सात महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा
कल्याण : सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या मुलाने प्रभागातील जुनी डोंबिवली भागात एक बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला पालिकेच्या बांधकाम परवानग्या नाहीत. पालिकेच्या ह प्रभागाने ही इमारत अनधिकृत घोषित केली आहे. रक्ताच्या नात्यामधील कोणीही बेकायदा बांधकाम केले असेल तर संबंधित नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते. त्यामुळे नगरसेवक म्हात्रे यांच्या मुलाने केलेल्या बेकायदा बांधकामांशी रक्ताच्या नात्याने रमेश म्हात्रेचा थेट संबंध येत आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करा, अशी तक्रार तक्रारदार कल्पेश जोशी यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापूर्वी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकरी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना देऊनही या गंभीर तक्रारीविषयी शासन दखल घेत नाही. यामागे राजकीय दबाव हेच मुख्य कारण आहे, असे तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सत्यप्रतिज्ञा पत्रावर मी, माझ्यावरील अवलंबित्व (पत्नी, मुले) यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही असे लिहून दिले आहे. अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक राहण्यास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे, असे म्हटले आहे. रमेश म्हात्रेवरील अवलिंबत्व असलेल्या त्यांच्या मुलाने अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी तक्रारदाराची मागणी आहे.
या मागणीसाठी पालिका आयुक्त ते ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी रमेश म्हात्रेच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्या मुलाच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. तसेच म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. राजकीय दबावामुळे आपल्या अर्जावर शासन, पालिकास्तरावर कारवाई होत नाही. याप्रकरणात शासन, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घालून म्हात्रे यांचे नगरसेवक पद करण्यासाठी आणि आपणास न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *