Category: मुंबई

Mumbai news

महाडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासकीय जमीन देण्याचा नवा जीआर काढा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना राजेंद्र साळसकर मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जी शासकीय जमीन ठरली होती त्याचा नवीन शासन निर्णय काढावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाने प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबई-गोवा महामार्गांवर महाड हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे महाड उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर या रुग्णालयांना महत्व आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी या रुग्णालयांत यावे लागते. परंतु येथे सोयी-सुविधांची वाणवा असल्याने येथील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न्यावे लागते. याची दखल घेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाडला २०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली होती. तसेच तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत पत्र व्यवहारही केला होता. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२३ रोजी केंबुर्ली येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास शासनाने मंजुरी दिली व २८ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी केला. तसेच १४७ कोटींच्या या कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. केंबुर्ली येथील स. नं. ५२/२ व ५३/२ अ मधील १५ एकर जमिनीचा ताबा देण्याची मागणी कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र या जमिनीऐवजी स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयासाठी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. यावर दरेकर यांनी आक्षेप घेत महाड उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांना पाठवला होता. असे असताना स. नं. ४८/२ ही शासकीय जमीन रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय का काढला? असा सवाल करत महसूल मंत्र्यांकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार आज याबाबत मंत्रालयात बैठक पार पडली व महसूल मंत्र्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला शासकीय जमीन देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय काढावा, असा सूचना संबंधित विभागाला दिल्या. या बैठकीला प्रविण दरेकर, महाड १९४ भाजपा विधानसभा प्रमुख बिपीन म्हामुणकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पगार नसल्याने गिरणी कामगारांची निदर्शने

रमेश औताडे मुंबई : मुंबईतील एनटीसीच्या चार बंद‌ गिरण्यातील कामगा रांच्या थकीत पगारावर राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने बेलार्ड पिअर येथील प्रधान कार्यालयावर संतप्त कामगारांनी‌ निदर्शने केली. संघटनेचे‌ अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या आदेशानुसार  हे निदर्शनाचे पाऊल उचलण्यात आले. गेल्याच महिन्यात २४ डिसेंबर रोजी गिरणी कामगा रांनी तीन‌ महिन्या पेक्षा अधिक काळाच्या थकीत पगारासाठी एनटीसी व्यवस्थापनाला घेराव घालून,आपला संतप्त राग व्यक्त केला होता.त्यावेळी एनटिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांकुमगुणा यांनी दिल्ली होर्डींग्ज कंपनीशी बोलणी करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे कामगारांना आश्वासन दिले होते. पण या प्रश्नावर संघटनेने‌ सातत्याने पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाने अकारण कालापव्यय लावला.त्यामुळे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने उपासमारीने त्रस्त कामगारांच्या प्रश्नावर हे निदर्शनाचे पाऊल उचलले. खजिनदार‌ निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी एनटीसीच्या बेलार्ड पियर येथील प्रधान कार्यालयावर तिव्र निदर्शने केली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील देशभरातील चालू असलेल्या २३ गिरण्या सन २०२० मध्ये कोविडचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या, त्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत.रामिम संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिट णीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय समन्वयक कृती समिती स्थापन करुन दिल्ली संसदेवर आंदोलन छेडण्यात आले. या प्रश्नावर खासदारांच्या  शिष्टमंडळाकडून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेटही घेण्यात आली होती.परंतु या प्रश्नावर केंद्र सरकारने पहिल्या पासूनच नरो वा कुंजोरोची भूमिका घेतली.या गिरण्यात मुंबईतील टाटा,इंदू मिल क्र.५,पोद्दार, दिग्विजय तसेच बार्शी,अंमळनेर या महाराष्ट्राच्या सहा एनटीसी गिरण्यांचा समावेश आहे.मुंबईतील गिरण्या म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी या द्रुष्टीकोनातून पाहिले गेले आहे. मुंबईसह राज्यातील सहा एनटीसी गिरण्यांच्या गंभीर परिस्थितीकडे  लक्ष वेधण्यासाठी मुंबईत किमान तीन‌‌ वेळा गिरगावात अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली.एनटीसी गिरण्यांची स्तावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. देशातील  इस्पितले,सरकारी‌ कार्यालये आदी ठिकाणी लागणारे कापड खरेदी एनटीसी गिरण्यां मधून सक्तीने‌ झाली तर‌ या गिरण्या सुस्थितीत चालू शकतील,शिवाय या गिरण्यांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, ही संकल्पना आमदार सचिनभाऊ अहिर यांनी मांडली होती.या गिरण्या सरकारला चालवाव्या लागतील अन्यथा कामगारांना मागील पगार द्यावा लागेल.गेल्या पाच वर्षांत सेवावृत्त झालेल्या कामगारांना त्यांची न्याय देणी द्यावी लागतील.

मुंबई पोर्ट रुग्णालयातील परिचारिकांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार सोहळा संपन्न

