Category: मुंबई

Mumbai news

शहापूरच्या घाटघर प्रकल्पाला हिरवाईचा साज

शहापूरच्या घाटघर प्रकल्पाला हिरवाईचा साजअविनाश उबाळे ठाणे : सहयाद्री पर्वतरांगांच्या माथ्यावरुन कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे चहुबाजूंने दिसणारे हिरवेगार वृक्ष रिपरिप पडणारा पाऊस त्यात पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि संपूर्ण हिरवेगार झालेले सहयाद्रीचे डोंगर माथे आणि निसर्गाचा अद्भूत अनुभव देणारे हे ठिकाण म्हणजे शहापूर तालुक्यातील घाटघर प्रकल्पाचा परिसर डोळ्यात सामवणारा इथला निसर्ग व धबधबे तर अक्षरशः रोमांचित करणारे असे आहेत. ठाणे जिल्हयातील शहापूर पासून ५० किलोमीटर अंतरावर डोळखांब जवळ चोंढा येथे जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभागाने सुमारे अकराशे कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी वीज प्रकल्प उभा केला आहे.संपूर्ण जपान तंत्रज्ञानाचा वापर करुन घाटघर धरणाच्या पाण्यावर अडीचशे मॅगवेट एवढी वीज येथे तयार केली जात आहे.घाटघर धरण हे अगदी निसर्गाच्या कुशीत लपलेले आहे.या परिसराचे पावसाळ्यातील देखणे रुप म्हणजे निसर्ग प्रेमींना पर्वणीच म्हणावी लागेल हा सर्व परिसर पावसाळ्यातील जून महिन्यात हिरवागार होऊन जातो उंच डोंगरमाथ्यावरुन खळखळ आवाज करत कोसळणारे येथील पांढरे शुभ्र धबधबे आणि त्यातून उंच उडणारे तुषार आणि पांढऱ्या शुभ्र गडद धुक्यामुळे काही वेळ गडब होणारे डोंगर माथे हा मिलाप तर पाहण्यासारखा  दुसरा आनंद नाही घनदाट जंगल पशुपक्षी,दुर्मिळ वन्यजीवांसाठी येथील वनराई खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे.घाटघर धरणाकडे जाणारी नागमोडी रस्ते,वृक्षांची सभोवताली रांग ,डोंगर दऱ्यांतून कोसळणाऱ्या धबधब्यांचा दूरवरून येणारा आवाज, पक्षांचा किलबिलाट हा सारा अनुभव एकदा घ्यावा असा हा घाटघर धरण परिसर आहे.घाटघर धरणाला एकूण ७ दरवाजे आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास ते सातही दरवाजे उघडतात पावसाळ्यात पडणाऱ्या धुक्यांच्या छायेत हा परिसर जणू स्वर्गीय वाटतो.पावसाळ्यांत या ठिकाणावरील हिरवेगार नयनरम्य दृश्य हे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य तुम्हाला चोंढे घाटघर प्रकल्पाला भेट दिल्यास अनुभवायला मिळेल अशा या हिरव्यागार परिसर सध्या हिरवाईने नटला आहे.

