Category: मुंबई

Mumbai news

 सागर वाघमारेला प्रथम मानांकन

३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी सागर वाघमारेला प्रथम मानांकन मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ गुरुवार २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री हालारी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, दादर येथे सुरु होत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री निलेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत  स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यानंतर सामन्यांना सुरुवात होणार आहे. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या स्पर्धेचे गोल्ड प्रायोजक असून सिस्का कॅरम कंपनी साहित्य पार्टनर आहे. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा प्रथमच या स्पर्धेत वापर करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एकावेळी ४८ बोर्डांवरती एकंदर १० सत्रे खेळवली जाणार आहेत. सामने वेळेवर सुरु व्हावेत यासाठी ५० बोर्ड पंच व सामना निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय स्पर्धेचा ड्रॉ व खेळाडूच्या सामन्याची माहिती हॉलमधील स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्यामुळे कमीत कमी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. स्पर्धेच्या हॉलमध्ये प्रवेश देण्यासाठी पासेसची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दिवसासाठी मर्यादित पास वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आंतर राष्ट्रीय खेळाडूंसाठी वी आय पी भोजन कक्ष उभारण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टरची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी खेळाडूंना गणवेश / टी शर्ट देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून एकाच वेळी ६ सामने लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत. तर प्रसन्ना संत, एस किशोर व मंदार बर्डे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून सामन्याचे धावते समालोचन करणार आहेत. मागील चॅलेंजर्स ट्रॉफी विजेत्या महाराष्ट्राच्या सागर वाघमारेला या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर मागील स्पर्धेतील उपविजेत्या महाराष्ट्राच्या महम्मद घुफ्रानला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला आणि पुरुष एकत्रित खेळत असल्याने महिला पुरुषांना कशाप्रकारे आव्हान देणार हि उत्सुकता आहे. यासाठी प्रत्येक सामना जिंकणाऱ्या महिलेला विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे. खुली एकेरी : १) सागर वाघमारे ( महाराष्ट्र ), २) महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ), 3) झेद अहमद ( महाराष्ट्र ), 4) रहिम खान ( महाराष्ट्र ), ५) शाहिद हिलमी ( श्रीलंका ), ६) अभिषेक भारती ( महाराष्ट्र ), ७) संदीप देवरुखकर ( महाराष्ट्र ), ८) संजय मांडे ( महाराष्ट्र )

 ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ

‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ मुंबई-हमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मास्ट्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रगती भारताच्या…

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सहदेव सदैव कराओके अभिनव स्पर्धा कलाश्रमच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात  सव्वाशे कलाकार एकत्र येणार मुंबई –‘कलाश्रम’ ही स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो. गेल्या आठ…

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर राजेंद्र साळसकर मुंबई-एक काळ असा होता,स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सुई देखील बनत नव्हती, पण सत्तेवर आलेल्या प्रत्येक नेतृत्वाने आपापल्या परीने योगदा‌न दिले आणि देशाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले‌.पण अलीकडे सत्तेवर आलेल्या सरकारने हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.इतिहास आमच्याच काळात २०१४ नंतर घडलाय, अशी खोटी हाकाठी पिटण्यास सुरुवात केली आहे.परंतु इतिहासामधील सत्य कदापि पुसता येणार नाही.हे सांगण्यासाठी आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहन प्रसंगी बोलताना केलेआहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यार्षीही मजदूर मंझील समोरील प्रांगणात,देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन समारोह आयोजित करण्यात आला होता.अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी, तसेच कामगार,आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांना अभिवादन करून अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले,आज राज्यसरकार परदेशातून गुंतवणूक आणली,असे मोठ्या तोऱ्यात म्हणत असले तरी,राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न चिंताग्रस्त होऊन बसला आहे,ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली आहे!गेल्या पाच वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील बंद एसटीसी गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्याचे सत्र सुरू करण्यात येईल,अशी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी ग्वाही दिली आहे गिरणी कामगार घराच्या रखडलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, कामगारांना जाचक ठरणारे १७ वे कलम राज्यसरकारने रद्द केले, हे १४ कामगार संघटना एकत्र येऊन  उभारण्यात आलेल्या लढ्याचे यश आहे! परंतु सरकारने जे सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी,यासाठी लवकरच होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठविला जाईल. ध्वजारोहण सोहळा सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांच्या संयोजनाखाली पार पडला. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांचे याकामी महत्व पूर्ण सहकार्य लाभले.

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा रमेश औताडे मुंबई : क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, कुमार सोहोनी, अजित भुरे, ईशा डे ठरले मानकरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण रविवार, १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही कै. ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०, ७७००९९४४९५.

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक मुंबई : बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, भारत २0४ 7 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल, आणि एसटी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध आहे.” सध्या एसटीच्या सुमारे ९० टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या, तरी टप्प्याटप्प्याने त्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई-बसेसना प्राधान्य दिले जाणार आहे.याच दृष्टीने, एसटीच्या जागेवर सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून (PPP) उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजीसह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात एसटीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच “ एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास, भविष्यातील वाहनव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही केवळ सुविधा नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.या निर्णयामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण 

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण  रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, मुंबई : आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या धर्मेंद्र यांना मरणोत्तर भारतातील मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून यंदाच्या २०२६ सालचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वोच्च अशा पद्मविभुषण पुरस्कारासाठी देशभरातून धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांची निवड केली, तर  १३ जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.…

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें…

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).