२० हजार कोटींच्या गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते उन्नत भाईंदर मार्गाला मंजूरी ! अनिल ठाणेकर ठाणे : २० हजार कोटी खर्चुन गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची, वाहतुक कोंडीपासून सुटका होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मार्गासाठी अंदाजे ११५०० कोटी रूपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदर कडे जाणार्या प्रवाश्यांची वाहतुककोंडीपासून सुटका होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांना एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांचे आभार मानले. घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवार २ जुलै, २०२४ ला एम.एम.आर.डी.ए. च्या प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसर्या बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे वर्सोवा ते भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणार्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदर ला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००