Category: मुंबई

Mumbai news

– महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वे सज्ज

 दादर रेल्वे स्थानकामध्ये मर्यादित प्रवेश मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देण्यासाठी मुंबईत येणार असल्याने मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. गर्दीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान १६ विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि ५-६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाने ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दादर स्थानकात मर्यादित प्रवेश लागू केला आहे. मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरळीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या वेळी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे २४ तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत. हेल्प डेस्क आणि तिकीट काउंटर दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण येथे २४ तास चालणारे हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. अनारक्षित तिकिटांसाठी आणि चौकशीसाठी चैत्यभूमीजवळ दोन यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत. गर्दी व्यवस्थापन दादर येथे स्वतंत्र प्रवेश व निर्गमन व्यवस्था तसेच मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. ‘चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग’ आणि ‘राजगृहाकडे जाण्याचा मार्ग’ असे २१४ बॅनर दादर स्थानकावर लावण्यात आले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा गर्दी व्यवस्थापनासाठी ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर रेल्वे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफचे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करतील, तर दादर येथे २५० हून अधिक जीआरपी कर्मचारी तैनात असतील.  दादर येथे १२०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४० आणि कल्याण येथे ३० कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक जीआरपी आणि ८० हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात करण्यात आले आहेत. भोजनाची व्यवस्था प्रवाशांसाठी पुरेशी भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पूल  – मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्यभागी स्थित मोठा पूल व फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरिता बंद असेल.  – रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी आणि मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याकरिता खुला राहील. 000

पुण्यातून ओरोसला परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीला नांदगाव येथे अपघात

– सुदैवाने कोणीही गंभीर जखमी नाही : काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती कणकवली :पुणे येथून ओरोस येथे परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीचा नांदगाव ओटव फाटा पूल येथे अपघात झाला. बुधवारी भल्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बस महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्याला आदळली. सुदैवाने या अपघातात काही  विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आटपून परतत होते. शैक्षणिक सहलीच्या एकूण तीन बसेस होत्या. यातील एक बस नांदगाव ओटव फाटा येथील पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले.पोलीस पाटील वृषाली मोरजकर,भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर दिक्षा मोरजकर आदींनी मदतकार्य केले. पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी पोलिसांना कळविले. अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने , महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

बँक ऑफ महाराष्ट्र मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ग्राहकांना हिंदीत बोलण्याची सक्ती ? 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँक प्रशासनाकडे केली कारवाईची मागणी उल्हासनगर : येथील उल्हासनगर -४ मधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वर्तन करून हिंदी भाषेत बोलण्याची सक्ती केल्याचा…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा “आदर्श शाळा” म्हणून विकसित होत आहेत.

उल्हासनगर : महात्मा ज्योतिबा फुले मनपा शाळा क्रमांक 17, गोपाळ नगर सी ब्लॉक शहाड स्टेशन रोड या शाळेचे बांधकाम सुरू असून याव्यतिरिक्त  शअण्णा भाऊ साठे मनपा शाळा क्रमांक 24 (मराठी माध्यम)…

मुंबईच्या करमरकर दाम्पत्याने जिंकली प्राइम मिश्र जोडी ब्रिज स्पर्धा

Photo-6 मुंबई: प्राईम सिक्युरिटीज प्रायोजित प्राइम-ब्रिज स्पर्धेत ( 2024) मुंबईच्या मरियाना आणि संदीप या करमरकर दांपत्याने मिश्र जोडी प्रकाराचे जेतेपद पटकावले. बॉम्बे जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप आणि मरियाना या पती-पत्नीने सर्वाधिक 1431 गुणांसह बाजी मारली. मुंबईस्थित हिमानी आणि राजीव खंडेलवाल जोडीने 1388 गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. अहमदाबादच्या नीना शाह आणि कौस्तुभ देवधर जोडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुख्य फेरीसाठी पात्रता न ठरलेल्या स्पर्धकांसाठीच्या स्ट्रॅटा जोडी स्पर्धेत दीपिका मेहता आणि रवी कौल विजेते तर अलका क्षीरसागर आणि इव्हान अल्फोन्सो उपविजेते ठरले. 0000

6 जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन हा 06…

६ डिसेंबर पासून मुंबई येथे राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ( मुंबई केंद्र २ )  मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, चर्नीरोड, मुंबई येथे सुरू होत…

