मुंबई पोर्टमधील गोदी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न
मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील नोकरीत असणारे कर्मचारी व सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे ४८ वे कौटुंबिक स्नेहसंमेलन २६ जानेवारीला शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सर्वप्रथम ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या मुंबई बंदरात पूर्वी ४४ हजर कामगार होते, आता २७०० कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील मुंबई बंदरातील गोदी कामगारांनी ६५ दशलक्ष टन मालाची चढ उतार केली आहे. गोदी कामगारांनी कमी कामगारांमध्ये जास्त उत्पादकता काढली आहे. बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढीचा वेतन करार झाला आहे. या वेतनकराराची प्रत्यक्षात वाढ १ फेब्रुवारी २०२५ पासूनच्या पगार व पेन्शनमध्ये मिळणार आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, मुंबई बंदर प्राधिकरण आऊट डोअर डॉक्स स्टाफ पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष अंकुश कांबळे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन फिलोंथरोपी फाउंडेशनचे पदाधिकारी व उत्कृष्ट निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, सेवानिवृत्तीबद्दल बापू घाडीगावकर व दुबे यांचा सत्कार करण्यात आला. गोदी विभागातील अधिकारी व युनियन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “नियम व अटी लागू करा” या लोकप्रिय नाटकाचा २८२ वा प्रयोग दाखविण्यात आला. स्नेहसंम्मेलनासाठी आलेल्या गोदी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामुळे सभागृह भरगच्च भरले होते.
