Category: मुंबई

Mumbai news

‘निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे’

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांचे आवाहन मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी काँग्रेसच्या न्यायपत्राच्या एक हजार प्रती पोस्टाने पाठवणार’!

रमेश औताडे मुंबई :मोदी सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काँग्रेसने रान पेटवले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर सत्तेत  आली तर सामान्य जनतेसाठी काय करणार आहे याची माहिती असलेली 50 पानाच्या एक हजार पुस्तिका मुंबई काँगेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने पाठवणार असल्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेल चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकाने केलेल्या मनमानी कारभारविरोधात निदर्शने करत या 50 पानी न्यायपत्राच्या  प्रती दाखवत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे..काचरू यादव संघर्ष करो हम तूम्हारे साथ हे.. अशा घोषणा दिल्या. वाढलेली महागाई , शिक्षणाचा विभागाचा झालेला फज्जा , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता ,धर्माच्या नावाने सुरू असलेला मनमानी प्रकार , पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे व काँग्रेस च्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल याचा सर्व लेखा जोखा या 50 पानी पुस्तिकेत दिला आहे. असे कचरू यादव यांनी यावेळी सांगितले. सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय  कसा होईल यासाठी भाजपा सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली जनता त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असे काचरू यादव यांनी यावेळी सांगितले.

पत्रलेखनासारख्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांना केले मतदानाचे आवाहन

नवी मुंबई : संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने 20 मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणूकीत हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदानविषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून मुलांनी मागणी केलेल्या एखाद्या गोष्टीला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेत पत्रलेखन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याव्दारे विद्यार्थ्यांनी आपले आई-बाबा यांना पत्र लिहून त्यांनी येत्या लोकसभा निवडणूकीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका शाळांप्रमाणेच  खाजगी शाळांतून हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला. अनेक शाळांनी त्याकरिता आपल्या विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र उपलब्ध करून दिली होती. ‘माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी नक्की मतदान करा’ असा आईबाबांना आग्रह करणारे हे पत्रलेखन मुलांकडून आपल्या पालकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देणारे होते. या पत्रलेखनातून मुलांमार्फत मतदार पालकांना आवाहन तर करण्यात आलेच शिवाय सध्याच्या समाज माध्यमांतून संदेश आदानप्रदानाच्या तंत्रस्नेही युगात पत्रलेखनासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या माध्यमाचा आनंदही याव्दारे विद्यार्थ्यांना घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने पालकांनी मतदान करावे असे आवाहनपत्र लिहिले व पालकांनीही या पत्रलेखन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड

 प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्लेचा मुंबई:मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचे इक्विपमेंटस् प्रदान केली आहे. यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळात ठसा उमटवला आहे. संकुलात खालील निरनिराळ्या क्रिडा प्रकारच्या  खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. जलतरण, पिकलबॉल, मल्लखांब, बुद्धिबळ, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, कराटे, तायकोंडो, व्यायामशाळा, रोलर स्केटिंग, टेबल टेनिस, झुंबा, रायफल शुटिंग ईत्यादी. प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या ७ हून अधिक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये सर्वात प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार जिंकला आहे. मल्लखांब खेळातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री गणेश देवरूखकर यांना यावर्षी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी अलीकडेच, जिम्नॅस्टिक्स ॲथलीट आध्यान देसाईची आगामी ज्युनियर एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४ साठी हाँगकाँग, चीन येथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होणार असून १० ते १२ मे २०२४ या कालावधीत होणार आहे. आध्यान हा माजी अंडर-१२ राष्ट्रीय चॅम्पियन देखील आहे आणि त्याने कोलकाता येथे नुकत्याच संपलेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत अनेक पदकेही जिंकली आहेत. हरियाणा येथील खेलो इंडियन युथ गेम्स २०२२ मध्येही त्याने भाग घेतला होता आणि सरकारी मंजूर योजनेअंतर्गत तो एक खेलो इंडिया ॲथलीट आहे. आध्यान गेल्या १० वर्षांपासून प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सराव करत आहे. त्यांचे प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव श्री मोहन अ. राणे यांच्या पाठिंब्याने ही अतुलनीय कामगिरी केली आहे. अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव मोहन अ. राणे यांनी ही बातमी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि आशियाई स्पर्धेसाठी आध्यानला शुभेच्छा दिल्या.

