Category: मुंबई

Mumbai news

..तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार

कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कत्तलखान्याच्या मुद्यावरून शहरातील राजकीय वातावरण पेटणार आहे. उत्तन येथील शासकीय जागेवर ४० कोटी रुपये खर्चून कत्तलखाना उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मिरा भाईंदर महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कत्तलखान्यास मिरा भाईंदर भाजप पक्षाने विरोध केला आहे. या संदर्भात रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. मुळात या कत्तलखान्याची गरज नव्हती. कत्तलखाना उभारण्याचा निर्णय इतक्या झटपट पद्धतीने घेण्यात आला असल्यामुळे त्यातील निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. शहराला गरज नसताना नागरिकांच्या माथी हा कत्तलखाना लादला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करून पालिका मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी यावेळी दिला. मिरा भाईंदर शहरात उत्तन येथे उभारण्यात येणारा नवा कत्तलखाना हा आमदार गीता जैन यांच्या मतदारसंघात आहे. जैन या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने त्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. या कत्तलखान्यास शहरातील जैन समाजासह अन्य स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गीत जैन या देखील स्वतः जैन समाजातून येतात. कत्तलखान्याच्या मंजुरीमुळे गीता जैन यांचे ‘दाखवण्याचे व खाण्याचे दात वेगळे आहेत’ असे आरोप मेहता यांनी केला. निवडणुकीत कत्तलखाना मुद्याचा वापर मिरा भाईंदर शहरात हिंदूंसह मुस्लिम व ख्रिस्ती समाजातील नागरिक मोठ्या संख्यने राहतात. मांसहारी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वतंत्र कत्तलखाना उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र शहरात वर्चस्व असणार्‍या जैन समाजाला या कत्तलखान्यास विरोध आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन-मारवाडी समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी कत्तलखान्याला विरोधाचा मुद्दा भाजपने उचलला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा राजकीय फायदा उठविण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा १० ऑक्टोबरला दसरा मेळावा

 श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, अरुण गोडबोले, सोमनाथ घार्गे आदी मान्यवरांना सातारारत्न जाहीर मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी, विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप, कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास  धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड.पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे. याशिवाय सातारभूषण पुरस्कार सन्माननीय किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु.भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात येणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ  देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी  सोन वाटप करून दसरा साजरा केला जातो.अधिकाधिक सातारकरांनी यावेळी उपस्थित रहावे ,असे आवाहन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००

कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटी

सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे भूमिपूजन कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच पहिल्या टप्प्यात भगवा तलाव येथील आदेश्र्वर चौक ते विकास हाईट्स (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली. भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे आदी उपस्थित होते.

अमराठी खासदाराने मराठी भाषेला दिला मान-सन्मान

माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार… राजेंद्र साळसकर मु़ंबई : घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. तमाम मराठी जनांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. उत्तर मुंबई तून दोनदा महाराष्ट्रात प्रथम येऊन प्रचंड मतांनी निवडून खासदार पदी निवडून आलेल्या गोपाळ चिनय्या शेट्टी या अमराठी खासदाराने निवडून आल्यानंतर सन २०१४ पासून सातत्याने संसदेत व संसदेच्या बाहेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे ही मागणी सातत्याने लावून धरली एवढेच नव्हे तर त्याचा पाठपुरावा केला. आज मराठी अस्मितेसाठी कटिबद्ध असणारे व मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला गेला. उत्तर मुंबई मध्ये अन्य भाषिक मतदारां बरोबरच मराठी भाषिक जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले व मला भरभरून मतदान केले त्या मराठी भाषिक जनतेचे ऋण मी यामुळे थोड्याफार प्रमाणात फेडू शकलो याचा मला आनंद आहे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी एक खारीचा वाटा उचलला यासाठी अनेकांनी प्रयत्न केले यात भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांचेही योगदान असल्याचे तसेच अनेक मराठी  वृत्तपत्रांचा देखील मोठा वाटा असल्याचे  प्रतिपादन शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले. मराठी भाषेने देशासाठी केलेल्या सांस्कृतिक योगदानाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन सत्कार प्रसंगी बोलताना शेट्टी यांनी व्यक्त केले. मी जनसेवक ह्या नात्याने यापुढेही गोर-गरीब जनतेची सेवा करत राहणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सागितले. इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक रविराज पराडकर यांनी देखील एका कर्नाटकी खासदाराने मराठी साठी दिलेले योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. मराठी वर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते व विविध स्तरातील अनेक मान्यवर मोठया प्रमाणात या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.

शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

रमेश औताडे मुंबई : गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे विद्यालयातील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या, ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार शिक्षण विभागाला लेखी देऊनही कारवाई होण्यास विलंब का लागत आहे ? असा सवाल गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी यावेळी केला. रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली. निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले. त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत  शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Heading – निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- चव्हाण एकत्र

 महायुती शिवाय पर्याय नाही – खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवली :  डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास महायुतीचे उमेदवार चव्हाण यांच्या विरोधात ते लढत देऊ शकतात.  दीपेश यांच्या प्रवेशाच्या पूर्वसंध्येला मंत्री चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे हे एकत्र आल्याचे दिसुन आले. यावेळी महायुती शिवाय पर्याय नाही.  मंत्री चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुका समोर ठेवून मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांची गट्टी जमल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी घेत तिकिटासाठी जोर लावण्यास सुरवात केली आहे. निवडणूका व इतर गणिते मांडत या पक्षातून त्या पक्षात उड्या देखील सुरू झाल्या आहेत. डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याची कुणकुण पक्षातील वरिष्ठांना आधीच लागली होती. पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत भाजपचे मंत्री चव्हाण आणि सेनेचे खासदार डॉ. शिंदे एकत्र आले. महायुती मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना हे वातावरण शांत करण्यासाठी दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्र यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचे काम करायचे नाही असा निर्णय घेत असहकार पुकारला होता. त्यास मंत्री चव्हाण यांचा देखील पाठिंबा होता. मात्र नंतर महायुती झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी महायुतीची निष्ठा राखत, भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करून श्रीकांत यांच्यासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. शिंदे यांचा विजय झाला असला तरी त्यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते. याची पुनरावृत्ती आता विधानसभेत होणार का ? शिंदे गट विधानसभेला चव्हाण यांना मदत करणार की शांत राहण्याची भूमिका घेतात याची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे शिंदेचे पदाधिकारी म्हात्रे हे चव्हाण यांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावर ताशेरे ओढत होते. त्यात ते ठाकरे गटात जाणार असल्याने महायुती उमेदवार चव्हाण यांना आव्हान उभे राहू शकते.  

धारावीत बद्रीनाथ मंदिराचा आकर्षक  देखावा

मुंबई : जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. ज्या भाविकांना एखाद्या तीर्थस्थळी जाणे तितके सोपे नसते, अशावेळी त्यांना त्या ठिकाणी गेल्याचे समाधान मिळावे, या हेतूने हे देखावे सादर करण्यात येतात. यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारण्यामुळे अनेक भविकांचा ओघ इथे वाढला आहे. मंडळाच्या वतीने गेली ३८ वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडात्मक उपक्रमांसाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यात येते. रक्तदान, आरोग्य, नेत्रचिकित्सा आदी शिबिरांचेही आयोजन नियमितपणे करण्यात येते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विविध स्पर्धा, व्याख्यानमालादखील आयोजित केल्या जातात.

चेंबूरमध्ये चाळीतील घराला भीषण आग

एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू मुंबई : चेंबूरमध्ये चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ नगर परिसरात चाळीतील एका घराला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या घरात गुप्ता कुटुंबिय राहत असल्याची माहिती आहे. ते पहाटे झोपेत असताच ही घटना घडली. या आगीत गुप्ता कुटुबांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्त (७) आणि नरेंद्र गुप्ता (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय या घरात इतरही काही सदस्य होते, तेदेखील या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आगीवरन नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा अशक्य

 महापालिका अधिकाऱ्यांची कबुली मुंबई : शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार महापालिका प्रशासनाने केला आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्याइतकी पाण्याची उपलब्धता नसून मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग पूर्णत: गुंडाळण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे वचन राजकीय पक्षांकडून दिले जाते. मात्र २४ तास पाणी देणे शक्य नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. २०१४ मध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत वांद्रे व मुलुंड परिसरात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोगही करण्यात आला होता. त्यावेळी या भागात पाण्याचे तास वाढवण्यात आले होते, पण २४ तास पाणीपुरवठा करता आला नाही. तेवढी पाण्याची उपलब्धता नाही, त्यामुळे ते शक्य नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान दिली. तानसा, मध्यवैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार, तुलसी, ऊर्ध्व वैतरणा अशा सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे पावसाळ्यात काठोकाठ भरली तरच वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो. भविष्यातील मुंबईकरांची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या गारगाई, पिंजाळ व दमणगंगा या तीनपैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही. मुंबईची भौगोलिक स्थिती हेही यामागचे कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील ६० टक्के लोकसंख्या ही अनियोजित वस्त्यांमध्ये राहते. त्यामुळे मुंबईची विभागणी अडीचशे लहान लहान विभागांमध्ये करून थोड्या थोड्या विभागांना एकेका वेळी पाणीपुरवठा केला जातो.

धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारने सात सदस्य समिती गठित केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहे. रखडलेला धारावीचा पुनर्विकास आता अखेर प्रत्यक्ष मार्गी लागणार आहे. सध्या धारावीतील झोपड्यांचे, बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जात आहे. दरम्यान धारावीत मोठ्या संख्येने धार्मिक स्थळे आहेत. त्यात धारावीत अनधिकृत धार्मिक स्थळेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे निष्काषन आणि स्थलांतराचा प्रश्न गंभीर झाला आहे. धारावीत एक अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून नुकताच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि ती नियमित करण्यासाठी राज्य सरकारने एक सात सदस्य समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जी. एम. अकबर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, मुंबई; सह सचिव, उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई; सह सचिव, उप सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय; सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था); उपजिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी, मुंबई (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.