Category: मुंबई

Mumbai news

तरुणांचा असंतोष हा बेरोजगारी, अन्याय, दडपशाही आणि संस्थांच्या ऱ्हासातून- नेहा बोरा

अनिल ठाणेकर मुंबई : तरुणांचा असंतोष हा केवळ एखाद्या दिवसाच्या आंदोलनातून निर्माण झालेला नसून, बेरोजगारी, अन्याय, दडपशाही, संस्थांचा ऱ्हास आणि दीर्घकाळ साचत गेलेल्या अस्वस्थतेचा परिणाम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा…

रेतीबंदर विसर्जन घाटावरील स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण व मानधन द्या – नजीब मुल्ला

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा-ब्रा परिसरातील विविध विसर्जन घाटांवर दरवर्षी गणेशमूर्ती व देवीमूर्ती विसर्जनाची सेवा करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना विमा संरक्षण, मानधन तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी…

साप दिसला की मारू नका!

 विद्यार्थ्यांना सर्पसंवर्धनाचा संदेश ठाणे-नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भरणे येथे विद्यार्थ्यांसाठी ‘साप, सापांचे जीवन आणि सापांविषयीच्या अंधश्रद्धा’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते .यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी…

 माळ मठाचा ताबा घेण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा डाव

स्वयंघोषित ट्रस्ट स्थापन केल्याने खळबळ   वारकरी संप्रदायात तीव्र संताप मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने) तालुक्यातील  हजारो भाविक व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन भृगंऋषी माळ मठ, शिरोशी (माळ मठ) वर ताबा मिळविण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांनी घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळ मठाचे योगी कानिफनाथ गुरु जगन्नाथ महाराज यांना काही दिवसांपूर्वीच समाधी झाली. त्यांच्या पश्चात मठाची गादी सध्या मठाधिपती योगी ज्ञाननाथ गुरु कानिफनाथ महाराज सांभाळत आहेत. महाराजांना समाधी होताच याची संधी साधून काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी घाईघाईत “गोरक्षनाथ मठ शिरोशी (माळ मठ) ट्रस्ट” नावाने स्वयंघोषित ट्रस्टची नोंदणी केली आहे. हा मठ केवळ शिरोशी पुरता मर्यादित नसून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल, अलिबाग येथील हजारो वारकरी, नाथ संप्रदायाचे साधक व भाविक येथे दर्शनासाठी येतात. या स्वयंघोषित ट्रस्टला मठाधिपती, मठाचे सेवेकरी, ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने तीव्र विरोध केला आहे. हा मठ सार्वजनिक असून तो कोणत्याही एका ट्रस्टच्या मालकीचा होऊ शकत नाही. हा प्रकार म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर घाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरातन माळ मठाचे पावित्र्य, परंपरा आणि मालमत्ता यांचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. ००००

– रौप्य महोत्सवी वर्षात २५ जोडपी करणार दर्याची पूजा

चेंदणी कोळीवाडा उत्सवासाठी सज्ज ठाणे : रौप्य महोत्सवी वर्षात पंचवीस जोडप्यांकडून होणारी दर्याची पूजा हे चेंदणी कोळीवाड्यात यंदाच्या वर्षी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच तर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या पूजेचे वैशिष्ठ असणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाजत गाजत दर्या किनारी जाऊन ज्याच्यामुळे आपली उपजीविका होते त्या दर्याची पूजा करणे हे कुठल्याही कोळीवाड्यात हमखास पहायला मिळते. ठाणे शहराला समुद्र किनारा नसला तरी खाडीकिनारा आहे. त्यामुळे खाडी किनारी जाऊन तिथे विधिवत पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा चेंदणी कोळीवाड्यात अनेक वर्षापासून होती पण नंतरच्या काळात सामुदायिकरित्या पूजा करणे बंद झाले होते. त्याची खंत राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार विजेते सुभाष बाळकृष्ण कोळी यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत चेंदणी कोळीवाड्यातील इतरांशी संवाद साधत नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या नारळ पौर्णिमेचा उत्सव तत्कालीन राज्यसभेचे खासदार आणि पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या हस्ते नारळाची पूजा करून वाजत गाजत दर्याला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सुभाष कोळींच्या पश्चात त्यांचे चिरंजीव, चेदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे विद्यमान पदाधिकारी विक्रांत कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या उत्सवाची जबाबदारी सांभाळली आहे. यंदाच्या वर्षी उत्सवाचे पंचविसावे वर्ष असल्याने कोळीवाड्यातील “मान आमच्या ठाण्याचा पहिला” ही एकविरा मातेच्या चैत्र नवरात्री पालखी उत्सवासाठी गाजलेल्या गीताचे दिवंगत शाहीर रमेश नाखवा यांचे चिरंजीव अभिनय नाखवा यांनी लिहिलेला आज सन नारळी पुनवेचा हे गाणे स्थानिक कलाकारांनी एकत्रित येऊन तयार केले आहे. यंदा पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरात नारळाची पूजा करण्यात येणार आहे.त्यानंतर या नारळाची सवाद्य मिरवणूक काढून दत्त मंदिर, सिडको बस स्टॉप, ग. मो. कोळी मार्ग, नारायणराव कोळी चौकातून थेट चेंदणी कोळीवाडा विसर्जन जेटीवर येईल. तिथे खाडीला नारळ वाढवण्यात येईल.

