Category: ठाणे

Thane news

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार 

ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार सुरुच राहील्यामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच शहराच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. यात काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली, त्यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे…

डोंबिवलीत रेल्वे तिकीटासोबत ‘पाऊस फ्री’

डोंबिवली – अवघ्या महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झालेय. शेतकरी खुष झालेत. पण या पावसामुळे डोंबिवलीकरांचे मात्र हाल झाले आहेत. डोंबिवलीत रेल्वे तिकीटासोबत ‘पाऊस फ्री’ मिळत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या…

नाना पटोले यांच्या कृत्याचा पनवेलमध्ये जाहीर निषेध

पनवेल : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये आज भाजपच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पनवेल भाजपच्या कार्यालयाजवळ महिला मोर्चा व युवा मोर्चाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जाहीर निषेध निदर्शनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, कर्जत अध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीता पाटील, नीता माळी, मोनिका महानवर, वृषाली वाघमारे, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, संध्या शारबिद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, दिपक शिंदे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, रोहित जगताप, सुहासिनी केकाणे, विद्या तामखेडे, खारघर महिला महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, स्वप्निल खबाले ,वैभव भगत, राजेश कराळे, अतुल बडगुजर, मधुकर उरणकर, उपेंद्र मराठे, शोभा सातपुते, अनिता रणदिवे, कोमल कोळी, मयूर कदम, विजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो मात्र नाना पटोले यांनी चक्क आपले पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले. या कृत्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना नाना पटोले यांनी त्या कार्यकर्त्याने फक्त पायावर पाणी ओतले आणि मी पाय धुतले अशी सारवासारव केली मात्र प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये कार्यकर्ता पाय धूत असल्याचे स्पष्ट झाले असताना नाना पटोले तोंडघशी पडले. त्यामुळे त्यांच्या या खोट्या वृत्तीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आल्या. 00000

शनिवारी व रविवारी ठाण्यात मोफत दाखले वाटप शिबीर – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व रविवारी, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक २२ जून व रविवार, दिनांक २३ जून, २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये, ठाणे राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली काॅम्प्लेक्स, सर्विस रोड, विवीयाना माॅल समोर, ठाणे (पश्चिम) येथे ‘मोफत दाखले वाटप शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, 1.अधिवास (डोमेसाईल) दाखला, 2. रहिवासी दाखला, 3. उत्पन्नाचा दाखला आणि 4. ज्येष्ठ नागरिक दाखला हे दाखले उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये उपलब्ध होणारे दाखले आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 1.अधिवास (डोमीसाईल) दाखल्यासाठी, १.आधार कार्ड, २. रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १० वर्षाचा रहिवासी पुरावा,  त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १० वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 2. रहिवासी दाखल्यासाठी, १ आधार कार्ड, २.रेशन कार्ड / लाईट बिल / टॅक्स पावती, ३. शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला, ४. अर्जदाराचा १ फोटो, ५. जन्म महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर १५ वर्षाचा रहिवासी पुरावा, त्यामध्ये फक्त अर्जदाराच्या नावाचे लाईट बिल किंवा टॅक्स पावती किंवा अर्जदार शाळेमध्ये शिकत असल्यास १५ वर्षाचे प्रगती पुस्तक लागतील. 3. उत्पन्नाचा दाखल्यासाठी, १.अर्जदाराचे आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड, ४.मागील तीन महिन्याचे लाईट बिल, ५. शेजाऱ्यांचे आधार कार्ड, ६. अर्जदाराचे ४ फोटो, ७. बँकेचे पासबुक अपडेटे केलेले. ८. एक लाखाच्या आत दाखला हवा असल्यास नोटरी केलेले प्रतिज्ञा पत्र सादर करावे लागेल. 4. ज्येष्ठ नागरिक दाखल्यासाठी, १. आधार कार्ड, २. पॅन कार्ड, ३. रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागेल. शिबिराच्या ठिकाणी तपासणीकरिता सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. तरी या मोफत दाखले वाटप शिबीराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी विनंती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. 00000

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत

शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप   ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत लागू केलेले बदल मागे घेतले असले तरी खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याने आरटीई प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याने हे न्यायालयात गेले आहे. यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना उत्तम दर्जेच्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायदा सुरू केला. या कायद्यांतर्गत शासकीय, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवली जाते. या जागांसाठी दरवर्षी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने नवे बदल केले होते. या नव्या नियमावलीमुळे गरीब, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने पूर्वीच्या नियमावलीनुसार १७ मे ते ४ जून या कालावधीत आरटीई प्रवेशासाठी अर्ज मागविले होते. परंतु खासगी शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रीया पूर्ण केल्यामुळे आता २५ टक्के जागावरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विषय आता न्यायालयात गेला आहे. राज्य शासन आणि खासगी शाळा या वादात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळा सुरु झाल्या असून अभ्यासक्रमाला देखील सुरुवात झाली आहे. परंतु, आरटीईची प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 00000

कल्याणमध्ये शिळफाटा रस्त्यावर मतदान ओळखपत्रांचा ढीग

कल्याण : कल्याण- ळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गाव हद्दीत बुधवारी एका पोतळीमध्ये भरलेली हजारो मतदारांची ओळखपत्रे रस्त्यावर फेकलेली आढळून आली आहेत. बहुतांशी मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्व भागातील…

मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ठाणे : वस्तू व सेवा कर कार्यालय, ठाणे येथील कार्यालयीन कामकाजाकरिता ठाणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिक स्वरुपाची सुमारे 12000 चौ.फुट ते 14000 चौ.फुट इतक्या जागेची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्यकर सह आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक मालमत्ता धारकांनी मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावासह राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), कार्यालय, ठाणे, 3 रा मजला वस्तु व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, येथे संपर्क साधावा, असे ठाणे राज्यकर सह आयुक्त (प्रशासन) यांनी कळविले आहे. 00000000

शेतकऱ्यांनी डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. चालू खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक (खते) संदिप तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

दिव्यात घाणीचे साम्राज्य

कचऱ्यातून होतोय नागरिक, लहान मुलांचा प्रवास   ठाणे :  रात्री धुवाधार पडलेल्या पावसामुळे दिव्यात बऱ्याच भागात पावसाचे पाणी साठले. तर आता दिव्यात पावसात नालेसाफाई सुरु असून नाल्यातील कचऱ्याचा गाळ हा बाहेरच टाकला गेल्याने ठामपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकल्याचे चित्र दिसत आहे. त्या नाल्या बाहेरच्या कचऱ्याच्या गाळातून, पावसाच्या साठलेल्या घाण पाण्यातून आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना तर शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यातूनच मार्गक्रमण करावे लागले. ठामपा क्षेत्रातील सर्व प्रभाग समितींमध्ये नालेसफाई सुरु आहे. तर या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. याने परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरणार नाही, अशा सूचना ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या होत्या. पण या आयुक्तांच्या आदेशाला दिव्यात कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. दिव्यातील प्रत्येक नाल्याच्या सफाईनंतर त्यातील गाळ हा बाहेरच ठेवला गेल्याचे नागरिक सांगत आहेत. त्या गाळातूनच नागरिकांना चालावे लागत आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती तर्फे पावसात नालेसफाईची कामे सुरु आहे. एकाच वेळी दोन तीन नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. तर दिवा स्टेशन जवळील पूर्वेत श्लोक नगर येथील नारायण भगत परिसरात मोठ्या नाल्याची सफाई गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु आहे. पण परवा या नाल्यातून कचऱ्याचा गाळ काढण्यात आला. पण तो कचऱ्याचा गाळ लगेचच न उचलल्याने रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तेथे गुडघाभर पाणी साचले.या गुडघाभर घाण पाण्यातून न जाता नाल्याच्या भिंतीवर चढून सकाळी नागरिक कामाला गेले आहेत. तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी उचलून तेथून मार्ग काढला आहे. या नारायण भगत परिसरात अंदाजे पन्नास हजार ते दिड लाखांची लोकवस्ती आहे. तसेच या सर्वांना कामाला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, दिवा स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पण तोच नाल्याच्या कचऱ्यामुळे, घाण पाण्याने भरलेला असल्याने तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.डोंगर परेदशी, उप मुख्य स्वच्छता निरिक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभाग – दिव्यात एकाच वेळी दोन, तीन नाल्यांची सफाई सुरु आहे. आम्ही नाल्यातील कचऱ्याचा गाळ काढल्यावर एक दोन दिवस तो कचरा तसाच ठोवतो. कारण उचलून नेताना नाल्यातील कचऱ्यासोबत आलेले घाण पाणी इतरत्र पडत जाते. त्यामुळे तो पूर्ण रस्ता घाण होतो. तर त्या गाळाच्या, घाण पाण्याच्या दुर्गंधीने रोगराई पसरु शकते. तर आता पाऊस सुरु झाल्यापासून आम्ही तो कचरा तातडीने उचलून टाकतो.

 ‘निरंजन डावखरे यांच्याकडून कोकणातील युवाशक्तीसाठी कार्य’

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मत   भिवंडी: कोकणासह ठाणे जिल्ह्यातील युवाशक्तीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी कार्य केले आहे. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील सर्व स्तरांतील प्रश्न मांडून ते सोडविणाऱ्या महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भिवंडी शहरातील ओसवाल हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आज उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, सौ. नीलिमा डावखरे, लोकसभा समन्वयक जितेंद्र डाकी, हरिश्चंद्र भोईर, रामनाथ पाटील, यशवंत सोरे, छत्रपती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकणातील पाच जिल्ह्यात पसरलेल्या पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने मांडले. कोकणातील युवा शक्तीच्या प्रगतीसाठी ते कार्य करीत होते. पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे प्रश्न मांडण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यांना विकासकार्य करण्याची संधी पुन्हा देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. भिवंडी शहरात ३०९६ व भिवंडी ग्रामीणमधील ३ हजार २४१ मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशवासियांनी पसंती दिल्याने पुन्हा `एनडीए’चे सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारकडून भातपिकासह विविध पिकांच्या आधारभूत किंमती वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून विविध लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असतानाच, महाराष्ट्र सरकारनेही काल पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही मोफत उपचार लागू केले. राज्य सरकारमध्ये शिक्षकांसह विविध पदांच्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय महायुतीच घेऊ शकते, असे नमूद करून श्री. कपिल पाटील यांनी भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 000000