मुंबई : वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या  रुग्णालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी. जया धिरवाणी, नर्सिंग सिस्टर इन्चार्ज अश्विनी सकपाळ, नर्सिंग सिस्टर. पूजा चव्हाण आणि स्नेहा माळी यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने २८ जानेवारीला रुग्णालयाच्या गार्डन मधील लॉनवर ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न झाला. सेवानिवृत्त चारही कर्मचाऱ्यांचा युनियनच्या वतीने तसेच इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने  शाल,  पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. या प्रसंगी चारही कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीतील कार्याचा गुणगौरव ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस के शेट्ये,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी  डॉ. विराज पुरोहित, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. संदीप बिरारीस,  डॉ. सुजाता मोकल, सुलोचना शिंदे इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन केला. सत्काराला जया धिरवाणी, पूजा चव्हाण,  मनीषा सकपाळ व स्नेहा माळी यांनी उत्तर दिले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मीर निसार युनूस सेच चिकित्सा विभागाच्या वतीने , वरिष्ठ उपमुख्य चिकित्सा अधिकारी, मेट्रन मेघा सोबाळकर, डॉ.  प्रणीला पुरोहित, असिस्टंट मॅट्रेन सौ बांदेकर, मुंबई पोर्ट प्राधिकरण हॉस्पीटल मधील सर्व अधिकारी व कर्मचारी बंधू व भगिनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची तसेच अल्फाकॉम हाऊस कीपिंग सर्विसेस लिमिटेड मधील सर्व कर्मचारी प्रामुख्याने विशेष उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाची सुत्र संचालनाची जबाबदारी नर्सिंग सिस्टर्स निशा बोरगांवकर,  शीला भगत व योगिनी दुराफे  यांनी आपल्या रसाळ आणि मधूर वाणीने करून संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्याची जबाबदारी सांभाळली. गार्डनमधील लॉनवर  इव्हेंट मॅनेजमेंट करणारे स्नेहा माळी यांचे चिरंजीव स्मित माळी यांनी सत्कार सोहळ्याची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती.  त्याबद्दल त्यांचा प्रभारी मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. विराज पुरोहित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : मधु मोहिते लिखित ‘शोध परिवर्तनाचा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता माटुंगा येथील दादर- माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. हा प्रकाशन समारंभ मान्यवर स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. परिख, डॉ. भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर, हुसेन दलवाई व डॉ. लता प्रतिभा मधुकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राला सामाजिक व राजकीय लढ्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे ह्या इतिहासाचा वारसा व प्रेरणा घेऊन अनेक तरुण कार्यकर्त्यांनी विद्यार्थिदशेपासूनच सामाजिक/राजकीय चळवळीत झोकून देऊन निःस्पृह काम केले आहे. आमदार, खासदार, मंत्री अशी स्वप्ने त्यांना पडली नाहीत किंवा ते अशा गोष्टींसाठी कधी लांगूनचालन करीत बसले नाहीत. अन्यायपीडित, शोषित जातीवर्गांमध्ये ते काम करत राहिले. काहींना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले, तुरुंगवास भोगावा लागला. तरीही त्यांनी निष्ठा कायम ठेवली व सातत्यपूर्वक काम करीत आहेत. स्वातंत्र्याच्या वीस-पंचवीस वर्षांत भारतीय शोषित वर्गजातींच्या जीवनमानात काही फरक पडत नाही म्हटल्यावर देशभर तरुणांचे उठाव झाले. जागृत बंडखोर तरुण आयुष्याची तमा न बाळगता श्रमिकांच्या या लढ्यात सहभागी झाले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात मधुकर म्हणजेच मधु मोहिते याने शोषितांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. अनेक कठीण प्रसंग आले. प्राणघातक हल्ले, टिकाटिप्पणी व आर्थिक विवंचना खूप होती. अशा परिस्थितीत दिलेला संघर्ष त्यांनी त्यांच्या ‘शोध परिवर्तनाचा’ या पुस्तकात नमूद केला आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रकाशन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, मूळ ४०० रुपयांचे हे पुस्तक केवळ २५० रुपयांत मिळेल त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी केले आहे.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण कटके, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, तसेच इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. आजच्या हुतात्मा दिनानिमित्त     देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत स्तब्ध उभे राहून मौन पाळण्यात आले.

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा – वर्षा गायकवाड.

महायुती सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ व पाठ्यपुस्तकात कोरी पाने’ प्रयोग लादून काय साध्य केले? १- ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची? मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल विचारून महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की,तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पाठ्यपुस्तकाचे चार भाग करून त्यात कोरी वह्यांची पानं लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांशी कोणतीही चर्चा का केली नाही? या दोन्ही निर्णयांना चहूबाजूंनी प्रखर विरोध होत असताना, महायुती सरकारनं हे प्रयोग लादून नेमकं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या नुकसानाचं काय?. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्र्याचे चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी निर्णय रद्द करण्याचे धाडस दाखवले पण या बोगस आणि भ्रष्ट निर्णयांमुळे लाखो सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भुर्दंड कोण भरणार? असे प्रश्न खा. गायकवाड यांनी विचारले आहेत. ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही – जबाबदारी कोणाची? शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी, ३५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. यासाठी जबाबदार ठरवून संबंधितांवर कारवाई होणार की नाही? शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मागील शिक्षणमंत्री केसरकर यांच्या काळात अशा भोंगळ कारभार आणि अनावश्यक उद्योगांवर अधिक भर दिला गेला. यातून नेमकं कोणाचा स्वार्थ साधला गेला? ठराविक लाडक्या कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. ‘असर’ अहवालाचा इशारा……

शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य  शशिकांत झोरे यांच्या  माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख  उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप  करण्यात आले. याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, शाखा संघटक शुभदा सावंत, शाखा समन्वयक माधुरी खानविलकर, युवासेना सचिन शिरसाट, वृषल पुसाळकर, आशिष सोंडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  शशिकांत झोरे यांच्या सह  उपशाखा संघटक सौ इति महाडिक, रईसा मुल्ला, सुलभा गावकर, सोनाली रोकडे यांनी यशस्वीपणे केले.

नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल

रमेश औताडे मुंबई :राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा. सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.

जीवनदान देण्यासाठी पुढे आले ११० रक्तदाते

रमेश औताडे मुंबई : कराड को -ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोपरखैरणे नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेने सलग २५ व्या वर्षी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. नवी मुंबई विभागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ११० रक्तदात्यानी  रक्तदान केले. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई सागर नाईक, विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आंनदराव कचरे, उपाध्यक्ष डी. आर. पाटील आणि सर्व संचालक व कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.