अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनचे आंदोलन
रमेश औताडे मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी केला असून या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई १ सप्टेंबर पासून सुरू केली जात असल्याचा दावा असोसिएशनचे निशिकांत धवन यांनी केला. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी मैदानात आक्रमक झाले होते. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. सरकारने या प्रकरणी गंभीरपणे निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला.
सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप कायद्यात नको
रमेश औताडे मुंबई : नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक निवड, विवाह, श्रद्धा आणि गोपनीयतेच्या अधिकारांमध्ये शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप नवीन सुधारित कायद्यामुळे वाढू शकतो, असा आरोप संयुक्त नागरी समाज समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रेझर मास्करेन्हास, संध्या गोखले, ॲड. इरफान इंजिनिअर, ॲड. लारा जेसानी,समन्वयक शाकीर भाई शेख, सलीम खान उपस्थित होते. इरफान इंजिनिअर यांनी कायद्याच्या काही तरतुदींवर आक्षेप घेतला. धर्मांतराच्या आरोपात आरोपीवरच स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी येत असल्यास, ती फौजदारी न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. फादर फ्रेझर मास्करेन्हास यांनी शिक्षण आणि सामाजिक सेवेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली. संध्या गोखले यांनी कायद्याकडे व्यापक घटनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत सहभागी नागरी समाजाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ मागे घ्यावा किंवा त्यातील घटनात्मकदृष्ट्या आक्षेपार्ह तरतुदींचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.
दाक्षिणात्य चित्रपटासाठी ‘समर्थ’ ला चित्रपटगृह नाकारले ; रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप
मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले.…
मयंक आणि प्रतीतीने मारली बाजी
एशियन ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा भारताचा डबल धमाका मुंबई : अंधेरी येथील आयटीसी मराठा शेरेटन येथे झालेल्या एशियन ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी यश साध्य केले. मयंक चक्रवर्ती आणि प्रतीती बोरदोलोई यांनी अनुक्रमे खुल्या (ओपन) आणि मुलींच्या गटातील विजेतेपदे पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अव्वल मानांकित मयंकने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नऊ फेऱ्यांच्या ओपन स्पर्धेत ७.५ गुणांसह प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकले. रशियाच्या आर्टेम पिंगिनने ७ गुणांसह रौप्यपदक मिळवले, भारताच्या दक्ष गोयलने ६.५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. प्रतीतीने नऊ फेऱ्यांत ७.५ गुण मिळवून मुलींच्या गटात बाजी मारली आणि भारताचे दुहेरी सुवर्णयश पूर्ण केले. कझाकस्तानच्या मारिया खोल्याव्हकोने ७ गुणांसह (विजेत्यापेक्षा अर्धा गुण कमी) रौप्यपदक तर भारताच्या निवेदिता व्ही. सी. हिने ६.५ गुणांसह कांस्यपदक मिळवले. पदकांशिवाय, ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरली; कारण त्यांनी प्रतिष्ठित ‘फिडे’ किताब आणि ‘नॉर्म्स’ मिळवले. ‘ओपन’ गटाचा विजेता मयंक चक्रवर्ती – जो आधीच ‘जीएम-इलेक्ट’ (ग्रँडमास्टर होण्याच्या मार्गावर) आहे – याने विजेतेपदाच्या कामगिरीद्वारे आणखी एक ‘ग्रँडमास्टर नॉर्म’ मिळवला. कांस्यपदक विजेता दक्ष गोयल याने ‘फिडे मास्टर’ किताब तसेच ‘इंटरनॅशनल मास्टर नॉर्म’ मिळवला. मुलींच्या गटातील विजेती प्रतीती बोरदोलोई हिच्यासाठी ही स्पर्धा दुहेरी आनंदाची ठरली. सुवर्णपदकाव्यतिरिक्त, तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ किताब आणि ‘वुमन ग्रँडमास्टर नॉर्म’ देखील मिळवला. रौप्यपदक विजेती कझाकस्तानची मारिया खोल्याव्हको हिने ‘डब्ल्यूआयएम’ नॉर्म मिळवला, तर कांस्यपदक विजेती भारताची निवेदिता व्ही. सी. हिनेही ‘डब्ल्यूआयएम’ नॉर्म मिळवला. एकूण पदक तालिकेत भारताचे वर्चस्व दिसून आले; यजमान देशाने ‘क्लासिकल’ स्पर्धेतील सहापैकी चार पदके – दोन सुवर्ण आणि दोन कांस्य – आपल्या नावे केली. रशिया आणि कझाकस्तान यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकून उर्वरित पदके विभागून घेतली. एका शानदार समारोप सोहळ्यात आशियाई बुद्धिबळ महासंघाचे सचिव हिशाम अल-ताहेर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले आणि स्पर्धेची योग्य सांगता झाली. ‘आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा २०२६’ चे आयोजन ‘ऑल इंडिया चेस फेडरेशन’ आणि ‘आशियाई बुद्धिबळ महासंघ’ यांच्या वतीने ‘महाराष्ट्र बुद्धिबळ संघटने’ने केले होते. 0000
आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ हजार विद्यार्थ्यांची ‘आनंद चित्रकथा’
ठाणे : २६ ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ स्पर्धा संपन्न झाली याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.…
मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व व्हीलचेअर वाटप
मिरा-भाईंदर : माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चतर्फे निःशुल्क आरोग्य, नेत्र व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने ४०…
रेतीबंदर विसर्जन घाटावरील स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण व मानधन द्या – नजीब मुल्ला
अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी गणेशमूर्ती व देवीमूर्ती विसर्जनाची सेवा करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण, मानधन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व ठाणे महापालिकेचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याबाबत २४ ऑगस्टला आयुक्तांना दिलेल्या निवेदनात मुल्ला यांनी म्हटले आहे की, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा-मुंब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषतः रेतीबंदर विसर्जन घाटावर गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक भूमिपुत्र निःशुल्कपणे विसर्जनाची सेवा बजावत आहेत. गणेशमूर्ती व देवीमूर्तींचे विसर्जन करताना अनेकदा मोठ्या व वजनदार मूर्ती पाण्यात नेण्याचे काम करावे लागते. त्यामुळे या युवकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षा साधने, बचाव पथक, वैद्यकीय सुविधा किंवा विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने दुर्घटना घडल्यास संबंधित युवकांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्षे निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना अपघाती विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य, लाईफ जॅकेट, वैद्यकीय सुविधा तसेच पिण्याचे पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या युवकांनी बजावलेल्या सेवेला योग्य मोबदला म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना योग्य मानधन देण्यात यावे, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देण्यात यावे, अशीही मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेतीबंदर तसेच इतर विसर्जन घाटांवरील स्थानिक भूमिपुत्रांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांची सेवा ही केवळ परंपरा नसून ठाणे शहराच्या गणेशोत्सवातील महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ
अशोक गायकवाड मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मंगळवारी राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली. लोकभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. सुनील शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली असून ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवशीपर्यंत असेल. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे, महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे अन्य सदस्य तसेच मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी न्या. सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला. न्यायमूर्ती (निवृत्त) सुनील शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी १९८० साली पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केले आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली. न्यायिक सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कोल्हापूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रजिस्ट्रार (प्रशासन), महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तन (ठाणे) येथे सहसंचालक, तसेच नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. मार्च २०११ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि २०१३ मध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे (एमएसबीसीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. ०००००००००००
ऊसतोडणी मजुरीवाढीचा त्रिपक्षीय करार न झाल्यास कोयता हातात घेणार नाही, गाव सोडणार नाही – डॉ डी एल कराड
अनिल ठाणेकर ठाणे-मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे ऊस तोडणी वाहनधारक, मुकादम व ऊस तोडणी मजुरांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी मजुरी वाढी चा त्रिपक्षीय करार न झाल्यास संप…