मुंबई वाय.एम. सी.ए.ची  मोफत उन्हाळी शिबिरे  २ मे पासून

मुंबई :  क्रीडा आणि सेवा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मुंबई वाय.एम.सी.ए.च्या वतीने २ मेपासून विविध खेळांच्या मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना २ मे पासून प्रारंभ होणार आहे. यंदा १५० वर्षे पूर्ण करणारी वाय.एम. सी.ए. ही भारतातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) असून त्याचेच निमित्त साधून त्यांच्या मुंबईतील सर्व शाखा आणि केंद्रांमधून संपूर्ण वर्षभर विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांनी म्हटले आहे. सध्याच्या युवा पिढीला मोबाईल आणि सोशिअल मीडिया पासून दूर नेवून त्यांच्यात क्रीडा प्रेम रुजविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यांच्या मुंबईतील विविध केंद्रांमध्ये २ मे पासून बास्केटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, लॉन टेनिस, रोलर स्केटिंग, कराटे, किक बॉक्सिंग,मिश्र  मार्शल आर्ट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, धनुर्विद्या, रिदमिक जिम्नॅस्टिकस, जलतरण, फुटबॉल, कुस्ती, अॅथलेटिक्स  अशा विविध खेळांच्या शिबिरांसाठी मोफत तर काही खेळांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.  या शिबिरासाठीचे प्रवेश अर्ज ३० एप्रिल पर्यंत स्वीकारण्यात येणार असून मुंबईतील वाय.एम.सी.ए. च्या कुठल्याही केंद्रात प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येतील.  या सर्व शिबिरांसाठीच्या अधिक माहिती साठी www . ymcabombay .org  या संकेत स्थळावर अथवा वाय.एम.सी.ए. हेल्पलाईन ७२०८९२८८५३  किंवा मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांच्याशी ९८९२४०२९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  या शिबिरांसह ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंना स्वयंपूर्ण आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई बाहेरील शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

मुदतपूर्व सुटकेचा मार्ग मोकळा मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोकळा केला असतानाच भाजपने गवळीच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना बहीण संबोधून महापौर बनवण्यासाठी मदत करण्याचे दिलेले आश्वासन त्याचेच निदर्शक मानले जाते. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती. २००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते. याप्रश्नी सरकारला येत्या दोन आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढीची शक्यता होती. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असे म्हटले होते. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. अरुण गवळी आमदार झाला. कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. गीता गवळीची महापालिकेत शिवसेनेशी जवळीक होती, परंतु अलीकडच्या काळात भाजपशी जवळीक वाढली होती. न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे. राजकीय वाटचाल २००४ च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अरुण गवळी ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी ९२ हजार २१० मते मिळाली. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून २००४ रोजी अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला ३१ हजार ९६४ मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांनी २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे २० हजार ८९५ आणि दहा हजार ४९३ अशी मते मिळाली होती.