Heading – मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध

 मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधSlug – द्विपक्ष राजकीय प्रणाली आणा — करणी सेना रमेश औताडे मुंबई : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णयापेक्षा देशातील राजकीय अस्थिरता नष्ट करण्यासाठी “द्विपक्षीय राजकीय प्रणाली” साठी घटना दुरुस्ती करा असे “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात सेंगर यानी देशाची प्रगति व विकास हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन सारखा होऊ शकली नाही यास बहुपक्षीय राजकीय प्रणाली कारणीभूत आहे असा उल्लेख केला आहे. या पत्रात अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्ष हे जाती, धर्म व भाषावाद सारखे मुद्दे व राजकीय भ्रष्टाचाराच्या समस्या निर्माण करून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत. याबाबत त्यांनी  चिंता व्यक्त केली. राजकीय स्थिरता एक सफल लोकतंत्रासाठी द्विपक्षीय प्रणालीची आवश्यकता फार जरूरी आहे. द्विपक्षीय प्रणाली मध्यमार्गी विचारांना प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांना अशा समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते, ज्या मतदारांच्या मोठ्या वर्गाला आकर्षित करतात. यामुळे राजकीय स्थिरता येऊ शकते, त्यात कमी मतभेद आणि अधिक सलोखा असतो यामुळे विकासाला चालना मिळेल असे सेंगर यांनी सांगितले. बहुपक्षीय प्रणालींमुळे काहीवेळा त्रिशंकू संसद निर्माण होऊ शकते, राजकीय अस्थिरताने विकास खूटला जातो. प्रत्येक पक्ष हा फोड़ा फोड़ीच्या राजकारणात व्यस्त आहे, देशात बहुपक्ष राजकीय प्रणालीने लोकशाहीला नाकारत धनशाही आणली आहे परिणामी भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. द्विपक्ष राजकीय प्रणाली सोबत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्याची तरतूद करण्यात यावी. जर निवडून आल्यापेक्षा बरोबर त्यांनी कोणत्याही एका पक्षात पक्ष प्रवेश करावा जेणेकरून प्रत्येक नागरिकाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होईल असे या पत्रात नमूद केले आहेत.

Heading – राष्ट्रीय चर्मकार संघाच्या नवी मुंबई  कार्याध्यक्षपदी विनोद पाखरे

 मुंबई प्रदेश महिला कार्याध्यक्षपदी पायल खरे मुंबई :  नवी मुंबईतील नेरळ येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाखरे आणि मुंबईतील नायगाव येथील समाजसेविका पायल राजेंद्र खरे यांची अनुक्रमे राष्ट्रीय चर्मकार संघचे नवी मुंबई प्रदेश आणि मुंबई प्रदेशच्या महिला कार्याध्यक्ष म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.या नवीन नियुक्तीची पत्रे राष्ट्रीय चर्मकार संघाचे  अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी त्यांना माटुंगा लेबर कॅम्प येथे अलिकडेच  झालेल्या समाजाच्या मेळाव्यात दिली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास गोरेगावकर, कार्याध्यक्ष अशोक देहरे, मुंबई प्रदेशच्या  महिला प्रदेशाध्यक्ष शारदा नवले आदी उपस्थित होते. नेरळ येथील संत रोहिदास सेवा फाऊंडेशनचे विनोद पाखरे हे  अध्यक्ष असून या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्या,शैक्षणिक साहित्य, छत्र्यांचे वाटप केले जाते. याचबरोबर नेरळमध्ये या संस्थेतर्फे रक्तदान शिबिरे,आरोग्य शिबिरे घेतली जातात. या फाऊंडेशनचे वैशिष्ट्य म्हणजे गरजू, बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खाजगी व सरकारी नोकरी मिळवून देण्याबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. अशा प्रयत्नांतून अनेक तरुणांना खाजगी, सरकारी नोकऱ्या मिळून त्यांचे आयुष्य उज्वल झालेले आहे. याचा आपल्याला अभिमान असल्याचे विनोद पाखरे यांनी सांगितले. विनोद पाखरे पुढे म्हणाले   मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चर्मोद्योग कामगार सेनेचा सरचिटणीस आहे. मात्र  राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये  आम्ही पक्षीय विषय बाजूला ठेवून चर्मकार समाजासाठी एकदिलाने काम करीत राहणार आहे. एसएनडीटी विद्यापीठाची सामाजिक शास्त्राची एम.एस.डब्ल्यू . ही पदवी घेऊन पायल खरे यांनी काही काळ बँकिंग क्षेत्रात काम केले. परंतु समाजातील गरजू महिला, युवक, वंचित घटकांसाठी काम करण्याच्या उद्देशाने ही नोकरी सोडून २००९ पासून त्यांचा समाजसेवेचा प्रवास सुरू झालेला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने  त्यांनी व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी संभाषण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. यानंतर त्यांनी मेणबत्ती कॅण्डल आणि बॅग निर्मिती यासारखे लघु उद्योग सुरू करून अनेक महिलांना रोजगार आणि स्वाभिमानाचे एक दार उघडून दिलेले आहे. पायल खरे  म्हणाल्या महिला सक्षमीकरण, युवक कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, समुपदेशन, आरोग्य जनजागृती आणि आर्थिक मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने मला काम करण्याची संधी मिळालेली आहे.सध्या मी मोटिव्हेशशनल स्पीकर अर्थात एक प्रेरणादायी वक्ता, समूह समुपदेशक,हेल्थ कन्सल्टंट,  हेल्थ ॲडव्हायझर आणि फायनान्शियल ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहे.तसेच मागील गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्यूअरशिप डेव्हलपमेंट मध्ये (एम.एस.ई.डी.) प्रोग्राम ऑर्गनायझर म्हणून मी काम करीत आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन माजी आमदार बाबुराव माने यांनी  आमची  राष्ट्रीय चर्मकार संघाच्या  कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल  आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत.आम्ही आमच्या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा समाजाच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे पायल खरे, विनोद पाखरे  यांनी म्हटले आहे. ००००

ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे आमदार माधवी नाईक यांचा सन्मान

अनिल ठाणेकर ठाणे:  ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे विधान परिषदेतील भाजपच्या आमदार अॅड. माधवी नाईक यांचा अॅड. विजय आगाशे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. आगामी काळात न्यायालयासंदर्भातील विविध प्रश्नांबरोबरच बार कौन्सिल आणि वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. ठाणे न्यायालयात अनेक वर्षांपासून वकील म्हणून माधवी संजय नाईक यांनी कार्य केले आहे. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदाबरोबरच त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पातळीवर संघटनात्मक कार्य केले. त्यांची नुकतीच भाजपतर्फे विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अॅड. माधवी नाईक यांचा ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी `बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा’चे सदस्य गजानन चव्हाण, माजी उपमहापौर व ज्येष्ठ वकील सुभाष काळे, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आमदारपदाच्या माध्यमातून भविष्यात अधिक जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न असेल. विधी क्षेत्रातील वकील बंधू-भगिनींकडून मिळालेला हा सन्मान यापुढील काळात माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. वकिली क्षेत्रातील माझे गुरू ॲड. विजय आगाशे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान मोठा गौरव आहे. त्यांच्याकडून केवळ वकिलीचेच नव्हे, तर शिस्त, प्रामाणिकपणा, कामाप्रती समर्पण असे अनेक संस्कार मिळाले. ते कायम प्रेरणादायक राहतील, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. बार कौन्सिल व जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. माझ्या उमेदीच्या वर्षात ठाणे जिल्हा न्यायालयात अनेक दिग्गज वकिलांचे काम जवळून पाहू शकले. त्यात दिवंगत प्रभाकरभाई हेगडे आणि दिवंगत रमाकांतअण्णा ओवळेकर ही नामवंत व्यक्तिमत्व होती. त्यांच्या कार्याचा कायम अभिमान राहील, अशी भावना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली.

आरटीई प्रवेशासाठी बनावट उत्पन्न दाखल्यांचा गैरवापर

आरटीई प्रवेशासाठी बनावट उत्पन्न दाखल्यांचा गैरवापरSlug – दोषींवर कठोर कारवाईची नरेंद्र पवार यांची मागणी कल्याण : शिक्षणाचा हक्क  कायद्याअंतर्गत शालेय प्रवेशासाठी बनावट उत्पन्नाचे दाखले सादर करून प्रवेश मिळविल्याच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालकांवर कठोर कारवाई करून त्यांची नोंदणी तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळालेले आरटीई प्रवेशही रद्द करण्यात यावेत अशी महत्त्वाची मागणी भाजपाचे भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या गंभीर विषयासंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज भेट घेऊन आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे लक्ष वेधले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असताना काही प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता बनावट अथवा खोटे उत्पन्नाचे दाखले तयार करून दिल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. या बनावट उत्पन्नाच्या दाखल्यांमुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नरेंद्र पवार यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराकडून सत्यप्रतिज्ञापत्र, संबंधित संस्थेच्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील, तलाठी पंचनामा तसेच शासनाने विहित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे घेणे बंधनकारक असतानाही काही महा-ई-सेवा केंद्रांमार्फत नियमबाह्य पद्धतीने बनावट उत्पन्नाचे दाखले तयार करून दिले जात असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभिर्य पाहता निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी, संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालक तसेच या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. तसेच  बनावट उत्पन्नाचे दाखले तयार करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय, खोट्या उत्पन्नाच्या दाखल्यांच्या आधारे RTE अंतर्गत मिळालेले शालेय प्रवेश रद्द करून पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना न्याय दिला जावा अशी कळकळीची विनंतीही पवार यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

