Category: ठाणे

Thane news

भिवंडीतील तृतीयपंथीय व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदान करावे-दिपाली मासिरकर

अशोक गायकवाड भिवंडी : २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला यांची मतदानातील टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने भिवंडीतील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात उपस्थित तृतीयपंथीय तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर यांनी केले आहे. तृतीयपंथीय मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे, यासंदर्भात निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर, वरिष्ठ सल्लागार साधना राऊत, आणि कक्ष अधिकारी उदिता कांडपाल, मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी पल्लवी जाधव यांनी भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात तृतीयपंथीय मतदार, तसेच देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी १३७ भिवंडी पूर्व मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप,१३६ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अस्मिता मोहिते, नायब तहसीलदार स्मितल यादव, मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त अजय एडके, भिवंडी महानगरपालिका निवडणूक प्रमुख नितीन पाटील तसेच दोन्ही मतदारसंघाचे स्वीप पथकाचे अधिकारी सदस्य उपस्थित होते.

उल्हासनगर पोलीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार उल्हासनगर : लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष्यांमध्ये बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद होत असतात.अशाप्रसंगी पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी उल्हासनगरातील पोलीस हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राईड-स्कीमच्या प्रत्यक्षिकांचा थरार सादर करून आम्ही सज्ज असल्याचा मॅसेज दिला. कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही 20 रोजी होणार असून आज महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या काही दिवसात विविध राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाल्यावर बॅनर्स-पोस्टर्स-कट आऊट्स झळकणार आहेत.अशावेळी बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद आणि दंगे होत असतात.त्यामुळे पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी राईड स्कीम प्रत्यक्षिकांच्या थराराचे आयोजन 17 सेक्शन वरील महामार्गावर केले होते. या राइड स्कीम मध्ये एस.आर.पी.एफ ची तुकडी,झोन फोर स्ट्राइकिंग,मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस सहभागी झाले होते.यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत ट्रेनिंग देण्यात आले.

‘रामसेतू’ मोहिमेसाठी जलतरणपटू सज्ज

ठाणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू ३ आणि ४ मे रोजी ‘रामसेतू’ तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत. अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. यामध्ये अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू ‘पाल्क स्ट्रेट’ ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण टीमने घंटाळी मंदिरात घंटाळी देवी आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले. प्रभू रामचंद्रांना पवमान अभिषेक करून घंटाळी मंदिराचे पुजारी ओंकार चिक्षे गुरुजी यांनी मंत्रोच्चारासह आशीर्वाद दिले. यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धे, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याचबरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत, तसेच माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कळव्यात वाहतुकोंडीमुळे वाहनांच्या रांगा

कळवा : मुंब्रा बायपास रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. त्याचवेळी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखालून जाताना एक कंटेनर…

मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश राजीव चंदने मुरबाड : नगरपंचायतचे हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटणाऱ्या राहुल हिंदुराव या ठेकेदाराने लाखो रुपयांचा काळा पैसा मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत टाकला असल्याने नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली असुन या प्रकरणाची चौकशी  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे करीत असुन त्या चौकशी कडे तमाम मुरबाड करांचे लक्ष लागले आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोथ्तान योजनेतुन कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतला दिले.मुरबाड नगरपंचायतने हि कामे  आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च  केला मात्र  उघडी गटारे, रस्ते व शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता सदर ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे ,सागर भंडारी,दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी  हा प्रकार उजेडात आणला, त्यामुळे ठेकेदाराचे पायाखालची वाळू सरकली व त्याने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोथ्तान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले.याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधान कारक खुलासा केला नाही त्यामुळे नगरपंचायतने  जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत. कोट मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनाधिकृत पणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे.त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत –मनोज म्हसे.मुख्याधिकारी.मुरबाड नगरपंचायत.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

कल्याण : पावसाळ्यापूर्वीची जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता.२ मे) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अभियंता रमेश गोरे यांनी सांगितले. पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते. १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी कल्याण शहराच्या काही भागांना वितरित केले जाते. या जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रांना महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा केंद्राच्या कांबा येथील उपकेंद्रात दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेला होणारा वीज पुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. नऊ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांना, ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठ बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर-राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. रखरखीत उन असूनही कार्यकर्ते हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन घामाघून होऊनही या फेरीत सहभागी झाले होते. उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत फडके रस्त्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्या इंदिरा चौकात उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत दाखल झाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत वैशाली दरेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जयघोष केला जातो. राष्ट्रवादी, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा जयघोष करत होते. त्यामुळे वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते. ढोलताशांच्या दणदणाटाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला सुरूवात झाली. एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार वैशाली दरेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, डॉ. जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, वरूण सरदेसाई, सदानंद थरवळ विराजमान झाले होते. नागरिकांना अभिवादन करत वाजतगाजत फेरी घरडा सर्कल येथील निवडणूक कार्यालयाकडे निघाली होती. यावेळी रस्तोरस्ती वाहनकोंडीचे दृश्य होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा-मुंब्रा भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत जनता आपल्या पाठीशी आहे हे ठामपणे दिसले. विकासाच्या नावाने बोंबा ठोकल्या जात असल्या तरी विकास कोणाचा झालाय हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या भागातील सर्व जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीतून, प्रचारातून दिसून आले आहे.– वैशाली दरेकर उमेदवार, महाविकास आघाडी

कल्याण लोकसभेत महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे २ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक डोंबिवलीः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे २ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जातील. श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १० वर्षात त्यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या कामांचा स्मार्ट रूपातील कार्य अहवाल नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या १० वर्षातील कामांचे सादरीकरण करत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. सध्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरूवार, २ मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाज पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध मान्यवर मंडळींशी भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद यासह अनेक सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहात आहेत. तसेच विविध समाज संघटनांकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २ मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असा असेल मिरवणुकीचा मार्ग – डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार रस्ता नाका, लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉ. श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी. यावेळी महापालिकेतील कर्मचारी देखील उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी

सहा उमेदवारांचे अर्ज दाखल ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी   विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर…