Category: मुंबई

Mumbai news

बीओबी टेबल टेनिस स्पर्धेत अंकित, कविता विजेते

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कविता राणाने महिला गटात विजेतेपद पटकाविले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने व्ही. कुलदीपचा ११-४, ११-४, ११-४ असा सहज पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक जोरकस फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे व्ही. कुलदीपला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कविता राणा विरुद्ध कृतिका यामधील महिलांची अंतिम लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या कृतिका अग्रवालला अखेर कविता राणाने ११-६, ३-११, ११-७ असे चकविले आणि कविताने प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, बँक ऑफ बडोदा क्रीडा विभागाचे प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी विजेत्या-उपविजेत्यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व पुरुष गटामध्ये अंकित धीकोनिया, व्ही. कुलदीप, आशिष दवे, अभी चटोपाध्याय तर महिला गटामध्ये कविता राणा, कृतिका अग्रवाल, प्रार्थना मस्तुल, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.

१४ वर्षीय द्रिश्या नाईकची राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मुंबई : येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय नववीत शिकत असलेल्या द्रिश्या श्रीकांत नाईक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत द्रिश्याने चमकदार कामगिरी करताना ६ गुणांची कमाई करुन आपले हरियाणाचे तिकिट पक्के केले. या स्पर्धेत तिने ६ विजय मिळविले. तर दोन सामने गमावले.  तिचा चौथा क्रमांक लागला. स्पर्धेत प्रथम ६ क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. शेवटच्या फेरीत द्रिश्याने यजमान कोल्हापूरच्या प्रथम मानांकन देण्यात आलेल्या दिव्या पाटीलचा पराभव करुन स्पर्धेत खळबळ माजवली. तसेच तिने पुण्याच्या फिडे रेटेड खेळाडू राजराजेश्वरी देशमुखला देखील नमविण्याचा पराक्रम केला होता. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली द्रिश्या मुंबईची एकमेव खेळाडू आहे. ३ वर्षे स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणाऱ्या द्रिश्याचे केतन पाटील प्रशिक्षक आहेत. ती रोज ४ तास नियमित सराव करते. तिचे वडिल आंतर कॉलेज बुद्धिबळ स्पर्धेत खेळले होते.

टाकाऊ मधून टिकाऊ 

मुंबई : घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला पहायला मिळतात. ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीमती शुभांगी जयंत लेले यांच्या निवासस्थानी सुपूत्र आनंद, स्नुषा स्नेहा आणि नात मधुरा ही मंडळी दरवर्षी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ सजावट करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतात. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा बनवून त्यापासून विविध प्रकारची सजावट करतात. पेन्सिली, सोडावॉटर बाटल्या, छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जुन्या वह्या, पुस्तके, किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या वस्तूंच्या खोक्यांचा वापर सजावटीसाठी करुन आनंद जयंत लेले यांनी पारितोषिके पटकावली आहेत. ग्रंथ आणि साहित्य यांचा उपयोग करुन साहित्य प्रेमी गणरायही भक्तांच्या दर्शनाला आले आहेत. यंदा कोरोगेटेड बॉक्सच्या पुठ्ठ्यातून मंदिर साकारुन त्याला छानशी रंगसंगती करुन भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे.

दादरच्या सुंदरनगरी अवतरली अयोध्या : श्री सिद्धिविनायक अंध अपंग सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या सुंदरनगर, दादर येथील निवासस्थानी श्री गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.  अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. या विलोभनीय मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी लोटत आहे.

स्वामी विवेकानंद स्मृती दिनाचे आयोजन

मुंबई : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये जे ऐतिहासिक भाषण केले त्याला १३१ वर्ष झाली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे ” राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास ” संस्थेने राष्ट्रप्रेम उत्सव चे आयोजन केले असल्याची माहिती न्यास चे अध्यक्ष नीरज कुमार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ११ सप्टेंबर रोजी होत असलेल्या या राष्ट्रप्रेम उत्सवामध्ये युवकांच्या भविष्यावर परिसंवाद, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन, देव धर्म या पेक्षा देश मोठा आहे या विषयावर भव्य नाटक, राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, मनजीत सिंग,कुमार सुशांत, रोशन सिंग उपस्थित होते.

खासदार नरेश म्हस्के यांची नवी मुंबईकरांना गणेशोत्सवाची आरोग्यपूर्ण भेट

 नवी मुंबई महापालिकेस स्वतःचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी प्राप्त नवी दिल्ली, दि. १० – नवी मुंबई महापालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश आले राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे.…

ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

  मुंबई, दि. १० :- ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी स्वरूपात अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे, अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबरपर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे. १५ सप्टेंबर नंतर मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे. अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबरपर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे. व मानवी स्वरूपातील अभिलेखाचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

बोरा बाजार येथील रस्त्याचे ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ नामकरण करण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची मागणी मुंबई : मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार जवळील मार्गाचे नामकरण “शांतीनाथ देरासर मार्ग” असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे. कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रध्दाळू आणि भाविक मोठया संख्येने भेट देत असतात. फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण “शांतीनाथ देरासर मार्ग” असे करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. जैन बांधवांची ही मागणी लक्षात घेता तातडीने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 30 कोटी रुपये वितरित

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून 30 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन

मुंबई : अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान  यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, जिल्हाधिकारी राजेंद्र  क्षीरसागर यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार विभाग तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉटेल  ट्रायडन्ट, मुंबई  येथे पुढील नियोजित कार्यक्रमासाठी ते रवाना झाले.