 संविधान परिचय कार्यशाळा उत्साहात संपन्न 

 नवी मुंबई महानगरपालिकेची संविधान साक्षरतेच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल नवी मुंबई : भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे अशा शब्दात संविधानाचे महत्व विशद करीत माजी मुख्य आयुक्त श्री. जे.एस.सहारिया यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट जनतेशी संबंध असल्याने महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडण्याची ही उत्तम संधी असल्याचे जाणून काम करावे असे सांगितले. यादृष्टीने संविधानातील मूल्यांचा आपल्या कामकाजात कसा उपयोग होईल व यातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजातील शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याचे भान राखून काम करायला हवे असे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान पर्वानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित संविधान परिचय कार्यशाळेमध्ये ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या ‘संविधान परिचय कार्यशाळे’प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त श्री. समीर उन्हाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे तसेच कार्यशाळेतील व्याख्यात्या कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम. अनुया कुंवर, संविधान अभ्यासक लेखक श्री. सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम.अनुया कुंवर यांनी संविधानाचे महत्व जाणून त्याची महती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव केला. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरमच्या वतीने सुशासनासाठी करण्यात येणाऱ्या धोरणांची माहिती देत त्यांनी अबार्डिन अजेंडानुसार सुशासनासाठी प्रमाण मानके म्हणून निश्चित केलेल्या 12 तत्वांचे विवेचन केले. संविधानाने सांगितलेल्या मूल्यांचा आपण दैनंदिन कामकाजात वापर करीत आहोत काय? असा प्रश्न स्वत:लाच विचारून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आत्मचिंतन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. संविधानाचे अभ्यासक श्री.सुरेश सावंत यांनी हे ज्ञानस्मारक म्हणजे प्रेरणास्थान असून याठिकाणी आल्यानंतर समृध्द झाल्यासारखे वाटते असे सांगत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवी मुंबई संविधान साक्षर मोहीम’ राबविण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. ही मोहीम राबविताना पहिल्या टप्प्यात संविधान परिचय वर्ग आयोजन व दुसऱ्या टप्प्यात घर घर संविधान साक्षर मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियोजित मोहीमेचा आराखडा सादरीकरणाव्दारे मांडत त्यांनी संविधान समजणे ही साक्षरतेची पहिली पायरी असल्याचे सांगितले व संविधानाची उद्देशिका हे तिचे सार असून उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ उलगडून सांगितला. नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समारोप करताना कार्यशाळेत विचारमंथन झालेल्या विविध मुद्दयांचा परामर्श घेतला. संविधानाने ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यदेखील सांगितली आहेत, त्यादृष्टीने लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. मनुष्याचा विकास व्हावा हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना ‘मी इथे का आहे?’ असा प्रश्न प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला विचारला पाहिजे व आपल्याला जनतेसाठी काम करण्याची मोठी संधी महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून मिळाली याची जाणीव ठेवावी असे ते म्हणाले. आपल्या अधिकारांचा वापर शिक्षा करण्यासाठी नाही तर माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी आहे याचे भान राखून काम करावे असे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक काळाला साजेशी संगणकीय ऑनलाईन कार्यप्रणाली अंगिकृत करीत नागरिकांसाठी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, माय एनएनएमसी ॲप विकसीत केले असून नागरिकांच्या तक्रारी सोडवणुकीसाठी नियोजनबध्द कार्यप्रणाली आत्मसात केली आहे तसेच थेट संवादी दृष्टीकोन ठेवला आहे असेही आयुक्तांनी सांगितले. व्याख्यात्यांनी मांडलेल्या बाबींवर सविस्तर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधान साक्षरता मोहीम पोहोचविण्यासाठी ठोस नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात ज्ञानकेंद्र म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील उल्लेखनीय सुविधांची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात शासनाने निर्देशित केल्यानुसार ‘घर घर संविधान’ अभियान व्यापक स्वरुपात राबविले जाणार असून त्याचा प्रारंभ या संविधान परिचय कार्यशाळेने झाला. 00000

महालक्ष्मी मंदिराबद्दल मला खूप सात्विक अनुभव आहे- डॉ. अनिल काकोडकर

केतन खेडेकर मुंबई : मला मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबद्दल खूप श्रध्दा असून सात्विक अनुभव आहे. तसा मी आस्तिक आहे. असे उद्‌गार डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. महालक्ष्मी मंदिरामध्ये “श्री महालक्ष्मी नमोस्तुते” या कॉपी टेबल पुस्तकाचे अनावरण झाले त्यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले आई आणि मी मुंबईत आलो तेव्हा परिस्थिती हलाखीची होती. शिकण्यासाठी मुंबई गाठली. राहता येईल की नाही अशी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली. माझ्या आईने महालक्ष्मीला नवस केला की, गौरी गणपती दरम्यान देवीची ओटी भरण्यास येईन, १९५६ सालापासून आजतागायत जवळजवळ ६७ वर्षे महालक्ष्मीला येतो (कोरोनाचा काळ सोडला), पूर्वी पाठीमाने खडकांवर बसून लाटांच्या सान्निध्यात मूग भजी खात असे, पण आता कोस्टल रोड झाल्यामुळे ती मजा नाही. महालक्ष्मीच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या प्रचंड आहे. कालनिर्णयकार जयंत साळगावकर म्हणाले डॉ. काकोडकर यांची मिसाईल बनविण्यात खूप ताकद आहे. या तिन्ही देर्वीच्या मूर्त्यांमध्ये सरस्वती महत्वाची असून कालिका संहार करते तर लक्ष्मी पैसे देते, नमस्कार केला की प्रेरणा मिळते. मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष विजय गुपचूप म्हणाले डॉ. काकोडकरांना बघून आनंद मिळतो. काकोडकरांचे जीवन सामान्य माणसाला समर्पित आहे हिच त्यांची ओळख आहे. कार्यकारी विश्वस्त-चार्टड अकांउटंट शेखर दांडेकर म्हणाले या पुस्तकामुळे भक्तांना प्रेरणा मिळेल हे मोठे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचे काम घैसास यांनी उत्कृष्ट केलेले आहे. प्रत्येकाची वेळ सारखीच असते पण घैसास यांनी त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी आभार प्रदर्शनानंतर प्रत्येक भाविकाला विनामूल्य पुस्तकाची प्रत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अशीश चेंबूरकर, प्रकाश राऊत, उदय लाड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण मंत्री, चित्रा वैद्य आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. 000

