Category: रायगड

raigad news and updates

सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी

सनियंत्रण समिती बरखास्त करण्याची स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मधील हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा पूर्णपणे बंद करून या श्रमिकांना एकूण ९४ पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावून लावले असून फक्त २० ई रिक्षा देण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी, सचिव तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली यामध्ये आणखीन फक्त वीस ई रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील १३ ई रिक्षा प्रशासन खरेदी करणार असून सात ई रिक्षा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.त्याबाबतची अंमलबजावणी केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या वीस ई रिक्षा सुरू असल्या तरी त्यासुध्दा वाढत्या पर्यटनामुळे खूपच कमी पडत आहेत.त्यामुळे उर्वरित ५४ हातरीक्षा चालकांच्या वाट्याला पुन्हा एकदा ही अमानवीय प्रथा नशिबी असणार आहे. सनियंत्रण समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे ही समिती ज्यांना या गावाविषयी सहानुभूती नाही,इथले पर्यटन बहरावे,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याबाबत काहीएक देणेघेणे नसल्याने ही समितीच बरखास्त करून टाकावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. ———————————— सनियंत्रण समितीच्या झालेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत काही निमंत्रित पदाधिकारी,पर्यावरण क्षेत्रात काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते.या प्रतिनिधींना बैठकीत चर्चा करण्याची कोणतीही संधी दिली नाही.या समितीने सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावल्याने ई रिक्षा वाढीसंदर्भात प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ———————– महाराष्ट्रातुनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात.स्वातंत्र्य पूर्वकाळापासून इथे हातरीक्षा ओढण्याची अमानवीय प्रथा सुरू आहे.ही प्रथा बंद करण्यासाठी स्थानिकांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर ई रिक्षाचा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा अहवाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने  ६ फेब्रुवारी पर्यंत ७४ हातरीक्षा बंद करून चालकांचे ई रिक्षा द्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.ही मुदत संपून गेल्यावर आंदोलन सुध्दा करण्यात आले त्यानंतर प्रशासनाने १२ फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ मागवून घेतली होती.

सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन मुकुंद रांजाणे माथेरान : गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेत सत्यम फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन बसवण्यात आले.  माथेरान मधील यापूर्वी बीजे रुग्णालय नगरपरिषद दवाखाना आणि नगरपरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या प्रकारचे वेल्डिंग मशीन लावण्याचे काम सत्यम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.  माथेरान सारख्या दुर्गम भागात नवी मुंबईच्या या फाउंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. सत्यम फाउंडेशनचे सर्वेसर्वा कुमार सत्यम यांच्या अथक प्रयत्नातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आली.  यावेळी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री शशी भूषण गव्हाणकर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश ढोले शिक्षक श्री संघपाल वाठोरे, विदुला गोसावी यासह सत्यम फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख कुमार सत्यम, संचालक प्रभाकर तांबें यांसह अन्य उपस्थित होते.

  संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा

संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश! मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानचा परिसर हा चोहोबाजूंनी डोंगर दर्यांनी हा संपूर्ण भूभाग व्यापलेला आहे. जागेअभावी अनेकांनी पूर्वीपासून जवळपास(चार दशकांपासून) कड्यालगत कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी घरे बांधलेली आहेत.झोपडपट्टी म्हणून हा भाग आजही ओळखला जात आहे.पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कड्यालगत असणाऱ्या घरांच्या बाजूच्या मातीची पूर्णपणे धूप होऊन वाहून गेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना अतिवृष्टी काळात जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहून आपले जीवन कंठावे लागत होते. पंचवटी नगर येथील रहिवासी राकेश कोकळे यांनी याबाबत मागील पंधरा वर्षांपासून अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही काहीएक साध्य झाले नव्हते.अखेरीस ही बाब विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपल्या परीने अधिकारी वर्गाशी चर्चा करून याभागात संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.या महत्वपूर्ण कामामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील अनेक वर्षा पासून पंचवटी नगर भागात जमिनीची धूप होत होती. अनेक वर्षे त्या ठिकाणचे रहिवासी असणारे राकेश कोकळे पाठपुरावा करीत असताना मी पाहत होतो. प्रत्येक वेळी या कामासाठी राजकीय अडथळे येत असताना या भागातील गोर गरीब व्यक्तीची घरे वाचली पाहिजे या सामाजिक भावनेने मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांना सूचना केली होती.त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे—गटनेते माथेरान नगरपरिषद आमच्या पंचवटी नगर येथील माझ्या घराच्या मागील बाजूस दरवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे तेथील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन हा भाग पूर्णपणे धोकादायक बनला होता. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळ्यात जीवन जगावे लागत होते. मी अनेकवेळा याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती की या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनेकवेळा विविध वर्तमानपत्रात बातम्या सुध्दा दिल्या होत्या. अखेरीस नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आम्हा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे,  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे,तसेच पत्रकार मुकुंद रांजाणे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. राकेश कोकळे–पंचवटी नगर रहिवासी,माथेरान

भारताने सहाव्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला; वर्ल्डकप जिंकणारा आयुष म्हात्रे विरारचा ‘दुसरा’ छोरा

हरारे : विरारचा छोरा आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करून सहाव्यांदा वर्ल्डचॅम्प बनण्याचा मान मिळविला. योगायोग म्हणजे भारताच्या या सहावर्ल्डकप विजेतेपदात टिमचा कॅप्टन दुसऱ्यांदा विरारचा छोरा ठरला आहे.…

  माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद!

माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद! मुकुंद रांजाणे माथेरान : हातरीक्षाच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांना कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्वच  हातरीक्षा बंद करून ई रिक्षांच्या संख्येत वाढ करावी असे स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने याबाबत काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हातरीक्षा सारखी अमानवीय प्रथा बंद करून सर्व ९४ हातरीक्षा चालकांचे ई रिक्षाच्या माध्यमातून पुनर्वसन करावे तसेच नवीन ई रिक्षा ह्या राज्य सरकारने खरेदी कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले होते. ६ फेब्रुवारी रोजी या आदेशाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असतानाही राज्य शासनाकडून अद्याप काहीही ठोस भूमिका बजावली नाही.त्यामुळेच श्रमिक रिक्षा संघटनेने १० फेब्रुवारी पासून सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विविध संबंधित अधिकारी वर्गाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे. या बंदच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे या व्यतिरिक्त अन्य कुणालाही ह्या सेवेचा लाभ दिला जाणार नाही. राज्य सरकारकडुन जोपर्यंत ई रिक्षा वाढीसंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा बंद ठेवण्यात यावा जेणेकरून सर्वांना या सुविधेची झळ सहन करावी लागणार आहे. रुग्णांसाठी नगरपरिषदेची रुग्णवाहिका उपलब्ध आहे. निर्णय लागेपर्यंत शालेय विद्यार्थी सुध्दा पायी चालत जाऊ शकतात. अधिकारी वर्गाला सुध्दा ही सुविधा बंद केल्याशिवाय त्यांना इथले रस्ते कशा पद्धतीचे झाले आहेत याचे आकलन होईल.असे ई रिक्षा समर्थकांमधून बोलले जात आहे. कोट सर्वोच्च न्यायालयाने माथेरान मधील सर्व ९४ हातरीक्षा कायमस्वरूपी बंद करून सहा महिन्यांत त्यांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून ई रिक्षाच्या संख्येत वाढ करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली आहे.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सुनील शिंदे–सचिव श्रमिक रिक्षा संघटना

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी…

खरेदी विक्री संघाच्या ताब्यात असलेली रास्तभाव धान्य दुकाने विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना देण्याची मागणी… राजीव चंदने मुरबाड :  मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाच्या अखत्यारीत मुरबाड शहर व तालुक्यात एकूण…

शरद पवार इन अक्शन

बारामती : पुतण्या अजित पवारांच्या निधनाचे दु:ख पचवून शरद पवार आज पुन्हा इन अक्शन आले. ते थेट आज नीरा नदीतील प्रदुषणाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचले! अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार…

 कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न

कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप कार्यक्रम संपन्न पनवेल: तुपगाव येथील  संत गोरोबा काका मंदिरात खादी ग्रामोद्योग मुंबई व कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम प्रशिक्षण व इलेक्ट्रिक चाक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास साळवी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला. कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मुंबईचे अधिकारी अरुण कुमार प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत कुंभार समाजातील २० लाभार्थ्यांची इलेक्ट्रिक चाकांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रथम सर्व इलेक्ट्रिक चाकांचे पूजन करण्यात आले. या लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक चाक वापरासंदर्भात १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक चाकांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, यापूर्वी पार पडलेल्या ३० दिवसांच्या माती काम प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मुंबईचे अरुण कुमार,  ग्रामसेवक विश्वास वारे, कुंभार समाज रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर व जिल्हा सचिव रामदास साळवी यांनी इलेक्ट्रिक चाक योजनेविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास  उमेश मळवी (दादाजी फाउंडेशन, नाशिक), वसंत महाराज कुंभार (रायगड भूषण), नंदकुमार चिरनेरकर (जिल्हा उपाध्यक्ष), रविंद्र कुंभार , रमेश दहिवलीकर (जिल्हा कार्याध्यक्ष), दिलीप साळवी (जिल्हा सचिव), मधुकर कुंभार (जिल्हा महासचिव),  पनवेल तालुका अध्यक्ष बजरंग भागवत, भरत आपटेकर,  राजेंद्र साळवी,  वसंत कुंभार,  प्रविण कुंभार,  संजय शिर्के,  सविता मांडलेकर,  कांता नागावकर,  स्वप्निल नागावकर,  सिद्धेश कुंभार, प्रज्वल कुंभार (प्रशिक्षक),  सचिन साळवी, सुखदेव सारवे,  देवेंद्र कुंभार, यशवंत बिरवाडकर,  उद्धव साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमास कुंभार समाजातील बांधव, भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कुंभार समाजातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून समाजाच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळणार आहे.

 पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन

पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके

दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके राज भंडारी पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे. मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.