Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर उल्हासनगर : एकीकडे उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असताना दुसरीकडे टँकर पॉइंट येथील पिण्याच्या पाण्याचा वापर मलनिःसारण सफाईच्या गाडीमधून पिण्याचे पाणी भरून ते चक्क गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उघडकीस आणून याबाबत अभियंता पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले उल्हासनगर शहरातील पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दसरा मैदान जवळ टँकर पॉईंट आहे. शहरात ज्या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी या टँकर पॉइंटवरून पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरून त्या परिसरातील नागरिकांना पुरवले जाते. पण १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ च्या सुमारास ॲड प्रशांत चंदनशिव हे त्या ठिकाणाहून जात असताना त्या टँकर पॉईंट इथे मलनिःसारण सफाईची गाडी उभी होती. टँकर पॉईंट वरील पिण्याचे पाणी त्या गाडीत भरत असताना दिसून आले. ते पाणी गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. एकीकडे शहरात काही परिसरात पाण्याची भीषण टंचाई. तर काही ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. तर काही भागात कमी दबावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या हक्काचे हे टँकर पॉईंट मधील पाणी मलनिःसारण सफाई करण्याकरिता वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडत असताना याकडे संबंधित अधिकाऱ्याचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले या घटनेबाबत ॲड प्रशांत चंदनशिव यांनी तक्रार करण्यासाठी उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ येथील उपविभागीय कार्यालय मध्ये गेले असता अभियंता मिरकुटे यांना या घटनेबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना ई-मेल द्वारे तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील तक्रार केली आहे. आताही अधिकारी मंडळी या घटनेबाबत कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती

टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती कल्याण :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण येथील कला शिक्षक यश महाजन यांनी यावर्षी टरबूजावर ब्लेडच्या साहाय्याने महाराजांची आकर्षक कोरीव प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दरवर्षी न चुकता महाराजां विषयी चा आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी महाजन विविध माध्यमांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटत असतात. यामध्ये भाकरी, पिंपळाचे पान, तुळशीचे पान, केळीचे पान, दगड, माती, तांदूळ, खडू वरील कोरीव काम तसेच रांगोळी, पोर्ट्रेट आणि कॅनव्हास पेंटिंग अशा विविध माध्यमांचा समावेश आहे. यंदा त्यांनी टरबूज वर तसेच मोराच्या पंखांवर ही महाराजांची प्रतिकृती साकारत आपल्या कले. द्वारे अभिवादन केले आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे शालेय स्तरावर तसेच परिसरात कौतुक होत आहे. कलेच्या माध्यमातून इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य मानला जात आहे.

 सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर

सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराजांची शिकवण काँग्रेस पक्ष पुढे नेत आहे – राजकुमार पातकर कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सुराज्य निर्माण केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभाव हि शिकवण कॉंग्रेस पक्ष पुढे नेत असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजकुमार पातकर यांनी व्यक्त केले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आले यावेळी पातकर बोलत होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्यासह राजेश वाघमारे, मामा पगारे, सलीम शेख, गोपाळ शर्मा, दशरथ पाटील, अरुण वायले, हाफिज कुरेशी, संकेत लोके, अमोल गायकवाड, शामराव यादव, सुजित सिंह, चंद्रकांत पगारे, हरिश्चंद्र पाटील, जयराज पवार, वैशाली वाघ, किशोर वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना पातकर यांनी सांगितले कि, शिवाजी महाराज शौर्याचे प्रतीक होते. शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमी होत असते. वर्षाचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी आहे कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. त्यांची जयंती साजरी करणे आपले आद्य कर्तव्य आहे. कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा सन्मान करून स्त्रियांचा आदर करण्याचे शिवाजी महाराजांनी शिकवले. काँग्रेस पक्ष सर्वधर्मसमभाव ही शिवाजी महाराज यांची शिकवण पुढे नेत असल्याचे पातकर यांनी सांगितले.

