Category: मुंबई

Mumbai news

मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर -गोरखपूर, एलटीटी – गोरखपूर आणि सीएसएमटी – दानापूरदरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २६ एप्रिल, १ मे रोजी रात्री ११.५० वाजता एलटीटीवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल, ३ मे रोजी गोरखपूरवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी रेल्वेगाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

विविध उपक्रमांतून नवी मुंबईत मतदानविषयक व्यापक जनजागृती

नवी मुंबई : प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने स्वीप उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून त्याकरिता विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये ज्या ठिकाणी लोक जास्त संख्येने एकत्र येतात अशा समारंभ, उत्सव या कार्यक्रमांठिकाणी जाऊन मतदान करण्याचे महत्व पटवून दिले जात आहे तसेच मतदान शपथ घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यालयात परिसर सखी विकास संस्थेच्या वतीने आयोजित कचरा वेचक महिलांच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी तथा नमुंमपा क्रीडा अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे व सहा. नोडल अधिकारी श्रीम. विभा सिंग यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत कचरा वेचक महिलांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. याप्रसंगी उपस्थित महिलांनी आपण स्वत: तर मतदान करुच आणि इतरांनाही मतदान करण्यास सांगू अशी सामुहिक शपथ ग्रहण केली. अशाच प्रकारे वाशीतील विष्णुदास भावे नाटयगृह येथे आयोजित ऐरोलीच्या डीएव्ही स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी स्वीप जनजागृती अंतर्गत शिक्षक, पालक व विदयार्थ्यांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन करण्यात आले. उपस्थितांमधील मतदारांनी सामुहिकरित्या बोट उंचावून आपण मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. पटनी रोड येथील वेस्ट साइड व क्रोमा या मोठ्या व्यावसायिक दुकानांमध्येही मतदान विषयक जनजागृती करण्यात आली. अशा स्वरूपाच्या सर्व मोठया आस्थापनांना व संस्था कार्यालयांना भेटी देऊन मतदानाचे आवाहन केले जात आहे. ऐरोली येथील मध्यवर्ती पोस्ट ऑफिस मध्येही जाऊन तेथील अधिकारी-कर्मचारी व पोस्टमन यांचे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तसेच ऐरोलीगावातील उत्सवाप्रसंगीही मतदानाचे आवाहन करण्यात आले. दिघा विभाग कार्यालयाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत मतदान करण्याची शपथ घेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याविषयीचे आवाहन पोहोचविण्यासाठी प्रत्येक अधिकारी – कर्मचारी यांनी आपले योगदान दयावे असे सूचित केले. दि.20 मे रोजी 25 ठाणे लोकसभा मतदार संघाची निवडणुक होत असून यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या सबलीकरणाला हातभार लावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वीच आढावा बैठकीत दिले असून त्या अनुषंगाने महानगरपालिका स्तरावरूनही मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

मराठा आरक्षणची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलली

मुंबई : महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय श्रेणीतील मराठ्यांच्या नोकऱ्या अन् शिक्षणातील १० टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालय १३ जून रोजी पुन्हा सुनावणी सुरू करणार आहे. स्थगिती मागणाऱ्या सर्व याचिकांवर…

नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार-एकनाथ शिंदे 

मुंबई : नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आहे. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे सलग दोन वेळा नाशिकमधून निवडून आले आहेत.…

उद्धव ठाकरेंचा वचननामा जाहीर

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा लोकसभेसाठीचा वचननामा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. उद्योगाला आम्ही चांगले दिवस आणू. पर्यावरण पूरक प्रकल्प आणू, जीएसटीवरील त्रासदायक अटी आम्ही काढून टाकू अशी…

वर्षा गायकवाड निवडणूक लढवणार

मुंबई उत्तर मध्यमधून मविआच्या उमेदवार  मुंबई : विद्यमान आमदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीतर्फे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून त्या ही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने त्यांची आज उमेदवारी…

जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय

मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत्यू झालेले दोघे भाऊ-बहीण असून ते बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मोटरगाडीत गुदमरून मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. चिमुकल्यांच्या मृत्युमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे. साजीद शेख (७) व मुस्कान (५) अशी या मुलांची नावे आहेत. वडील मोहाब्बत शेख व आई मुस्कान यांच्यासोबत ते ॲन्टॉप हिल परिसरात वास्तव्यास होते. ते दोघे बुधवारी दुपारी एकत्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. मुले कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई – वडिलांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांचा शोध सुरू केला. मुले राहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मुले कोठेच सापडली नाहीत. अखेर सायंकाळी ७.४५ च्या सुमारास एका महिला पोलिसाने मोबाइलमधील टॉर्चच्या साह्याने जुन्या मोटरगाडीत पाहिले असता आत मुले असल्याचे आढळले. मोटरगाडीचा दरवाजा उघडला असता मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस मुलांच्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलांचा मृत्यू गुदमरून झाल्याची शक्यता असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले. चौकशीनुसार दोन्ही मुले दुपारी २ च्या सुमारास खेळायला घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. ती जुनी मोटरगाडी मुलांच्या घरापासून ५० फुटांच्या अंतरावर आहे. ती मुले नेहमी त्याच परिसरात खेळायची. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीतही त्या काळात तेथे कोणी तिसरा व्यक्ती आलेला दिसत नाही. तरी पोलीस सर्व शक्यता पडताळणून पाहत आहेत. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नवीन इमारतीत (छत्रपती शिवाजी महाराज भवन) छायांकित प्रत केंद्र (झेरॉक्स सेंटर) नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास परीक्षा भवनापासून दूरवर असलेल्या छायांकित प्रत केंद्रांजवळ रिक्षाने जावे लागत आहे. कलिना संकुल तब्बल २४३ एकर जागेवर उभे आहे. या संकुलात ५० हून अधिक विविध शैक्षणिक विभाग आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संकुलात आरोग्य केंद्र, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र (पूर्वीचे आयडॉल), जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्र म्हणजेच ग्रंथालय या तीनच ठिकाणी छायांकित प्रत केंद्रे आहेत. ही तीनही छायांकित प्रत केंद्रे जवळपासच आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नव्या इमारतीत छायांकित प्रत केंद्र नाही. परीक्षाविषयक विविध कामांसाठी मुंबईसह ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, तसेच कोकणासारख्या ग्रामीण भागातूनही बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा भवनात येत असतात. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास संकुलातील व संकुलाबाहेरील छायांकित प्रत केंद्रांमध्ये रिक्षानेच जावे लागते. १ रुपयाच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना येऊन – जाऊन रिक्षाचे ४६ रुपये भाडे मोजावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना संकुलातील छायांकित प्रत केंद्राची माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र सुरू करावे. तसेच कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची आवश्यकता भासणार नाही, अशी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. – संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य

खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास

सर्वेक्षणातून माहिती उघडकीस मुंबई : मसाल्यांमध्ये कर्करोग होणारे घटक असल्याचा दावा करीत सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. यावरून देशातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात देशातील अन्न सुरक्षा संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांनी अविश्वास दर्शविल्याचे उघडकीस आले आहे. भारतीय कंपन्यांच्या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचा दावा करीत हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यांवर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आणि अन्न नियामक संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी एका खासगी संस्थेने महाराष्ट्रासह देशभरात ऑनलाईन सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील २४ हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातील ३ हजार ६४४ नागरिकांचा समावेश होता. एकूण सहभागी नागरिकांपैकी ३६ टक्के ग्राहकांनी त्यांचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर विश्वास नसल्याचे म्हटले. तर ३७ टक्के नागरिकांनी फारच कमी विश्वास असल्याचे, तर २४ टक्के नागरिकांनी या संस्थांच्या कार्यप्रणालीवर ५० टक्के विश्वास असल्याचे सांगितले. मात्र तीन टक्के नागरिकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनावर पूर्णपणे विश्वास दर्शविला. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील घटनेबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातील १ हजार ८२९, तर देशातील १२ हजार ३६१ नागरिकांनी चिंता व्यक्त केली. १८ टक्के नागरिकांनी ही घटना माहीत आहे, परंतु त्याबाबत चिंता व्यक्त केली नाही. १० टक्के नागरिकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या कंपनीचे मसाले आपण वापरत नाही असे स्पष्ट करीत १० टक्के नागरिकांनी या प्रकराबाबत चिंता व्यक्त केली.