अनिल ठाणेकर
ठाणे, तलावांचे शहर आता काँक्रीटचे शहर होऊ लागले असून पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे कावेसर तलावाचे काँक्रीटीकरण होऊ देणार नाही, असे आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले. हिरानंदानी परीसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कावेसर तलावाला काँक्रीटीकरणापासून रोखण्याची मागणी केली. याबाबत बोलताना  केळकर यांनी नागरिकांना आश्वासित केले. एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता अतिक्रमणांमुळे तलाव गायब झाले आहेत. कावेसर तलाव परिसर पर्यावरणपूरक असून येथे विविध जातीचे पक्षी आणि जैव साखळी अस्तित्वात आहे. काँक्रीटीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक अवस्था टिकून राहील यासाठी प्रसंगी आमदार निधी देईन, असे केळकर यांनी सांगितले.
भाजपच्या खोपट येथील १११व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या. ठाण्यात सुरू असलेला एसआरए प्रकल्प कौतुकास्पद असला तरी या प्रकल्पाच्या विकासकांच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. याबाबत एसआरए अधिकाऱ्यांशी बोलून विकासकावर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे  केळकर यांनी माध्यमांना सांगितले. या जनसंवाद कार्यक्रमाला नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, कैलास म्हात्रे उपस्थित होते.
अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे दुर्घटना घडत आहेत.   त्यामुळे खुर्च्या रिकाम्या झाल्या तरी चालेल, पण दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवा, अशी मागणी केळकर यांनी केली. पालिका प्रशासनाच्या कारभारावर देखील त्यांनी आसूड ओढले. प्रशासनाकडे नियोजन नसल्याने शहराचा बट्ट्याबोळ होत आहे. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी आणि नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र ही कामे वेळेवर न झाल्याने दुर्घटना घडतात, जीव जातात. आता पाऊस नाही, तरी देखील छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावर पडून असल्याबाबत  केळकर यांनी नाराजी व्यक्त केली.
हेल्मेट नाही आणि नेमप्लेट कायद्याप्रमाणे दिसत नाही म्हणून राबोडी परिसरात वाहतूक पोलिसांने दोन दंडात्मक कारवाया केल्या, अशी संबंधित वाहनचालकाने तक्रार केली. ही कारवाई योग्यच आहे, पण कारवाई करणारा तो वाहतूक पोलिस विनाहेल्मेट आणि नेमप्लेट वाहन चालवत असल्याचे आढळून आले आहे, त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न  केळकर यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *