Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरात ‘कोणार्क एनव्हायरा’ कंपनीच्या कामगारांचे आंदोलन

उल्हासनगर : महापालिका कचरा उचलणे व सफाईचे काम करणाऱ्या कोणार्क एनव्हायरा कंपणीच्या कंत्राटी कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. निवडणुक आचारसंहिता मध्ये आंदोलनास पोलिसांनी मनाई करून कर्मचारी व कंपनी प्रशासनात मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मिटविला आहे. उल्हासनगर कचरा मुक्त या संकल्पनेखाली शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असून वर्षाला १८ कोटींपेक्षा जास्त महापालिका कचरा उचलण्यावर खर्च करते. याशिवाय प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत सफाईचे खाजगीकरण करून साफसफाईचा ठेका कोणार्क कंपनीला दिला. त्यावर वर्षाला ११ कोटीचा खर्च होतो. कोणार्क ग्रीन एनव्हायरा कंपनीच्या कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ अचानक महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र निवडणूक आचारसंहिता काळात आंदोलन नको. अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यावर सर्व कामगारांनी महापालिकेहून मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून, तेथे ठिय्या दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीची भूमिका वठवून कोणार्क कंपणीच्या प्रशासन सोबत चर्चा केली. अखेर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे मान्य केले आहे. महापालिकेतील लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी कामगारांच्या आंदोलना नंतर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे माण्य केल्याचे सांगून आंदोलन मागे घेतले. शहरातील कचरा उचलणे, साफसफाईचे खाजगीकरण, डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरण करणे आदी कामावर कोट्यवधीचा खर्च महापालिका करूनही समस्या जैसे थे आहेत. डम्पिंग वरील आग कायम असून शहर कचरा मुक्त झाले नाही. तसेच प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण करूनही शहरात कचऱ्याचे साम्राज्य व दुर्गंधी कायम आहे.

ठाणे शहरात शाहू मार्केट परिसरात नाका कामगारांमध्ये मतदान जनजागृती

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू मार्केट नौपाडा परिसरात नाका कामगारा सोबत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी परिसरातील कामगारांनी मतदान करुन आपला हक्क बजवावा, मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो अशा घोषणा देत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कोणत्याही मतदाराला त्यांच्या मतदानाच्या लोकशाही अधिकारापासून वंचित ठेवता कामा नये आणि त्यामुळे मतदानाचा दिवस सर्वांसाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे,” लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवहान सर्व उपस्थित कामगारांना  सहायक प्रकल्प अधिकारी तानाजी सोनवलकर यांनी केले. सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या नाका कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.

ग्रामस्थांबरोबर कपिल पाटील यांनी साधला संवाद

बदलापूर : महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी बदलापूरनजीकच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विविध भागातील ग्रामस्थांबरोबर शनिवारी संवाद साधला. त्यानंतर बदलापूर शहरात कॉर्नर सभा घेऊन नागरिकांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कपिल पाटील यांनी बदलापूरच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. वडवली, साई, ढोके दापिवली, आंबेशिव, भोपीपाडा, चोण, राहटोली, जांभिलकर, मुळगाव, सोनावळे, कान्होर, काराव, भूइसावरे येथील ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबारी, गणेश पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, पूर्व विभागाचे अध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोरपडे, शरद म्हात्रे, शिवसेनेचे पदाधिकारी सतीश खोत, राहटोलीच्या सरपंच राजश्री रेवाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, कपिल पाटील यांनी बदलापूर शहरातील एरंजाड येथील नागरिकांबरोबरही संवाद साधला. तसेच त्यांना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे, पंकज मेहेर, समीर मेहेर, जितेंद्र मेहेर आदींसह ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. बदलापूर शहरातील दत्तवाडी येथे शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, वॉर्ड क्र. २ मध्ये समाजसेवक बंटी म्हसकर, भाजपाच्या माजी नगरसेविका वैशाली गिते व प्रदिप गिते यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शिवसेनेचे माजी गटनेते श्रीधर पाटील, बदलापूर पूर्वचे अध्यक्ष संजय भोईर, पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद तेली आदी उपस्थित होते. बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचारसभेला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी निवडून देण्याचे आवाहन केले.

ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात

८५ वर्षावरील ६३४ तर, १०३ दिव्यांग नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क ठाणे : दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना आजारपणामुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा व्यक्तींसाठी ही सुविधा असणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात ८५ वर्षावरील ६३४ आणि १०३ दिव्यांग नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच ८५ वर्षावरील नागरिकांना आणि दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घर बसल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रथमच गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात या प्रक्रियेला ९ मे पासून सुरुवात झाली असून विधानसभा मतदारसंघ निहाय्य ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये ९ मे रोजी तर, कल्याण लोकसभा मतदार संघा मध्ये १० मे रोजी गृह मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार, ठाणे लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २५६ आणि दिव्यांग ३७ तर, कल्याण लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील २१५ आणि दिव्यांग ४४ आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात १६३ आणि दिव्यांग २२ असे गृह मतदान पार पडले. यातही, काही नागरिक घरी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे मतदान अद्याप बाकी आहे. या नागरिकांचे मतदान १५ मे पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. काय आहे गृह मतदानाची प्रक्रिया ४० टक्के अपंगत्व आणि ८५ वर्षावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला होता. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मंजूर अर्जांच्या यादीनुसार विधानसभानिहाय मतदारसंघाद्वारे ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान घेण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हे अधिकारी मतदारांना मतदान प्रक्रिया समजावतात आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांच्या कडून मतदान करुन घेतले जाते. त्यांनी केलेले मतदान हे गौपनिय राहावे यासाठी ते सील बंद केले जाते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आईचे ऋण या जगात कोणच फेडू शकत नाही म्हणूनच रविवारी “जागतिक मदर डे” च्या निमित्ताने घोडबंदर रोड येथील बागीच्या मध्ये आई आपल्या लेकिला खेळता खेळता जणू भविष्याचे उज्वल स्वप्नच सांगत आहे. ( फोटो-प्रफुल गांगुर्डे)

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पहिल्यांदाच होणार शिवप्रदक्षिणा

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या १४ मे रोजी ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंती आहे. ठाणे ओबीसी एकीकरण समिती, ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त मासुंदा तलाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता मासुंदा तलाव परिसरात शिवप्रदक्षिणा करण्यात येणार आहे. या प्रदक्षिणेत संभाजी राजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार असून ढोल ,लेझीम पथकासह हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचे ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी सांगितले.

बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना आढळल्यास कडक कारवाई – दिपक कुटे