 दिव्यांगांच्या आरोग्यासाठी पायाभूत उपक्रमाचा शुभारंभ

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार   मुंबई : स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणाऱ्या बोरिवली पूर्व येथील संस्थेने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग(HMPD) हा उपक्रम सुरू केला आहे. जवळजवळ 100 दिव्यांग व्यक्ती आणि 40 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या समाजात दुर्लक्षित आहे. दिव्यांग व्यक्तीला आलेल्या अपंगत्वामुळे वयोमानपरत्वे त्यांच्या शारीरिक अडचणी वाढत जातात आणि या शारीरिक व्याधी त्याचे जीवन अत्यंत त्रासाचे करतात आणि म्हणूनच जर वेळीच बेसिक हेल्थ चेकअप, डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य ती औषधे, आवश्यक फिजिओथेरपी अशी बेसिक हेल्थकेअर जर दिव्यांग व्यक्तींना अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली तर त्यांचे एकंदरीत शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल, या एकमेव उद्देशाने हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग (HMPD)हा अभिनव उपक्रम स्नेहज्योत संस्थेने हाती घेतला आहे, ज्याचा शुभारंभ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील एन आय सी ऑडिटोरियम मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करण्यात आला. गेली जवळजवळ 35 वर्षाहून जास्त मेडिकल क्षेत्रात अनुभव असणारे प्रोफेसर डॉ. हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाला येणार आहे. HnG पॅथॉलॉजी आणि डायग्नोस्टिक हेल्थकेअर, आशा हेल्थकेअर, NM मेडिकल सेंटर या उपक्रमाशी संलग्न आहेत. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आयुष्मान कार्ड काढून देण्यात येईल, आवश्यक असणाऱ्या टेस्ट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच त्यांच्या विभागात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आवश्यकता भासल्यास मोठ्या सर्जरीज मोफत करून घेण्यात येऊ शकतील, अशा पद्धतीचा आरोग्य संबंधीचा डेटाबेस एका हेल्थ डेस्क च्या माध्यमातून करता येईल का? या दिशेने या उपक्रमाचा विस्तार केला जाईल. कृष्णा शेठ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दृष्टिहीन तायक्वांडो प्लेयर चा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच आपल्या अपंगत्वावर मात करून झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे काम करत स्वतःचे आयुष्य स्वावलंबनाने जगणाऱ्या श्री हरिशंकर शर्मा यांचा ‘स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ देऊन गौरव करण्यात आला. या दोघांनी आपले अनुभव कथन करत उपस्थितांसमोर एका वेगळ्या जिद्दीचे आणि मनोबलाचे उदाहरण ठेवले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व दिव्यांग मुलांना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल पार्क मधील लायन सफारी टूर घडवून आणली आणि मग मस्तपैकी चिंचा, बोरे, कैऱ्या खाऊन सर्व दिव्यांग व्यक्तींच्या दिवसाची आनंदाने सांगता झाली. या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे तहसीलदार अतुल सावे, अकाउंटंट रविदास गवळी, तलाठी चिराग सुळे, फेरो इक्विपचे रोड्रिक्स फर्डी, सुविद्या प्रसारक संघाचे श्री महादेव रानडे, एन एम मेडिकल सेंटरचे प्रतिनिधी हर्षिल परमार, स्नेहज्योत शुभचिंतक सौ अहिल्या कुलकर्णी, डॉ. श्रीकांत ठाकूर, एस एस बॅग्स चे संजय दळवी तसेच प्रोफेसर हेमंत शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले.  लायन सफारी ही इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, दहिसर यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली होती. हे दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य स्नेहज्योत परिवारातील सर्व सेवाव्रतींमुळेच होऊ शकते, असे संस्थेच्या संस्थापिका व सचिव सौ सुधा वाघ यांनी आवर्जूनपणे नमूद केले. ००००