखाना लिमिटेडने मुंबई फुटबॉल असोसिएशन (एमएफए) सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये नेव्हल डॉकयार्डविरुद्ध ४-१ असा एकतर्फी विजय मिळवला. चर्चगेट येथील कर्नाटक एसए मैदानावर झालेल्या सामन्यात सोमवारी मध्यंतरापर्यंत कॅथलिक जिमखान्याकडे २-१ अशी आघाडी होती. उत्तरार्धात त्यात आणखी दोन गोलची भर घातली. रुबेनचे सहकारी कस्तुभ मेहेर आणि करण कपूरने प्रत्येकी एक गोल करून विजयात खारीचा वाटा उचलला. नेव्हल डॉकयार्डकडून एकमेव गोल मिलिंद मेहेरने पेनल्टीवर पहिल्या सत्रात केला. ११ व्या मिनिटाला करणने फॉरवर्ड पास देऊन रुबेनला गोल करण्याची संधी दिली. रुबेनने चेंडूवर नियंत्रण ठेवत प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने धाव घेतली आणि अचूक प्लेसमेंटने डॉकयार्डचा गोलकीपर कुंदन धनूला सहज चकवले. त्यानंतर, २८ व्या मिनिटाला कस्तुभने चेंडू गोल जाळ्यात ढकलून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (२-०) दुप्पट केली. मध्यंतरापूर्वी काही मिनिटांपूर्वी, किंग्स्टन परेराने पेनल्टी एरिया क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळल्यामुळे डॉकयार्डला पेनल्टी मिळाली. त्यावर मिलिंद मेहेरने पेनल्टी स्पॉटवरून गोल केला. उत्तरार्धात, रुबेनने गोलपोस्टच्या डाव्या बाजूने डाव्या पायाने मारलेल्या जोरदार लो-शॉटने प्रतिस्पर्धी गोलकीपरला चकवून कॅथलिक जिमखान्याची आघाडी (३-१) वाढवली. त्यानंतर, रुबेनच्या थ्रू पासवर करणने पुढे आलेल्या गोलकीपरला चकवून सर्वोत्तम गोल केला. कॅथलिक जिमखान्याचा हा सलग तिसरा विजय आहे. निकाल: कॅथलिक जिमखाना लिमिटेड ४(रुबेन फर्नांडिस २, कस्तुभ मेहेर, करण कपूर प्रत्येकी १) विजयी वि. नेव्हल डॉकयार्ड १ (मिलिंद मेहेर).

बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बोरीवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर असंख्य नागरिकांनी घेतला लाभ मुंबई,  (प्रतिनिधी ) : श्री साईधाम सेवा समिती, देवीपाडा, बोरिवली (पूर्व) येथे श्री राम नवमी निमित्त या विभागातील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत आरोग्य शिबिरात वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. कांदिवली पूर्व येथील साईबाबा हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नर्सिंग ऑफिसर सौ. नीता सिद्धेश नाईक यांनी आयोजक या नात्याने मार्गदर्शन केले. मधुमेह, रक्तदाब, ई. सी. जी., महिलांच्या आरोग्य समस्या व गर्भधारणा बद्दलचा सल्ला फिस्टुला, स्टोन, अपेन्डिक्स लहान मुलांना शाळेसाठी ब्लड ग्रुप व इतर अन्य तपासणी करण्यासाठी डॉ. श्रद्धा गांधी (एम. डी. फिजिशन), डॉ. जयश्री खोपकर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. पूजा तिवारी (लेप्रोस्कोपी सर्जन) यांच्या मार्गदर्शनाखाली चिकित्सा करण्यात आल्या. लॅब टेक्निशियन दिलीप नाटेकर. प्रकाश सहारे. साई मुरली केमिस्ट परीन पटेल, कुशल शाह, भारती पन्हाळे, (सिस्टर) प्रतीक्षा हंकारे, पूजा भोसले, गणेश कोणार, चेतन शिंदे यांच्या पथकाने हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाव्यात स्नेहसंमेलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाव्यात स्नेहसंमेलन मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अभिनव संकल्पना मुंबई, (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील सेवानिवृत्तांच्या तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच लखमशी नप्पू हॉल, माटुंगा येथे संपन्न झाला. विश्वनाथ बंगेरा यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या दमदार प्रवेशाने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला अत्यंत मराठमोळ्या आणि अत्युच्च वातावरणात पोहोचविले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच महापालिका कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन साजरे होत आहे, असा आभास निर्माण झाला होता. यावेळी प्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर यांच्या गझलांची पेशकश उपस्थितांची वाहव्वा मिळवून गेली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सुषमा भागवत यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रहसनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. तद्नंतर सादर झालेल्या मराठी गाण्यांवर उपस्थित सेवानिवृत्तांची पावले याही वयात थिरकली. यावेळी सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र गीताच्या वेळी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या प्रवेशाने कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक संजय मोरे, विजय पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा रवींद्र मोरे व प्रकाश मोरये यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शेट्ये, वंदना शिर्के व ज्योत्स्ना मुळावकर यांनी केले.

