शिमग्यासाठी कळव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने सोडल्या मोफत बस
अनिल ठाणेकर ठाणे- कावेरी सेतु ,कळवा येथे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शिमगोत्सवासाठी कोकणातील नागरिकांना मोफत बस सेवा पुरविण्यात आली. शनिवारी रात्री जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या असते. मात्र, एसटी आणि रेल्वेचे आरक्षण अनेकांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.जितेंद्र आव्हाड हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा पुरवित असतात. त्याच अनुषंगाने शनिवारी रात्री कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयापासून बसगाड्या सोडण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक अभिजीत पवार, युवती कार्याध्यक्ष पुजा शिंदे, दिपा गावंड, सपना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मनोज प्रधान यांनी सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