६७ दशलक्ष मुले लसींपासून वंचित

रमेश औताडे मुंबई : कोविड महामारी दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नियमित लसीकरणामध्ये घट झाली असून जवळपास 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित आहेत. असे युनिसेफने सादर केलेल्या “द स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन ” या अहवालात दिसून आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जागतिक लसीकरण तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे प्रमुख  डॉ.जीनेंद्र जैन यांनी दिली. देशात गोवरच्या प्रकरणांमध्येही चिंताजनक वाढ होत आहे. 2022 मध्ये, अंदाजे 11 लाख मुलांनी भारतातील गोवर लसीचा पहिला डोस चुकवला, ज्यामुळे गोवर लसीकरणात सर्वात जास्त अंतर असलेल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताची समावेश झाला आहे असे जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस केंद्रांचा अहवाल रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) अहवालात आढळून आले असे लहान मुलांचे तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. 2022 मध्ये 40,967 प्रकरणांची नोंद झाली असून 37 देशांपैकी भारत हा एक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. रोगप्रतिकारशक्ती विषयी बोलताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की , लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात 26 रोगांसाठी लस आहेत परंतु सामान्यतः फक्त 10-12 रोगांवर लसीकरण केले जाते. पौगंडावस्था, गर्भवती महिला आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांसह सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे आणि इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि हिपॅटायटीस यांसारख्या विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यात मदत करते असे बालरोग तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ बादशाह खान यांनी सांगितले. डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला (पेयुसिस) विरुद्ध लढण्यासाठी DTaP लस महत्त्वपूर्ण आहे, तर एमएमआर लस गोवर, गालगुंड आणि रुबेला विरुद्ध प्रभावी आहे. मेनिंजायटीस मेनिन्गोकोकल लसीने, व्हेरिसेला लसीमुळे कांजण्या, आयपीव्ही लसीने पोलिओ आणि न्यूमोकोकल लसीद्वारे न्यूमोनिया टाळता येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकार एचपीव्ही लस देखील पुरवते असे डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. लसीकरणाचे दर देशभरात कमी होत आहेत मात्र  लसीकरणाबाबत जागरुकता नसल्यामुळे लहान मुले आणि प्रौढावर लसीकरणाचा परिणाम होत आहे. गालगुंड आणि एमएमआर लस वगळल्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. न्यूमोनियाची लस न घेतल्याने होणारी गुंतागुंतीची प्रकरणे वाढत आहेत. सरकार मोफत लस देत असूनही, अनेक लोक अजूनही लसीकरण करत नाहीत आणि त्यामुळे आरोग्यासंबंधी गुंतागुंत वाढते . कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी किंवा त्यादरम्यान जन्माला आलेली लसीकरण न झालेली मुले आता विविध लस-प्रतिबंधात्मक आजारांनी ग्रस्त आहेत. असे डॉ बादशाह खान यांनी सांगितले. पर्यायी लस जसे की न्यूमोकोकल लस, फ्लू लस, कांजिण्यांसाठी व्हॅरिसेला लस, हिपॅटायटीस ए लस प्रौढांना द्यावी. फ्लू किंवा इन्फ्लूएंझा लस दरवर्षी सर्व वयोगटातील लोकांनी विशेषतः मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी घ्यावी. न्यूमोकोकल लस देखील उच्च-जोखीम असलेल्या लोकसंख्येस किडनी, आणि हृदयरोग, केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांकरिका फायदेशीर ठरते. इम्युनोसप्रेसेंट असलेल्या लोकांमध्ये न्यूमोनिया घातक ठरू शकतो म्हणून एखाद्या समुदायात एखाद्‌या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमांचं आयोजन केले आहे. असे  डॉ जिनेंद्र जैन यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले

२४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा मुंबई : उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. येत्या २ मे पासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार असून त्यासाठीची नावनोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्याची लिंक २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यान्वित केली जाईल. तसेच, प्रशिक्षणाचे दुसरे सत्र २३ मे पासून सुरु होईल. जलतरण हा क्रीडा प्रकार असण्यासोबतच एक उत्तम व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकरांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे १० तरण तलाव कार्यान्वित आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने इच्छुकांना या क्रीडा प्रकारापासून लांब राहावे लागते. पोहण्याची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यात महानगरपालिकेने प्रशिक्षण वर्गांची संधी उपलब्ध करून दिली आहे. हे प्रशिक्षणवर्ग महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आले आहेत. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी ठेवण्यात आली असून पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार १०० रूपये, तर १६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये दिले जाणार आहे. या विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीने २४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठीच्या जलतरण तलावांची यादी महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम) जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व) सरदार वल्लभभाई पटेल ऑलिम्पिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,मालाड (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा

‘आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या’

महापालिका आयुक्त  डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून आचारसंहिता पालन केली जात असल्याबद्दल विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतच्या आढावा बैठकीत दिले. आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचार फलक यांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डींग, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खाजगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वत: पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटी बसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसार माध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षाव्दारे नागरिकांना मतदानाविषयी, त्यांचा मतदार क्रमांक व मतदान केंद्र आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योगसमुह याठिकाणी भेटी देऊन मतदान करणेविषयी जनजागृती करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. लोकसभा निवडणूकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, रूग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध  माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप अशा समाजमाध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे सूचित करण्यात आले. प्रचार, प्रसिध्दीप्रमाणेच मतदान केंद्रांची सर्व आवश्यक सुविधांसह सिध्दता करून ठेवण्याचेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. ही केंद्रे मा.निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळमजल्यावर असावीत असे सूचित करीत या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था करणेबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच या निवडणूकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांचे विभागप्रमुख व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना आढावा बैठकीत दिले.

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.