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राज्यभर आंदोलन

रमेश औताडे मुंबई: आंबेडकरी आंदोलनाचे तसेच अनुसूचित जाती, जमाती,भटके विमुक्त समाजातील कर्मचारी वर्गाचे केंद्र बिंदू असलेल्या कास्ट्राईब कार्यालयाला नागपूर महानगर पालिकेतील अधिकारी यांनी नुकतेच सील लावून आंबेडकरी आंदोलन संपवण्याचा घाट घातला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा संपूर्ण राज्यभरात २८ ऑगस्ट २०२६ ला राज्यातील सर्व  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. या राज्यव्यापी आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. मुंबईत आझाद मैदानावर  आंदोलन करून सरकारला या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्यासाठी साकडे घालणार आहे असे बागडे यांनी सांगितले. ०००० महिलेचा श्वसनमार्ग मोकळा झाल्याने श्वास झाला मुक्त मुंबई : फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या ५७ वर्षीय महिलेचा श्वसनमार्ग ट्यूमरच्या वेगाने झालेल्या वाढीमुळे जवळपास पूर्णपणे बंद झाला होता. किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील डॉक्टरांनी अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची थेराप्यूटिक ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत रुग्णाचा श्वास पुन्हा सुरळीत केला. डॉ. मानस मेंगार आणि त्यांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली. ट्यूमर श्वासनलिकेच्या मधल्या भागात आणि दोन्ही मुख्य श्वसनमार्गांपर्यंत पसरल्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली होती. ट्यूमरमध्ये रक्तवाहिन्यांचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा तसेच फिस्टुलाचाही मोठा धोका होता. या यशस्वी प्रक्रियेनंतर रुग्णाला ऑपरेशन टेबलवरच व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले आणि प्रकृती स्थिर झाल्याने शस्त्रक्रियेनंतर चौथे दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.उपचाराच्या साडेपाच महिन्यांनंतरही रुग्णाची प्रकृती उत्तम असून ती स्वतःची दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करत आहे.

फॉरेन्सिक विज्ञान आणि नवीन फौजदारी कायद्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लाला लजपतराय विधी महाविद्यालयाचा उपक्रम मुंबई, २२ ऑगस्ट २०२६ : महालक्ष्मी येथील लाला लजपतराय कॉलेज ऑफ लॉ यांच्यावतीने लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सहकार्याने “भारतातील नवीन फौजदारी न्यायव्यवस्था : बी. एन. एस., बी. एन. एस. एस. आणि बी. एस. ए., २०२३ – फौजदारी तपास व खटल्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे आणि वैज्ञानिक पद्धतींचे एकत्रीकरण” या विषयावर महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विवा कॉलेज ऑफ लॉ येथील विद्यार्थी व प्राध्यापकांनीही सहभाग नोंदवल्याने या उपक्रमाला आंतर-संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले. या कार्यशाळेस नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एन.एफ. एस. यू.) येथील डिपार्टमेंट ऑफ लॉ, फॉरेन्सिक जस्टिस अँड पॉलिसी स्टडीजच्या डॉ. नवतिका सिंह नौटियाल यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी. एन. एस. एस) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (बी. एस. ए.), २०२३ या नवीन फौजदारी कायद्यांमुळे झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकला. विशेषतः फौजदारी तपास आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे, वैज्ञानिक तपासपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना बदलत्या फौजदारी कायद्यांची तसेच आधुनिक न्यायव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक तपास आणि फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वाची माहिती मिळाली. कार्यशाळेनंतर आयोजित संवादात्मक प्रश्नोत्तरे सत्रात विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकाशी थेट संवाद साधत फॉरेन्सिक पुरावे, वैज्ञानिक तपास आणि फौजदारी खटल्यांशी संबंधित विविध व्यावहारिक बाबी समजून घेतल्या. लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांच्या सहकार्याने आणि विवा कॉलेज ऑफ लॉच्या सहभागामुळे या उपक्रमाला शैक्षणिक देवाणघेवाण, आंतरविषयक अध्ययन आणि ज्ञानविनिमयाचे प्रभावी व्यासपीठ प्राप्त झाले. विविध संस्थांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सहभागामुळे कार्यशाळेची शैक्षणिक उपयुक्तता अधिक वृद्धिंगत झाली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषण, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून श्री. लाला लजपतराय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सत्कार व परिचय करून दिल्यानंतर मुख्य शैक्षणिक सत्रास सुरुवात झाली. कार्यक्रमाचा समारोप औपचारिक आभार प्रदर्शनाने करण्यात आला. कार्यशाळेचे आयोजन डॉ. केवल उके, प्राचार्य, लाला लजपतराय कॉलेज ऑफ लॉ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. असि. प्रो. दीपक पवार यांनी प्राध्यापक प्रभारी म्हणून कार्यक्रमाचे समन्वयन केले. या कार्यशाळेच्या माध्यमातून कायदेविषयक शिक्षण, फॉरेन्सिक विज्ञान आणि समकालीन फौजदारी न्यायव्यवस्था यांचा प्रभावी संगम घडवून आणण्यात आला. नवीन फौजदारी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर विकसित होत असलेल्या तपास, वैज्ञानिक पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या बदलत्या चौकटीची विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती या उपक्रमातून मिळाली. 0000

 नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर जोरदार टीका हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण काही दिवसापासून सुरु आहे. राज्यातील महायुती सरकारकडून विकासाच्या गप्पा केल्या जातात. परंतु, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेतल्यावर आपल्याकडून काही होणार नसल्याने मुख्यमंत्र्यांना भेटा, असा सल्ला दिला जातो. मुख्यमंत्र्यांना या उपोषणाची दखल घेण्यास वेळ नाही. अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. येथे ईदगाह मैदानावर विविध मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सपकाळ यांनी, आदिवासी विभागात भ्रष्टाचार बोकाळला असून विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप केला. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु आहे. परंतु, महायुती सरकारच्या एकाही मंत्र्याला त्यांची दखल घ्यावी, असे वाटले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना काही झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे राहुल गांधी यांना आदिवासींच्या प्रश्नांची अद्ययावत माहिती नसल्याचे सांगतात. परंतु, तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात, त्याची माहिती तरी तुम्हाला आहे का, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनी गरोदर आहे की नाही, याची तपासणी केली जात असल्याचा प्रश्न आहे. मंत्री त्यावर उत्तर न देता दुसऱ्याच प्रश्नावर बोलत आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला. गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी विद्यार्थी संघटनेचे काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांशी सपकाळ यांनी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर नाशिक केंद्रबिंदू मानत या ठिकाणी राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येत एक सप्टेंबर रोजी आंदोलन करणार आहेत. आंदोलकांच्या पाठीशी काँग्रेस कायम राहील, असे आश्वासन सपकाळ यांनी दिले. 0000

दिव्यात दशामाता विसर्जनाचा भव्य सोहळा

 ७० मूर्तींचे विधीवत विसर्जन दिवा: गुजराती विकास मंडळ, दिवाच्या अध्यक्षा तसेच मुंबई मेघवाळ पंचायत, दिवा विभाग क्रमांक ७० च्या महामंत्री मीनूबेन गोहिल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व. अशोक सोलंकी यांच्या प्रेरणेतून गणेशनगर तलाव, आगासन रोड, दिवा येथे दशामाता माताजींच्या विसर्जनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. दशामाता माताजींचे दर्शन आणि विसर्जनासाठी दिव्यासह डोंबिवली परिसरातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी अंदाजे ७० दशामाता माताजींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांसाठी चहा, पाणी, गरबा तसेच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुजराती विकास मंडळाच्या सर्व कमिटी सदस्यांनी रात्रभर उपस्थित राहून भाविकांची सेवा केली आणि संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था सुरळीत ठेवली. धीरज वालेरा आणि अमृत खिमोरिया यांनी संपूर्ण रात्र मूर्ती विसर्जनाच्या कार्यात तसेच भाविकांच्या सेवेत योगदान दिले. विशाल सोलंकी, ध्रुव पडाया, नयन परमार, प्रशांत वालेरा, मेहुल वालेरा, पिनाक वोरा, अजित सिंह, सुरेश मोहित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रात्रभर सेवा बजावली. यावेळी काही भाविकांनी आयोजकांच्या व्यवस्थेचे कौतुक केले. “आम्ही यापूर्वी खर्डी गाव येथे विसर्जनासाठी जाणार होतो; मात्र येथे गुजराती विकास मंडळाचे बॅनर पाहिल्यानंतर येथेच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. येथे अतिशय सुंदर आयोजन आणि व्यवस्था करण्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश म्हात्रे (TMC), सचिन (TMC) आणि शंभूराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच TMCच्या संपूर्ण टीमने सुरक्षा, स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी सहकार्य केले. दिवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनीही संपूर्ण रात्र सुरक्षा व्यवस्था राखत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. दशामाता विसर्जनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजराती विकास मंडळ, दिवाचे सर्व सदस्य, सेवाभावी कार्यकर्ते, भाविक भक्त आणि सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. 0000

सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न 

मुंबई :  सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ चारकोप कांदिवली या  सामाजिक संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच सिंधुदुर्ग भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  गेली ३२ वर्षे…