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले

‘हेमुदादा’ मधील ह्रुदयद्रावक प्रसंग पाहून बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले स्वतः डॉ. हेमराज शाह यांच्या अश्रूंचा फुटला बांध मुंबई, दि. (प्रतिनिधी): आई वडील यांचे छत्र गमावलेला तरुण सामखियाली, भचाऊ या कच्छच्या रणातून मुंबईत येतो काय, पदपथावर झोपून रात्री काढतो काय आणि मग संघर्षमय जीवन जगता जगता समस्त कच्छी, गुजराती बांधवांसाठी झटता झटता तब्बल सात मजली गुजराती भवन उभारुन समाज बांधवांना एका रेशमी धाग्यात गुंफून भली मोठी समाज बांधवांची माला तयार करतो काय. सारेच विलक्षण, सारेच अनाकलनीय, अकल्पनीय आणि त्यात पत्नी सौ. केसर यांचा ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू होतो तसेच एकुलती एक कन्या रेखा हिचा कर्करोगाने मृत्यू होतो. सुपुत्र उदय आणि अरविंद यांनी हेमराज शाह यांना पावलोपावली दिलेला आधार तसेच कोणतेही संवैधानिक पद नसतांना एक कादंबरी, एक डॉक्युमेंटरी आणि हेमूदादा ही दीर्घांकिका रंगमंचावर येते. अनेक देश विदेशातील संस्था डॉक्टरेट देऊन गौरव करतात. अशा या तरुणांनाही लाजवील अशा ८६ वर्षीय डॉक्टर हेमराज विरम शाह या अफलातून व्यक्तिमत्त्वाचे संघर्षमय जीवन उलगडताना चर्चगेट जवळील बिर्ला मातोश्री सभागृह हेलावले आणि स्वतः डॉ हेमराजभाईंच्या ‘नयनां’तून अश्रूंचा बांध फुटला. बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष, कच्छ शक्ती वृत्तपत्राचे संस्थापक संपादक डॉ. हेमराजभाई शाह यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह, चर्चगेट येथे त्यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ या वसंत मारु लिखित आणि वसंत मारु, कवन सांवला दिग्दर्शित दीर्घांकिका सादर करण्यात आली. लहान मोठ्या १६ कलाकारांनी या नाट्यप्रयोगात काम करतांना डॉ हेमराज शाह यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. जन्मभूमी चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य संपादक पद्मभूषण कुंदनभाई व्यास समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. गुजरातचे माजी अर्थमंत्री बाबुभाई मेघजी शाह, महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी बिपीन श्रीमाळी तसेच नवनीत प्रकाशनचे अनिल गाला आणि बिपिन गाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींनी डॉ. हेमराजभाई यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. नागजी रीठा यांनी सूत्रसंचालन केले.

लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ  

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा लीलावती, जेजे हॉस्पिटलचा विजयी प्रारंभ आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत सामनावीर संदीप कणसे (३७ धावा) व संतोष पंधारे (३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाचा ५ विकेटने पराभव केला आणि सनसनाटी विजयासह सलामीची लढत जिंकली. शतकवीर नितीन कांबळेने केडीए हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या सामन्यात जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटल संघावर ८ विकेटने धडाकेबाज विजय मिळविला. क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे, क्रीडाप्रेमी संजय कदम व प्रभाकर गोलामडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी रुग्णालयीन क्रिकेटपटूंना शिवाजी पार्क मैदानात उद्घाटनीय शुभेच्छा दिल्या. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत लीलावती हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून केडीए हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. लीलावती हॉस्पिटलचा मध्यमगती गोलंदाज पराग जाधवच्या (२० धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटलची दुसऱ्या षटकात ३ बाद १५ धावा अशी बिकट अवस्था झाली. परंतु नितीन कांबळेच्या (५० चेंडूत १०३ धावा) झंझावाती शतकी फलंदाजीमुळे केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाने मर्यादित २० षटकात ६ बाद १५९ धावसंख्या उभारली. संदीप कणसे (२५ चेंडूत ३७ धावा) व संतोष पंधारे (२५ चेंडूत ३४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने विजयी लक्ष्य १८.२ षटकात ५ बाद १६३ धावा फटकावून साध्य केले. दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाज प्रवीण वाघेलाच्या हॅटट्रीकमुळे जे.जे. हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटलचा डाव १५.४ षटकात १०७ धावांमध्ये गुंडाळला. मयुरेश पाटीलने नाबाद ४६ धावा केल्या. शैलेश वाघेलाच्या दमदार अर्धशतकामुळे जे.जे. हॉस्पिटलने दहाव्या षटकाला २ बाद १०८ धावा फटकावून बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द मोठा विजय नोंदविला.

 मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून!

मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साताऱ्यातील घटनेवर घणाघात अनिल ठाणेकर मुबंई, राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातून बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब त्यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली. विधानसभेत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेचा निषेध करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

 अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी

अखिल भारतीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत इशिता रेवालेची सुवर्ण कामगिरी मुंबई : चंदीगड येथील पंजाब यूनिवर्सिटीमध्ये १३ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल मधील जिम्नॅस्ट इशिता रेवाले…