Category: मुंबई

Mumbai news

श्री गणेश आखाड्यातर्फे निवासी कुस्ती शिबिर

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर पश्चिम  यांच्यातर्फे येत्या २१ मे ते १० जून २०२४ या कालावधीत उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू, पंच यांच्याकडून कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाईल. तसेच नविन नियमांची माहिती करुन देण्यात येईल. कुस्तीसोबत योगासने, प्राणायामाचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. २० मेपर्यंत शिबिराच्या प्रवेशिका स्विकारण्यात येतील. शिबिराचे प्रवेश शुल्क ७०००/- रुपये आहे. नितिन शिंदे, महेंद्र जाधव, विवेक नायकल, वैभव माने, अनिल बागाव, कोमल देसाई हे सर्व एन आय एस प्रशिक्षक कुस्तीपटूंना या खेळाचे धडे देतील. शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यांना प्रमाणपत्र, ट्रॅकसूट, सन्मान चिन्ह भेट देण्यात येईल. शिबिराच्या प्रवेशासाठी मिलिंद लिमये, ९६१९०२४३३३, वसंतराव पाटील ८३२९६०९०३८, सदानंद पाटील ९३७२४१३३२५, रुपचंद माने ९८६९१०४१२२,  कोमल देसाई ७०३९१२५९८५ यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे २०२४ रोजी लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, डॉ. सी. जी. देसाई मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धेची नावे ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, मुंबई – ४०० ०१६ येथे क्लब मार्फत स्वीकारण्यात येतील.

रिक्षा-टॅक्सीच्या उत्पन्नात तापमानवाढीमुळे घट

उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले. मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.  यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

१० जूनला होणार मतदान अशोक गायकवाड मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गारगाई प्रकल्पाला येणार वेग

मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबई : मुंबईची तहान भागविणा-ऱ्या गारगाई प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याने बहुतांशी पेच सुटणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला ४०० दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या प्रकल्पाची मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी तसेच बाधित होणारी शेतजमीन, येथील चार गावातील रहिवाशांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. मात्र पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत. प्रकल्पात पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे. यावर अभ्यास करून उपाययोजनाही सूचवणार असल्याचे सांगण्यात आले. पुनरावलोकन होणार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे, पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे, प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील, झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार, बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय य़ाबाबींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. अभ्यासानंतर अहवालातील शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

पथनाट्यांव्दारे निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गायकवाड नवी मुंबई : जनजागृतीच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हे अत्यंत प्रभावी माध्यम असून २० मे रोजी होणा-या २५ ठाणे लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. या पथनाट्यांतील कलावंत समुह महापालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सत्रात गर्दीच्या ठिकाणी जाऊन चौकाचौकात लोकशाहीचा जागर करीत निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मनोरंजक पध्दतीने सादर होणारी ही पथनाट्ये मतदान करण्याचे महत्व हसतखेळत पटवून देत आहेत. हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा असून मतदान करून आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे हे लोकांना पथनाट्याव्दारे पटवून दिले जात आहे. वाशी विभागात रेल्वे स्टेशन परिसर, मिनी सी शोअर सेक्टर ९, सेक्टर ९ मार्केट, सेक्टर १५ मार्केट, सेक्टर १० चौक तसेच नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू, सेक्टर १० पूर्व, नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर २० चौक अशा विविध ठिकाणी झालेली पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पथनाट्ये सादर केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांची दाद देत कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी डाव्या हाताची तर्जनी उंचावत सामुहिक सेल्फी काढून आपण मतदान करणार असल्याचे दर्शविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून मतदार जनजागृती केली जात असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.

मतदात्यांसाठी मतदान केंद्रावर ‘थंडा थंडा कूल कूल’ची व्यवस्था!

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदात्यांसाठी यंदा मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूल अशीच काहीशी व्यवस्था असणार आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत असून त्याचा मतदानावर परिणाम…

कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार

मुंबई : कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार असून तो त्यांचा आत्मसन्मानाचा हक्क आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. कच्चा कैदी म्हणून उपचार घेणे आणि कोणत्याही बंधनात नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीने उपचार घेणे यामध्ये फरक आहे, असेही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले. गोयल यांच्या वैद्यकीय चाचण्या, अहवालांचा अभ्यास केल्यानंतर ते आजारी नाहीत असे म्हणू शकत नाही. तसेच, गोयल हे आवडीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना जामीन नाकारावा हा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवादही मान्य करता येणार नाही. किंबहुना, एखाद्या व्यक्तीला आवश्यक उपचार मिळाल्यास तो जामिनास पात्र नाही हा युक्तिवाद स्वीकरणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर गदा आणण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने गोयल यांची वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी मान्य करताना नमूद केले. गोयल हे खटल्यापासून पळ काढण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याचीही शक्यता नाही, असेही न्यायालयाने म्हटले. कॅनरा बँकेची ५३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने गोयल यांना अटक केली होती. विशेष न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गोयल यांना सोमवारी दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता.

श्री गणेशपूजा प्रशिक्षण निशुल्क वर्ग

मुंबई : भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग १२  मे २०२४  पासून, दर वर्षी प्रमाणे, दर रविवारी सकाळी ९  ते ११ वाजे पर्यंत, वनमाळी हॉल , छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे होतील.  सदर वर्ग नि:शुल्क आहेत आणि सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग, वय असे कसलेही भेद पाळत नाही.  सर्वास खुले आहेत. प्रत्येकास १२ मे पासून श्रावण महिना संपे पर्यंत दर  रविवारी हजर राहायचे आहे. नोंदणी आवश्यक नाही.  ईच्छुकांनी थेट  वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर  रहावे. काही शंका असल्यास, प्रमोद नाईक —, ९९२००६६५७५

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी

अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड करण्यात आली. भारतातील प्रमुख बंदर व  मुंबई बंदरातील सर्वात जुनी १०४ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या २५ एप्रिलला माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. सभागृहाने ठराव करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांना उर्वरित पदांसाठी कार्यकारिणी निवडीचेअधिकार दिले होते. त्याप्रमाणे  ६ मे ला   २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी निवडलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी :  अध्यक्षपदी – एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी – डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी – सुधाकर अपराज, उपाध्यक्षपदी –  अहमदअली काझी, शीला भगत, विष्णू पोळ, प्रदीप नलावडे, रमेश कुऱ्हाडे, सेक्रेटरीपदी – विद्याधर राणे, दत्तात्रय खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदारपदी – विकास नलावडे, प्रसिद्धीप्रमुख –  मारुती विश्वासराव, संघटक सचिवपदी – मिर निसार युनूस, संदीप चेरफळे, प्रवीण काळे, संतोष कदम, अनंत भोसले.