 भरपावसात ज्येष्ठ नागरिकांची फरफट, टीएमटी पाससाठी हेलपाटे

सहा-सात महिन्यांनंतरही पास नाही – काँग्रेस आक्रमक अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना भर पावसात तासन्‌तास रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्याचा गंभीर आरोप ठाणे  काँग्रेसने केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटीस (SATIS) पुलावरील पास वितरण केंद्राला अचानक भेट देत त्यांनी परिवहन प्रशासनाच्या निष्काळजीपणा वर जोरदार टीका केली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पिंगळे यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, पावसापासून संरक्षणासाठी छत नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात मिळायला हवा असलेला डिजिटल पास सहा ते सात महिने उलटूनही मिळत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. स्वातंत्र्यसैनिकांकडूनही पाससाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. याबाबत उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पास वितरणाचे काम खासगी कंपनीकडे असल्याचे सांगण्यात आले. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर सध्या नगरसेवकांकडून आलेले २०० ते ३०० पास तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर देण्यात आले. या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी लवकरच परिवहन व्यवस्थापकांची भेट घेऊन सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पास काढण्याचा त्रास होऊ नये म्हणून पासची वैधता पाच वर्षांची करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिवहन सेवेतील विलंब, नियोजनाचा अभाव आणि ज्येष्ठ नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे ठाणे परिवहन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह ठाणे काँग्रेस चे ज्येष्ठ नेते राम भोसले,महेंद्र म्हात्रे,शिरीष घरत,ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर,हर्षल कोळी,चंद्रकांत पाटील,शरद जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 000000000

सपना गार्डन पार्किंग परिसरातील जर्जर मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर

आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगर येथील सपना गार्डन परिसरातील पार्किंग क्षेत्राकडे जाणारा मार्ग अनेक दिवसांपासून अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या…

 ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’चा रौप्यमहोत्सवी सोहळा २४-२५ जुलैदरम्यान मुंबईत

 महोत्सवातून झालेले निधीसंकलन ‘सीपीएए’ आणि ‘पीएटीयुटी’च्या समाज कार्यासाठी मुंबई : दिवंगत पद्मभूषण पंकज उधास यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘खजाना – अ फेस्टिव्हल ऑफ गझल्स’ यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २४ आणि २५…

 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे माझे कर्तव्य : महेंद्रशेठ घरत 

 शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जतच्या विद्यार्थ्यांना दफ्तर-छत्रीचे वाटप उलवे : ‘दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची वानवा असते. त्यामुळे अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे दफ्तर, छत्री यांसारख्या प्राथमिक सुविधा देण्याचा गेली १५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कर्जत तालुक्याशी आपले वेगळे नाते आहे’, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. पनवेल तालुक्यातील शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दफ्तर आणि छत्रीचे मंगळवारी वाटप करण्यात आले. कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काठेवाडी, तेथील अंगणवाडी आदी सहा शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शुभांगीताई घरत यांच्या वतीने हे शैक्षणिक दान करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे कुटुंबीय हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी कर्जतच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीही भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दानशूर समाजात आहेत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.” यावेळी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाबशेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत घरत, मिनाक्षी घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते. 000000000 00000000 000000000

– स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार

 शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश मुंबई : राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि आज तात्काळ सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलैला या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून अजितदादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे. परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती २२ जुलैला राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे.याशिवाय सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जयंती साजरी होणार आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वर्गीय अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे त्यांना जनमानसात हक्काचे ‘दादा’ म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाणार आहे.