अनिल ठाणेकर ठाणे : बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील सन २०२४ मधील खरीप हंगाम पूर्व आढावा सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि. ७ मे रोजी पार पडली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी खते व बियाणे विक्रेत्यांनी कायदेशीर तरतुदींना अधिन राहून व्यवसाय करावा असे स्पष्ट केले. बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. क्षेत्रिय कर्मचाऱ्याच्या मार्फत रँडमली शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांचे तपासणी करुन माहिती घ्यावी व पावत्यांना न देता विक्री करणाऱ्या विक्रेते व व्यक्तीविरुध्द सदरील खते बोगस आहेत असे समजून पोलीस कारवाई करणेत येईल. सर्व विक्री केंद्रांची हंगामपूर्व १०० % तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या. खरीप २०२४ हंगामात खताची टंचाई भासणार नाही व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक खते रास्त दरात मिळतील या संदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्याबाबत सर्व उपस्थितांना सांगितले. खरीप हंगाम सुरळीत जावा याकरिता सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले. ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी १० हजार मेट्रिक.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाल्याचे सांगितले. रासायनिक खतांचे शेतकऱ्यांना विक्री करतांना पॉस मशिनद्वारेच करावी. खत वाटप होत असताना शेतकऱ्यांना लिंकिंगच्या समस्येला तोंड देण्याच्या तक्रारी प्राप्त होतात, त्याकरिता अशा प्रकारच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येईल व खताबरोबर इतर अनावश्यक निविष्ठा शेतकऱ्यांना सक्तीने विकल्या जाणार नाहीत याबद्दल सर्व वितरकांना सक्त सूचना दिल्या. अन्यथा विक्रेत्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जिल्ह्यामध्ये नॅनो युरिया व नॅनो डिएपी प्रभावीपणे वापराचे प्रोत्साहन देण्यासाठी विस्तार योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे व त्याचा वापर वाढविण्याकरिता भर देण्यात यावा अशा सूचना सर्व क्षेत्रिय अधिकारी व उपस्थितांना दिल्या. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे, कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे, उपविभागिय कृषि अधिकारी सुधीर नईनवाड, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी रूपाली काळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड या तालुक्यांचे तालुका कृषि अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन फुले, बाळासाहेब माने, कृषि अधिकारी, जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालय, ठाणे, पंचायत समिती कडील सर्व कृषि अधिकारी, खते- बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व जिल्हयातुन आलेले सर्व खते व बियाण्यांचे घाऊक विक्रेते उपस्थित होते. या सभेत IFFCO चे प्रतिनिधी निमिष पवार यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नॅनो युरीयामुळे पिकांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होत नसल्याचे व उत्पादकतेमध्ये वाढ व खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. त्याचप्रमाणे पिकांच्या पौष्टीकतेमध्ये व गुणवत्तेमध्ये फरक पडतो. जमीन, हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारते. अशा प्रकारचे फायदे नॅनो युरीया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे होतात अशी सविस्तर माहिती सभेत देण्यात आली.

शासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये –  संजय घाडीगावकर

अनिल ठाणेकर ठाणे : एप्रिल २०२४ मध्ये व्यावसायिक पूर्व परिक्षेकरिता सुपरवायझर राहिलेल्या शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. एप्रिल २०२४ महिन्यात शासनाने व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या पूर्व परीक्षा आयोजित केलेल्या होत्या, त्या पूर्व परीक्षांना काही शिक्षक, शासकीय कर्मचारीवर्ग  सुपरवायझर म्हणून त्यांचे कर्तव्य बजावत होते. परिणामी त्यांना एप्रिल २०२४ मध्ये पोस्टल बॅलेट करिता फॉर्म भरून देता आले नाहीत. त्या दिवशीचे निवडणूक प्रक्रियेचे ट्रेनिंगही त्यांना घेता आले नाही. म्हणून अशा शिक्षकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आपण नोटिसा, मेमो बजावले होते. त्यांनी या नोटिस व मेमों यांना लेखी उत्तर दिल्यानंतर आपणास वस्तुस्थिती अवगत झालेली असतानाही असे शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना पोस्टल वोटिंग पासून आपण वंचित ठेवत आहात ही बाब अयोग्य आहे सदरची बाब ही अतिगंभीर असून कोणत्याही व्यक्तीला त्याचे मतदानाचे  राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यापासून वंचित ठेवणे हे नक्कीच लोकशाहीला धोकादायक आहे. लोकशाहीच्या या उत्सवात निवडणूक आयोगाकडून याप्रकारे कृत्य घडणे ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि मारक आहे. ज्या शासकीय कर्मचारी तथा शिक्षकांना पोस्टल वोटिंग साठी वंचित राहावं लागलेले आहे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या  मार्फत तातडीने संपर्क साधून पोस्टल मतदान करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

तळोजामधील गृहसंकुलाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

खारघर : तळोजा घोट कॅम्पमधील अरिहंत अनायिका सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाणी समस्या आहे. पाणी समस्यांविषयी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सोसायटीमधील मतदारांनी लोकसभा…

ठाणे परिसरात बेकायदा बांधकामांचे पेव

ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर होणारी टीका टाळण्यासाठी प्रशासनाकडून या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील…