Category: रायगड

raigad news and updates

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी पनवेल: पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गट नोंदणी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी गटनेते नितीन पाटील यांच्यासोबत महायुतीचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे.याआधी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या संयुक्त बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली होती. आज झालेल्या गट नोंदणी प्रक्रियेमुळे नितीन पाटील यांची गटनेतेपदी शासनाकडे अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महायुतीची गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया येत्या १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

 पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा

पं.दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेच्या नुतनीकरणाचे अर्ज सादर करा तेजस्विनी गालांडे यांचे आवाहन अशोक गायकवाड अलिबाग: रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२६ करीता नुतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचे नुतनीकरणाचे अर्ज ३१ जानेवारीपर्यंत http://swayam.mahaonline.gov.in/, या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे. ३१ जानेवारी पर्यंत नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहात गुणवत्ता यादीव्दारे निवड झालेली आहे व त्यांना वसतिगृहाकडून आवेदन पत्रे निर्गमित झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच प्रवेश घ्यावा, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंम योजनेत हस्तांतर करण्यात येणार नाहीत.

माथेरान वन समितीच्या कार्यकारिणीमध्ये कुणाची वर्णी लागणार?

माथेरान वन समितीच्या कार्यकारिणीमध्ये कुणाची वर्णी लागणार? मुकुंद रांजाणे माथेरान : पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वनविभाग माथेरान यांच्या वन समितीची निवड नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाकडून दर पाच वर्षांनी करण्यात येते. परंतु नगरपरिषदेच्या निवडणुकीला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी गेल्यामुळे ह्या समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. वनसमितीला वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असते. माथेरान मधील जवळपास अधिक क्षेत्र हे वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी खर्च करण्यासाठी ही समिती सहकार्य करीत असते. नुकताच नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे.त्यामुळे वनसमितीची नव्याने निवड व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली असून अनेकजण ह्या समितीवर काम करण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. मागील काळात ह्या समितीने आपल्या परीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नव्याने ह्या समितीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या मंडळींना इथले पर्यावरण त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिक मुक्त माथेरान असावे,त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अभिप्रेत असणारे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी मेहनत करणाऱ्या सदस्यांची आवश्यकता असून सत्ताधारी गटाने सुध्दा ह्या समितीच्या कार्यकारिणी वरील सर्वच सदस्यांची निवड करताना जे खरोखरच आत्मीयतेने कामे करू शकतात अशांना संधी उपलब्ध करुन दिल्यास माथेरान हे स्वच्छ, हरित आणि पर्यटन वाढीस मदत होईल असेही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळविण्याचा अजब प्रकार

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पळविण्याचा अजब प्रकार अर्ज मागे घेण्याची ऑफर आणि तहसील कार्यालयाबाहेर तणावग्रस्त परीस्थिती राज भंडारी पनवेल : राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका चांगल्याच रंगात आल्या असताना आज मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असतानाच पनवेलमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला. तालुक्यातील आदई पंचायत समिती गणातून भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार विलास फडके आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवार अनिता डांगरकर हे दोन उमेदवार मैत्रीपूर्ण लढत असतानाच शिवसेनेच्या उमेदवार अनिता डांगरकर यांना विरोधकांकडून १५ लाख रुपयांचे अमिष देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात आल्याचे कारण देत तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी पोलिसांशी देखील हुज्जत घालण्याचा प्रकार करण्यात आला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणले. काही क्षणातच महाविकास आघाडीचे सर्व नेते देखील याठिकाणी हजर झाले. नितीन ठाकरे यांनी नेत्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याबाबत मध्यस्थी केली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मैत्रीपूर्ण लढत न लढण्याचा निर्णय घेत शिवसेना उबाठाच्या अनिता डांगरकर यांचा अर्ज महाविकास आघाडीच्यावातीने मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम उद्भवणार नसल्याचे देखील सांगण्यात आले. त्यामुळे आदई पंचायत समिती गणातून आता थेट लढत ही शेकापचे अधिकृत उमेदवार विलास फडके आणि भाजपचे भूपेंद्र पाटील यांच्यात होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न अशोक गायकवाड अलिबाग : २६ जानेवारी  रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सभारंभ असून भारताची राज्यघटना अंमलात आल्याने पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. हजारो देशभक्तांच्या बलिदानातून या दिवसाची प्राप्ती झालेली असल्याने हा आपल्या देशाचा सुवर्ण दिन आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने कारागृहातील दाखल बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची तसेच प्रजासत्ताक दिनाची जाणीव व्हावी तसेच कारागृहातील बंदी सुध्दा या देशाचे नागरिक आहेत त्यांना देशाविषयी आपुलकी वाटावी व स्वत:चा आत्मविश्वास वाढावा याकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व देशभक्तीपर निबंधस्पर्धा सोमवारी विविध विशेष स्पर्धा संपन्न झाल्या. या विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले तसेच शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) महारुद्र नाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बंद्यांचे भावी जीवनात शिक्षणाचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच बंद्यांना कारागृहात दाखल असताना तसेच कारागृहातून सुटून बाहेर पडल्यावर पुढील शिक्षण कसे प्राप्त करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रथम कारागृहातील सर्व बंद्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बंदी कारागृहात दाखल असताना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विभाग यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होवून प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांनी या प्रशिक्षणांत सहभाग घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होवून त्यांना रोजगार उपलब्ध होईल तसेच स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून त्यांचा उदर निर्वाह करु शकतात असे सांगून बंदी पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त बंद्यांनी हे प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता अधीक्षक.अलिबाग जिल्हा कारागृह,वर्ग-२, विशाल बाळासाहेब बांदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, श्रीवर्धन मंगेश डफळे, व उपाध्यक्ष, प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग, डॉ.मिलींद पाटील, प्रतिनिधी, प्रयास सामाजिक संस्था,मुंबई ॲड.निलेश मोहिते, प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे प्रशिक्षक प्रांजली, अमोल माळी, सतिश मोडखरकर, प्रचिती भगत, हर्षदा दांडेकर तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर महादेव वारगे, तु.अ.श्रेणी-२, निशिगंधा माळी, वैद्यकीय अधिकारी, रामहरी कुटे, सुभेदार व देवलु केरबा रांजड, सुभेदार व तसेच अविनाश जाधव, गजानन खवळे,नितीन भोईर, का.शिपाई तसेच भारती शेवाळे, महिला शिपाई उपस्थित होते.