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार

शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार पनवेल : दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्‌डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे. उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील यांची तर  शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे,  शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांची तर अर्जुन पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेते अभिलाषा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असणार आहेत. सुसज्ज अशी चार क्रीडांगणे त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधा या ठिकाणी आहे. या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील,  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.

 साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु

साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण स्टेशन केडीएमटी बस सेवा सुरु शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत बराच काळ बंद असलेली  मार्ग क्र.३ साई चौक-सह्याद्री नगर-कल्याण स्टेशन बससेवा परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गुरुवारपासून नागरिकांच्या सेवेत पुन्हा सुरू झाली आहे. आज गुरुवारी सकाळी खडकपाडा साई चौक येथे या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांच्याहस्ते नारळ फोडून या बसला भगवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, उपशहर प्रमुख सुनील वायले, नगरसेवक किरण भांगले, रुपेश सकपाळ, नगरसेविका शालिनी वायले, प्रमिला पाटील, तनुजा वायले, युवासेना कल्याण उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील आदी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, महिला, स्थानिक नागरिक, परिवहन सेवेचे अधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई चौक, सह्याद्री नगर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन हे अंतर ४ किलोमीटर असून या मार्गासाठी नागरिकांना २५ ते ३० रुपये भाडं रिक्षाला मोजावे लागत होते. मात्र आता केडीएमटीच्या बससेवेमुळे नागरिकांना अवघ्या १० रुपयांत स्टेशनपर्यंत जाता येणार आहे. नागरिकांच्या मागणीनुसार आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने हि बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली असून या बसचा मार्ग साई चौक-साईबाबा मंदिर-ब वार्ड-संघवी इस्टेट-इंदिरा बंगला-आरटीओ-सह्याद्री नगर-कोकण वसाहत-सह्याद्री नगर फाटा-बिर्ला कॉलेज-इंदिरा नगर-भवानी चौक,प्रेम ऑटो-पौर्णिमा चौक-सिंडिकेट-स्टेट बँक-बाईचा पुतळा-रामबाग-कल्याण स्टेशन या महत्त्वाच्या ठिकाणांमार्गे धावणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी अनिल ठाणेकर ठाणे : १९ फेब्रुवारी रोजी टीएमसी पार्किंग प्लाझा, ८ वा मजला, लक्ष्मी नगर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ येथील प्रकल्प संचालक कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची…

 ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’

ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’ गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट, प्रत्येक गटात सुवर्ण वर्चस्व! कल्याण : कल्याण येथील गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल येथे ७ व ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या युवा खेळाडूंनी अत्यंत दर्जेदार व आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत संपूर्ण स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्ह्यातील विविध भागांतून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत खेळाडूंमध्ये ठाणे अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक वयोगटात सुवर्ण पदके जिंकत ‘क्लीन स्वीप’ साधली. या स्पर्धेतील सर्वात उजळ ठरलेली कामगिरी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची आशादायी खेळाडू गार्गी मोहिते हिने केली. तिने ११ वर्षांखालील तसेच १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात सलग प्रभावी विजय मिळवत दोन्ही गटांची अजिंक्यपदे पटकावून ‘दुहेरी मुकुट’ आपल्या नावे केला. तिचा नेटवरचा संयम, कोर्ट कव्हरेज आणि आक्रमक खेळाने ती संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक चर्चेत असलेली खेळाडू ठरली. इतर गटांमध्येही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाची झलक दाखवली. ९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विहान अनिखेंडी याने उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक पटकावले. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत योहान नायर याने सुवर्ण, तर वेद चौहान याने कांस्य पदक मिळवत अकॅडमीच्या यशात भर घातली. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अल्फी मेकाडाथ याने सुवर्ण पदक जिंकले, पीयूष सुतार याने रौप्य, तर यध्नेश वारघडे यांनी कांस्य पदक पटकावले. मुलींच्या गटात ११ वर्षांखालील एकेरीत गार्गी मोहिते हिने सुवर्ण पदक मिळवले, तर एहा दीक्षित आणि सान्वी वागळे यांनी कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत पुन्हा एकदा गार्गी मोहिते हिने सुवर्ण, तर अद्विका मोरे हिने रौप्य पदक मिळवत ठाणे अकॅडमीची पदकतालिका अधिक समृद्ध केली. या स्पर्धेतील यशामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती, वैज्ञानिक सराव, मानसिक तयारी आणि दीर्घकालीन खेळाडू घडवण्याच्या दृष्टीकोनाची फलश्रुती स्पष्टपणे दिसून आली. लहान वयातच खेळाडूंमध्ये निर्माण होत असलेली स्पर्धात्मक धार, आत्मविश्वास आणि जिंकण्याची वृत्ती ही अकॅडमीच्या भक्कम पायाभरणीची साक्ष देणारी ठरली आहे. या अभूतपूर्व कामगिरीमागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील समर्पित व अनुभवी प्रशिक्षक संघाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धती आणि खेळाडू-केंद्रित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे. अकॅडमीमध्ये प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, श्रीकांत भागवत,  एकेंद्र दर्जी, फुलचंद पासी, सुरेंद्र दिवेकर, संजय कांबळे, नरेश गुंडले, नरेंद्र वर्मा, प्रसेनजीत शिरोडकर, देवांग दलाल आणि वेदांत जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, शारीरिक तयारी आणि मानसिक ताकद घडवली जात आहे. या सर्व प्रशिक्षण प्रक्रियेचे नेतृत्व प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड करत असून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळेच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील ही नवी पिढी कमी वयातच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यास सज्ज होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.…

 अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी ठाणे : अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजांनी त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिल्यामुळे मार्श संघाने स्पार्कलेक्स मशीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. मार्श संघाच्या २३९ धावांचा पाठलाग करताना स्पार्कलेक्स मशीन संघाला १७५ धावा करता आल्या.  आपल्या ८१ धावांच्या झंझावती खेळीत सात षटकार आणि तीन चौकार मारणाऱ्या अभिषेकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय अभिषेकने आपल्या फलंदाजीने सार्थ ठरवला. संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचताना अभिषेकने केवळ ५७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अक्षय माजगावकरने ३५, आशुतोष घारगेने आणि आसिफ खानने ३१ धावांचे योगदान दिले. या डावात पराभूत संघाच्या करण चव्हाण, सनी जैस्वाल, जेमिन पांचाळ आत्मिक मॅथेलिया आणि प्रथमेश आंगणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. उत्तरादाखल मार्श संघाच्या केतन खरात आणि श्रेयस केसकरने नियंत्रित गोलंदाजी करत स्पार्कलेक्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.  अर्शमित सिंग पराभूत संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अर्शमितने ६८ धावा केल्या. तर दिव्यांश अरोराने २६ आणि सनी जैस्वालने २० धावा बनवल्या. केतन आणि श्रेयसने प्रत्येकी तीन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक – मार्श : ३५ षटकात ७ बाद २३९ ( अभिषेक दिसले ८१, अक्षय माजगावकर ३५, आशुतोष घारगे ३३, आसिफ खान ३१) विजयी विरुद्ध स्पार्कलेक्स मशीन : ३१.५ षटकात सर्वबाद १७५ ( अर्शमित सिंग ६८, दिव्यांश अरोरा २६, सनी जैस्वाल २०, केतन खरात ६-२४-३, श्रेयस केसकर ५.५-२५-३).

 श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय

महाराष्ट्र केसरी निवड चाचणी श्री गणेश आखाड्याच्या ४ पैलवानांचा दिमाखदार विजय १८ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील सरवली येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी व…

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना

छत्रपती शिवरायांना प्रतिमापूजन यातून महापालिका मुख्यालयात मानवंदना अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति. शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सहा. आयुक्त अनुराधा बाबर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.