Category: ठाणे

Thane news

 स्वच्छतेसाठी अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका !

ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य पद्धतीने करण्यासाठी ५० टोगो व्हॅन – प्रताप सरनाईक   अनिल ठाणेकर   ठाणे : ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वीच शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे. ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय. कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदार संघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येतेय. या टोगो व्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्येक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत. भविष्यात ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी ५० व्हॅन देणार आहेत. जेणेकरून कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लॅण्डस्केप केलेले आहेत, तिथे खताचा पर्यावरणसुलभ वापर करता येईल. तसंच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून, राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती आ. प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००

ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४ हजार ७०३ गणवेश होणार तयार

ठाणे : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले आहे. जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेले गणवेश दिसणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1201 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळाले असून यातून बचत गटाच्या महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 104703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 15 जून 2024 रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड व अंबरनाथ या 6 तालुक्यामधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सीएमआरसीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच मुख्यालय स्तरावरून या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विहित वेळेत शिवणकाम पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत, महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे मेहनत घेतली. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकल्पाची अंलबजवणी होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेश पुरवठा व्हावा यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, गौरी दोंदे, वित्त व लेखा अधिकारी राखी मिराशी व व्हॅल्यु चेन सल्लागार महेश कोकरे यांनी जिल्ह्यांना मार्गदर्शन केले. गणवेश शिलाईचे कामकाज वेळेत पूर्ण करून शाळेत पोहच करण्यासाठी सर्व सीएमआरसीतील गारमेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिलांची निवड करणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माविमचे विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, माविमच्या ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अस्मिता मोहिते यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. 0000

पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजाराहून अधिक अर्ज

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांच्या एकूण ८०५ जागांकरिता राज्यभरातून ४६ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिला उमेदवारांचे सुमारे नऊ हजार अर्ज आहेत. राज्यात २०२२-२०२३ या वर्षासाठीची भरती प्रक्रिया यंदाच्या वर्षी होणार असून या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण ८०५ जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील ११९ आणि ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांचा समावेश आहे. ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांपैकी ६६६ जागा या पोलीस शिपाई पदासाठी असतील. तर २० जागा वाहनचालक पदासाठी असणार आहेत. तसेच ग्रामीण पोलीस दलात ११९ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ७३, वाहन चालक पदासाठी ३८ आणि पोलीस वादक या पदासाठी आठ जागा आहेत. ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या एकूण ८०५ जागांसाठी ४६ हजार ६२४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ठाणे शहर पोलीस दलात सर्वाधिक म्हणजेच, ३९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे आठ हजार ४२ अर्ज आहेत. तर ग्रामीण पोलीस दलात ७ हजार १९ जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण १ हजार १५ इतके आहे. ठाणे शहर पोलीस दलाची मैदानी चाचणीची प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानात होणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणीची प्रक्रिया मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मैदानामध्ये पार पडेल. मैदानी चाचणी दरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात असतील. ठाण्यातील साकेत मैदान आणि परिसरात १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचारी आणि ७० मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यात ही भरती प्रक्रिया होणार असल्याने उमेदवारांसाठी मैदानात मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच एखादा उमेदवार त्याचे छायाचित्र आणण्यास विसरल्यास त्याच्यासाठी छायाचित्रकार आणि प्रत काढण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे. – संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस. कोट मुंब्रा येथे भरती प्रक्रियेसाठी आदल्या दिवशी अनेक उमेदवार येतील. त्यांच्या सुविधेसाठी मैदानात मंडप उभारण्यात आला आहे. त्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी ३५० अधिकारी कर्मचारी तैनात असतील. – डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. ०००००

 ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार

ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त   ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदार संघाच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये कोकण पदवीधर मतदार संघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजीत पानसे तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैय्या, उबाठाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून याठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहाव्यास मिळणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यात, ठाणे जिल्ह्यातील ९८ हजार ९३, रायगड जिल्ह्यातील ५४ हजार ९३१, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ हजार ५५१, पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३३३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ६८६ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय महत्व वाढलेल्या या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारांची आकडेवारी कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री १२ हजार ९८७, पुरुष १५ हजार ९३० तर, तृतियपंथी ८, ठाणे जिल्हा स्त्री ४२ हजार ४७८, पुरुष ५६ हजार ३७१ तर, तृतियपंथी ११, रायगड जिल्हा स्त्री २३ हजार ३५६, पुरुष ३० हजार ८४३ तर तृतियपंथी ९, रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८, पुरुष १३ हजार ४५३ तर, तृतियपंथी ०, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री ७ हजार ४९८, पुरुष ११ हजार ५३ तर, तृतियपंथी ०, असे एकूण २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाचे रमेश कीर, भाजपचे निरंजन डावखरे, भीमसेना विश्वजित तुळशीराम खंडारे, अपक्ष अमोल अनंत पवार, अरुण भिकण भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशूराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, ॲड. शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, असे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 00000

कल्याण-डोंबिवलीत साथरोग नियंत्रणासाठी फवारणी मोहीम

कल्याण : पावसाळा सुरू झाल्याने विविध प्रकारचे साथरोग या काळात डोके वर काढतात. या साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने शहराच्या विविध भागात विशेष जंतुनाशक, धूर फवारणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या विशेष फवारणी मोहिमेचे नियोजन केले आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकातून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, के. पी. जगताप उपस्थित होते. या विशेष मोहिमेत १२२ सफाई कामगार, १२२ पितळी फवारणी पंप, ३० धुराच्या मशीन, तीन धुराच्या जीप्स, ११ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सकाळ, संध्याकाळ ही फवारणी केली जाणार आहे. हातगाड्या सुरू साथरोगाच्या नियंत्रणासाठी आयुक्तांनी विशेष फवारणी मोहीम सुरू केली असली तरी ज्या उघड्यावरील हातगाड्यांवरील खाद्य पदार्थांमुळे हे साथरोग पसरतात. त्या गाड्या ग प्रभाग सोडून नऊ प्रभागांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संध्याकाळी चार वाजल्यापासून खाऊ गल्ल्या ग्राहकांनी भरून जातात. सर्वाधिक हातगाड्या डोंबिवलीत ह प्रभाग, ई प्रभाग, ड, अ प्रभागात लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. 000

‘नौपाड्यात शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईचा आग्रह’

भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाचे पोलिसांना निवेदन   ठाणे : नौपाडा येथील शाळा- हाविद्यालयांच्या परिसरात थाटलेल्या पानटपऱ्या व सिगारेट विक्रीची दुकाने बंद करण्याची आग्रही मागणी भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाकडून…

 ‘आव्हाडांनी वायकरांना शुभेच्छा द्याव्या’

प्रताप सरनाईक यांचा सल्ला   ठाणे : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या, असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ‘जो जिता वो सिकंदर’ आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचेही ते म्हणाले.  विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत.  राज्यात लोकसभेला केवळ १५ जागा लढल्या आणि ७ जागा निवडून आणल्या. त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक स्त्राईक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरला आहे. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्याने काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करुन दाखविले आहे. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे बाकी कोण काय बोलत त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचे असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या विषयी त्यांनी छेडले असता,  या विषयावर आम्ही बोलणार नाही. आम्ही या विषयावर बोलणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. सरनाईक यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल त्यांना केला असता, सरनाईक यांचे नाव नेहमीच मंत्रीपदासाठी येत आहे. मात्र मुख्यमंत्री हा एक ठाणेकर याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वेळी विधानसभेचा एक सदस्य म्हणून आपले नाव मंत्रीपदासाठी चालते यावरच मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.  त्यातही मंत्रीपद जर माझ्या नशिबात असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ००००

शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

ठाणे : पावसाळा लागून १५ दिवस झाले. मात्र जिल्ह्यात आजूपर्यंतही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही तब्ब्ल ४८ खासगी टॅंकरवद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीव घेणी पाणी टंचाई आजही सुरू आहे. अर्धा जून संपत असतानाही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ माेठ्या गांवांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टॅंकर पाणी पुरवठा करीत आहेत. शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर मुरबाड तालुक्यातील १७ माेठे गांवे आणि १८ पाड्यांसाठी सहा टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मुरबाडमधीाल ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टॅकरने एक लाख एक हजार ७०७ लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात आला होता. 00000

ठाणे पालिकेची २६७ कोटींची विक्रमी कर वसुली

ठाणे :  पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या माध्यमातून यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाई सेवा उपलब्ध करून दिली होती, तसेच सवलती अन् वेळेत ग्राहकांच्या प्राप्त झालेल्या देयकांमुळे १ एप्रिल ते १५ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत २६७ कोटींची विक्रमी वसुली झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली, तर मागील वर्षी याच कालावधीत २५३ कोटी ८६ लाख रुपये वसूल झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १३ लाख १४ हजार रुपये अधिक वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे महापालिकेने करदात्यांना मालमत्ता कर भरण्याची योजना १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविली होती. त्यानुसार करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीतील मालमत्ता कराची रक्कम दुसऱ्या सहामाहीच्या करासह एकत्रितपणे जमा केली, तर दुसऱ्या सहामाहीतील करदात्यांना सामान्य करात १० टक्के सवलत दिली होती. या कालावधीतील रक्कम १६ ते ३० जून या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी करदात्यांना सामान्य कर रकमेवर ४ टक्के सवलत जाहीर केली होती. आयुक्त सौरभ राव म्हणाले की, या सवलतीला करदात्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सामान्य करातील १० टक्के सूट आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. कर वसुलीच्या उपाययोजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/करदात्यांना मालमत्ता संबंधित ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये करदात्यांना त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातून मालमत्ता कराशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या मालमत्तेवर किती कर थकीत आहे. किती दंड असेल, तर किती मालमत्ता कर भरावा लागेल, याची उत्तरे महापालिकेच्या वेबसाइटवरून नागरिकांना घरबसल्या मिळतील, अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात येऊन कोणालाही भेटण्याची गरज भासू नये, यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभाग समिती कार्यालयातील संकलन केंद्र महापालिकेच्या कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे म्हणाले की, मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व विभाग समिती कार्यालयांत संकलन केंद्रे सुरू केली आहेत. मालमत्ताधारक सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रावर येऊन मालमत्ता कर भरू शकतात. याशिवाय ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही सुरू आहे. करदात्यांना त्यांच्या देयकाची संगणकीकृत प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे किंवा प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रातून मिळू शकते, तसेच या लिंकद्वारे, करदाते इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे त्यांचा मालमत्ता कर ऑनलाइन जमा करू शकतात.

कोकणच्या विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करा – आनंद परांजपे

ठाणे : कोकणच्या विकासासाठी पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते,  ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पदवीधर मतदारांना केले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील होऊ घातलेल्या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव  डावखरे हे कोकण पदवीधर निवडणुकीत उभे आहेत. गेली १२ वर्ष विधानपरिषदेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना उत्कृष्ट अशी कामगिरी ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी केली आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे शिक्षणाचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न असे कोकणातील विविध प्रश्न विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ते सोडविण्याचा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांनी प्रयत्न केला. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. २६ जून २०२४ रोजी मतदान आहे. माझी कोकणातील सर्व पदवीधरांना विनंती आहे की येत्या २६ जूनला न विसरता मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि ॲड निरंजन वसंतराव डावखरे यांच्या नावासमोरील एक सरळ उभी रेष काढून आपले अमूल्य मत त्यांना देऊयात आणि कोकणच्या विकासासाठी  पुन्हा एकदा ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांना विजयी करुन कोकण विकासाची हमी घेऊयात, असे आवाहन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सर्व पदवीधर मतदाराना केले आहे. ०००००