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार धनंजय जाधव यांचा सन्मान अशोक गायकवाड रायगड- कर्जत: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी व मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (१८९ कर्जत) म्हणून तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. युवक, महिला व दिव्यांग नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित मुकुंद रांजणे माथेरान : माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याबाबत शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडत असतात. याकामी केंद्रप्रमुख शिक्षक नारायण सोनावणे आणि पत्रकार मुकुंद रांजणे यांच्या संकल्पनेतून यावेळी पहिल्यांदाच तिन्ही शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रमाणपत्र दिल्यास अन्य विद्यार्थी सुध्दा शैक्षणिक क्षेत्रात,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्यातील कलागुणांना वाव मिळवून देऊ शकतात ज्यामुळे शाळेच्या नावासह गावाचे नावलौकिक सुध्दा वाढू शकते यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा, गव्हाणकर एज्युकेशन शाळा आणि सेंट झेव्हियर स्कुल मधील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनिंना विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेचे सई उमेश लोखंडे इयत्ता ५ वी,  विरेन पांडुरंग झोरे-इयत्ता ७ वी, सेंट झेव्हीअर्स हायस्कुलचे उमेर अनिस शेख- इयत्ता आठवी व रिचा राजेश दळवी इयत्ता दहावी तसेच प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, या शाळेतील गुणवंत विद्यार्थी कु. सानिया सुखदेव पारधी इयत्ता – १ 0 वी, प्रेम गोविंद दाभाडे इयत्ता १ 0 वी या सर्व गुणवंत  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,गव्हाणकर शाळेचे मुख्याध्यापक रमेश ढोले, संघपाल वाठोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, संतोष चाटसे तसेच अन्य शिक्षक वृंद आणि पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

भारताने टी२० मालिका जिंकली

गुवाहाटी : सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी२० क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडचा १० ओव्हर आणि ८ विकेट राखून धुव्वा उडविला आणि टी२० मालिकाही जिंकली.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.कॅप्टन सूर्यकुमार…

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः  वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी  नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन  संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना,  थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…

अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

अशोक गायकवाड रायगड- कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी शुक्रवार, २३ जानेवारीला कर्जत येथील प्रशासकीय भवनातील उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागप्रमुख, क्षेत्र अधिकारी व टीम लीडर्स यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच कर्जत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या बरोबर थेट संवाद साधून निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय यंत्रणेला कामकाजादरम्यान भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी व बैठकीदरम्यान कर्जत निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, अधीक्षक माथेरान सुरेंद्रसिंग ठाकूर, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटूंबे, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, श्रीमती शरयु सावंत, पुरवठा निरिक्षण अधिकारी रविंद्र दळवी, महसूल सहायक संदीप गाढवे, महसूल सहायक जगन्नाथ उबाळे, महसूल सहायक जयंत दबडे, रायगड जिल्हा ग्राम महसूल संघाचे माजी अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे, महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघाचे महिला प्रतिनिधी तथा मंडळ अधिकारी पाथरज, श्रीमती किरण बेलोसकर, तालुका अध्यक्ष प्रवीण गवई, ग्राम महसूल अधिकारी, सजा नांदगाव निलेश पवार, मंडळ अधिकारी चिंचवली श्रीमती वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कर्जत, श्रीमती शितल मोरे, मंडळ अधिकारी नेरळ, विश्वास गडदे, मंडळ अधिकारी कडाव, अशोक बनसोडे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गट संख्या ६ व पंचायत समितीसाठी गण संख्या १२ असून एकूण २२० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ७० हजार ७०२ इतकी असून त्यामध्ये ८४ हजार ७७७ पुरुष व ८५ हजार ९२५ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूणच अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले असून ही भेट सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.